पंचसृष्टी वर्गीकरणानुसार प्रोटिस्टा सजीवांना स्वतंत्र सृष्टीचे स्थान दिले आहे. प्रोटिस्टा सृष्टीत समावेश केलेल्या सजीव गटांचा जनुकीयदृष्ट्या परस्पर संबंध नाही, त्यामुळे त्यांच्या वर्गीकरणात एकजिनसीपणा नाही. केवळ त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार त्यांना प्रोटिस्टा सृष्टीत एकत्र आणले आहे.

करंडक सजीव (Diatoms)
केल्प (Kelp)

करंडक सजीव (Diatoms) :  हे सजीव सूक्ष्म आकाराचे असून पाण्याबरोबर वाहत जातात. त्यांना स्वत: हालचाल करण्यासाठी अंगके नाहीत. हे सजीव गोड्या व सागरी पाण्यात आढळतात. एकत्रितपणे ते करंडकाच्या आकाराचे असल्याने त्यांना करंडक म्हणतात. करंडक सजीवांच्या पेशींमध्ये हरितलवके असल्याने हे प्रथम उत्पादक सजीव आहेत. पेशी आवरण दुहेरी असून सिलिकाचे असते. यांची संख्या प्रचंड असल्यामुळे काही ठिकाणी यांचे मोठे थर जमा झालेले असून करंडक (डायटम) जीवाश्मांमुळे अनेक ठिकाणी जमीन व खडक बनलेले आहेत. करंडक सजीव हे अनेक सजीवांच्या अन्नसाखळीचा घटक  आहेत.

बहुपेशी शैवले गोड्या वा सागरी पाण्यात उथळ समुद्रात खडकांच्या आधाराने किंवा तरंगत असतात. उदा., स्पायरोगायरा (Spirogyra), व्हॉल्व्हॉक्स (Volvox), केल्प (Kelp).

द्विकशाभिक ( Dinoflagellate)

द्विकशाभिक (Dinoflagellate) : या सजीवांमध्ये हालचालीसाठी दोन कशाभिका (Flagella) असतात. यांच्या पेशीत तांबडे, हिरवे, निळे, पिवळे व तपकिरी कण असतात. द्विकशाभिक सजीवांचे विभाजन अतिशय झपाट्याने होते. हे सजीव सागरी अन्नसाखळीतील महत्त्वाचा भाग  आहेत. काही द्विकशाभिक सजीवांमधून सोडला गेलेला विषारी स्त्राव सागरी सजीवांना घातक असतो.

यूग्लिना (Euglena)

यूग्लिना सदृश प्रोटिस्टा (Euglenoids protists) : बहुतांशी गोड्या पाण्यातील हे एकपेशीय सजीव आहेत. यांच्या शरीरावरील आवरण लवचिक प्रथिनांनी बनलेले असते. यास पेलिकल असे म्हणतात. सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेप्रमाणे यूग्लिनॉइड स्वयंपोषी अथवा परपोषी असतात. पेशीमध्ये हरितलवके असल्याने ते स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात. पेशीस दोन कशाभिका असून त्यातील एक आखूड, तर दुसरी अधिक लांब असते.

श्लेष्मकवक (Slime mold) : हे सजीव कवकांसारखे दिसत असले, तरी ते एकपेशीय असल्यामुळे त्यांचा समावेश फंजाय सृष्टीत केला जात नाही. ते मृतोपजीवी असतात. त्यांचे पेशीआवरण सेल्युलोज व ग्लायकॉनयुक्त असते. त्यांचे शरीर अनेक लवकांनी (Plastid) बनलेले असते. ही अनेक लवके एकत्र येऊन संपेशिका म्हणजे लवक समूह बनतो. श्लेष्मकवकाची हालचाल संपेशिकेमार्फत होते. त्यांचे अलैंगिक प्रजनन बीजाणूंमार्फत होते. हे बीजाणू अनेक वर्षे सुप्तावस्थेत राहू शकतात.

श्लेष्मकवक (Slime mold)

प्रोटोझोआ (Protozoa) : हे खऱ्या अर्थाने परपोषी असून भक्षक अथवा परजीवी अवस्थेत असतात. अमीबा सदृश, कशाभिक, रोमक व स्पोरोझोआ असे त्यांचे मुख्य प्रकार केले आहेत.

अमीबा सदृश प्रोटोझोआ : हे गोड्या अथवा सागरी पाण्यात आढळतात. त्यांची हालचाल छद्मपादाच्या (पायाप्रमाणे हालचाल करण्यासाठीची अंगके) साहाय्याने होते. कणभक्षण पद्धतीने अन्नकण खाण्यासाठी देखील छद्मपादाचा उपयोग केला जातो.

कशाभिक प्रोटोझोआ : ट्रिपॅनोसोमा (Trypanosoma)

कशाभिक प्रोटोझोआ : या सजीवांना हालचालीसाठी कशाभिका असतात. उदा., ट्रिपॅनोसोमा (Trypanosoma).

रोमक प्रोटोझोआ : हे सजीव शरीरावर असलेल्या रोमकांच्या साहाय्याने हालचाल व अन्नभक्षण करतात. या सजीवांचा गट हा प्रगत प्रोटोझोआ म्हणून ओळखला जातो. पुनरुत्पादन लैंगिक व अलैंगिक पद्धतीने होते.

स्पोरोझोआ : या सजीवांच्या जीवनचक्रामध्ये बीजाणू अवस्था असल्याने त्यांना स्पोरोझोआ असे म्हणतात. त्यांचे जीवनचक्र गुंतागुंतीचे असते. ते एकाहून अधिक आश्रयींमध्ये पूर्ण होते. उदा., प्लाझ्मोडियम परजीवी. काही स्पोरोझोआमध्ये पिढी एकांतरण (Alternation of generation) होते.

पहा :  पंचसृष्टी वर्गीकरण, प्रोटोझोआ, सजीव वर्गीकरण, सिलिओफोरा, स्पोरोझोआ. 

संदर्भ :

  • Macropaedia The New Encyclopaedia Britannica, Vol. 26, U.S.A., 2007.
  • McGrawHillEncyclopaedia of Science and Technology, Vol. 14 (10thed), New York, 2007.
  • https://www.livescience.com › Planet Earth

                                           समीक्षक : सुरेखा मगर-मोहिते

This Post Has One Comment

  1. prajakta

    Actually it is easy for information

Comments are closed.