दैनंदिन जीवनात बहुवारिकेचा उपयोग अनेक प्रकारे व बहुविध स्वरुपात होताना आढळतो. जीवाश्म इंधन हे बहुवारिकेचा मुख्य स्त्रोत असून ते झपाट्याने कमी होत आहेत. त्यामुळेच जगभरातील शास्त्रज्ञ जैव स्त्रोतांपासून बहुवारिके बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शैवाले हा त्यासाठी उत्तम पर्याय असल्याचे आढळते. जैवबहुवारिकेला जैव प्लॅस्टिक किंवा विघटनशील प्लॅस्टिक असेही म्हटले जाते. हे नूतनीकरणक्षम जैव स्त्रोतांपासून बनविले जाते. उदा., भाजीपाला, तेलबिया, मक्यातील स्टार्च (कॉर्न स्टार्च) इ. परंतु शैवालांपासून हे जैवबहुवारिके बनविणे अधिक फायद्याचे असल्याचे आढळते, कारण शैवलांचे उत्पादन अधिक जलद होते आणि कोणत्याही वातावरणात ते वाढू शकतात. याबरोबरच शैवलांचा मुख्य अन्नात तितकासा समावेश होत नाही.
शैवलांपासून मिळणाऱ्या बहुवारिकेचे साधारणपणे तीन प्रकार आढळतात, पहिल्या प्रकारात नैसर्गिक बहुवारिकेचा समावेश होतो, उदा., बहुशर्करा रेणू, मेद घटक, पेशीबाह्य बहुवारिके इ. ही बहुवारिके अत्यावश्यक या प्रकारात मोडतात. दुसऱ्या प्रकारात पॉलीहायड्रॉक्सिअल्कनोएट्सचा समावेश होतो, यालाच पी.एच.ए. (Poly Hydroxy Alkanotes) म्हणतात. जीवाणू व नील-हरित शैवलांद्वारे यांची निर्मिती केली जाते, तर तिसऱ्या प्रकारात शैवलापासून प्राप्त होणाऱ्या एकलक (Monomes) रेणूपासून बहुवारिकेची निर्मिती केली जाते. यातील पी. एच. ए. व एकलक रेणूपासून बनविलेले बहुवारिके यांचे गुणधर्म बाजारात उपलब्ध असणाऱ्या जीवाश्म इंधनापासून बनविलेल्या प्लॅस्टिकप्रमाणे आढळतात.
युरोपिय समुदाय देशांनी स्प्लॅश (SPLASH; Sustainable Polymers from Algae Sugars and Hydrocarbons) हा संशोधन प्रकल्प सन २०१२-१३ मध्ये हाती घेतला. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शैवालांपासून बहुवारिके व विघटनक्षम जैव प्लास्टिकचे उत्पादन करणे व त्याचे व्यावसायिकीकरण करणे हा आहे. शैवाल आधारित प्लास्टिक बनविण्याचा उद्योग सध्या प्राथमिक अवस्थेत असून या प्लास्टिकचे व्यावसायिक उत्पादन करणारे मोजकेच उद्योग आज कार्यरत आहेत.
जीवाश्म इंधनापासून बनविलेले प्लॅस्टिक तुलनेने खूपच स्वस्त आहेत, त्यामुळे विघटनक्षम जैव प्लास्टिकचा उत्पादन खर्च कमी करण्याची आवश्यकता आहे. शैवाल उत्पादनाचा खर्च कमी केल्यास हे शक्य होईल. म्हणूनच शैवलांच्या वाढीसाठी ज्या पोषक माध्यमांचा उपयोग केला जातो व जी सध्या खर्चिक आहेत, त्यासाठी स्वस्त पर्याय उपलब्ध होण्याची गरज आहे. तरच हे उत्पादन आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य ठरेल. याच्या व्यावसायिकीकरणामधील दुसरी अडचण म्हणजे, शैवलांच्या लागवड/पैदास टप्प्याइतकेच त्यांची कापणी आणि त्यासाठी लागणाऱ्या तळ्यांची देखभाल हीदेखील खर्चिक बाब आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण स्त्रोताच्या व्यावसायिक वापरासाठी काही काळ तरी वाट पाहावी लागू शकते.
संदर्भ :
- Özçimen, Didem&İnan, Benan&morkoç, Ogün&Efe, Aybüke. A Review on Algal Biopolymers, Journal of Chemical Engineering Research Updates. 4. 7-14.10.15377/2409-983X.2017.04.2.,2017.
- http://www.biobasics.gc.ca/english/
समीक्षक : शरद चाफेकर