भांगरे, राघोजी : ( ८ नोव्हेंबर १८०५ – २ मे १८४८ ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव (ता. अकोले) येथे रामजी व रमाबाई या दाम्पत्यापोटी महादेव कोळी जमातीत झाला. रामजी हे कोळी साम्राज्य असलेल्या जव्हारच्या मुकणे संस्थानच्या राजूर प्रांताचे सुभेदार होते. रामजी यांनी राघोजींना घरी शिक्षणाची व्यवस्था केली. पुढे राघोजी तलवारबाजी, भालाफेक, पट्टा चालविणे, बंदुकीने निशाणा साधणे, घोडेस्वारी करणे यांत तरबेज झाले.
पेशव्यांच्या पराभवानंतर (१८१८) ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत असलेले किल्ले, वतने यांकडे मोर्चा वळविला. त्यामुळे रामजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली रतनगडावर गोविंदराव खाडे, वाळोजी भांगरे, लक्षा ठाकर इत्यादींनी इग्रजांच्या विरोधात जाहीर उठाव केला; तथापि त्यांचा पराभव झाला (१८२१). रामजी भांगरे व गोविंदराव खाडे यांना अटक केली. पुढे खटला चालवून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली. वडिलांच्या अनुपस्थितीत राघोजी आपल्या गावात पोलीस पाटील पदाचा कारभार पाहत होते. आपल्या चोख कारभारामुळे राजूर पोलीस ठाण्यात राघोजींना इतरांपेक्षा अधिक मान होता. राजूर प्रांताच्या रिक्त असलेल्या पोलीस अधिकारी पदासाठी राघोजींनी अर्ज केला; परंतु ब्रिटिशांनी ही मागणी फेटाळून अमृतराव कुलकर्णी यांची पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक केली. पुढे कोकणातील एका दरोडा प्रकरणात राघोजींचा सहभाग असल्याचा खोटा अभिप्राय अमृतराव कुलकर्णी यांनी सरकारला पाठविला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरेसा तपास न करताच राघोजींना अटक करण्याचा आदेश काढला. राघोजी पोलीस ठाण्यात हजर झाले. आपल्यावरील खोट्या आरोपाचा जाब त्यांनी विचारला. या दरम्यान राघोजी व अमृतराव यांच्यात बाचाबाची झाली. या वादात अमृतराव मारले गेले. पुढे राघोजी आणि इंग्रज यांच्यातील संघर्ष तीव्र झाला.
राघोजींचे संघटन कौशल्य चांगले होते. त्यांना मुळा खोरे, चाळीसगाव डांगाण, बारागाव पठार या परिसरातून विविध जातीजमातीचे अनेक तरुण येऊन मिळाले. अन्यायी अत्याचारी सरकार, सावकार, जमीनदार यांच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम राघोजींच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. राया ठाकर, देवजी आव्हाड हे त्यांचे सहकारी. पुढे त्यांनी कोतुळ राजूर व खीरवीरे परिसरातील जुलमी व अत्याचारी सावकारांवर धाडी टाकल्या. त्याची संपत्ती लुटून गोरगरिबांना वाटून टाकली, तसेच सावकारांनी कब्जा केलेल्या जमिनींचे सर्व कागद व दस्तऐवज यांची होळी केली. महिलांवर हात टाकणाऱ्या सावकारांचे कान, नाक कापले. राघोजींच्या वाढत्या दबदब्यामुळे या भागातील सावकार व जमीनदार आपले सर्व अधिकार सोडून अकोले व संगमनेर परिसरात गेले. पुढे राघोजींनी सावकारशाही विरोधातील लढा अधिक व्यापक करत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, कळवण येथील सावकारशाहीविरुद्ध संघर्ष केला.
राघोजींचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटिशांनी सु. दोनशे बंदूकधारी शिपायांची तुकडी पाठविली. याचवेळी राघोजींनी आपले निवासस्थान बाडगीच्या माचीवरून अलंग व कुलंग किल्ल्यावर हलविले. ब्रिटिश शिपाई घनदाट जंगलातून वाट काढत असताना राघोजींच्या साथीदारांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामुळे शिपाई जंगलात सैरावैरा पळू लागले. देवजी आव्हाड, बापू भांगरे व खंडू साबळे या साथीदारांसह राघोजींनी अनेक शिपायांची कत्तल केली. या लढाईत राघोजींना मोठ्या प्रमाणात काडतुसे व बंदुका मिळाल्या. राघोजींच्या या कृत्याने इंग्रज सरकार हादरले. त्यांना पायबंद घालण्यासाठी इंग्रजांनी वेगवेगळे प्रयत्न केले. बक्षिसांचे आमिष दाखवले; परंतु यश येत नव्हते. शेवटी इंग्रज अधिकाऱ्यांनी राघोजींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी अत्याचारी मार्ग अवलंबिला. त्यांच्या घरातील माणसांना त्रास द्यायला सुरुवात केली. वारंवार राघोजींच्या घरी धाडी घातल्या. तरीही काही हाती न लागल्याने शेवटी त्यांची आई रमाबाईला ताब्यात घेतले. तसेच गावागावांत जाऊन महादेव कोळी व ठाकर समाजातील इतर लोकांना छळले; परंतु त्याचाही उपयोग झाला नाही.
सातारचे छ. प्रतापसिंह भोसले यांनी राघोजींना सातारा भेटीचे आमंत्रण देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली होती. सातारा येथील पदच्युत छत्रपतींना पुन्हा गादीवर बसवावे म्हणून झालेल्या बंडात राघोजींचा सहभाग असावा, असे अभ्यासकांचे मत आहे.
राघोजी इंग्रजांशी छुप्या मार्गाने लढत होते. इंग्रजांशी समोरासमोर लढण्यासाठी त्यांनी जुन्नर येथे जाहीर उठाव केला (१८४५). यावेळी राघोजी व इंग्रज सैन्यांत तुंबळ लढाई झाली. राघोजी जुन्नर बाजारपेठेचा फायदा उठवत सहीसलामत बाहेर पडले. या उठावात त्यांनी मोठ्या प्रमाणात आपले साथीदार गमावले. त्यामुळे पुढे भूमिगत राहून लढा देण्याचे ठरविले. त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी दहा हजार रुपये व गाव इनाम देण्याची घोषणा केली. पुढे ते पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले असताना लेफ्टनंट जनरल गेल याने शेकडो पोलिसांचा फौजफाटा घेऊन मंदिराला वेढा दिला व राघोजींना ताब्यात घेतले (१८४७). त्यांच्यावर खटला भरून ठाणे येथील कारागृहात फाशी देण्यात आली.
संदर्भ :
- Campbell, James M. Ed., Gazetteers of the Bombay presidency: Nasik district, Bombay, 1883.
- Ghurye, G. S. The Mahadev Kolis, Bombay, 1963.
- Kunte, B. G. & Others Eds., Maharashtra State Gazetteers: Ahamadnagar District, Bombay, 1976.
- गारे, गोविंद, सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी, मुंबई, १९७४.
- नेहरे, भाऊसाहेब स., सह्याद्रीचा वाघ: क्रांतिवीर राघोजी भांगरे, नाशिक, २०१०.
समीक्षक : सरोजकुमार मिठारी