उमाजी नाईक : (७ सप्टेंबर १७९१–३ फेब्रुवारी १८३२). एक प्रसिद्ध क्रांतिकारक. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी घडून आलेल्या रामोशांच्या उठावात उमाजी नाईक यांचे नेतृत्व महत्त्वाचे होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवडी (ता. पुरंदर) येथे झाला. वडील दादजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे रखवालदार म्हणून काम करत होते. छ. शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक किल्ल्यांची राखणदारी या समाजाकडे सोपविण्यात आली होती. उमाजी लहानपणापासून वडिलांसोबत पुरंदरच्या रखवालीचे काम करत. आपल्या वडिलांकडून त्यांनी गोफण चालविणे, तीरकमठा मारणे, कुऱ्हाड चालविणे, भाला फेकणे, तलवार व दांडपट्टा चालविणे इ. कौशल्ये आत्मसात केली होती. उमाजी ११ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले (१८०२) आणि वंशपरंपरेने वतनदारी त्यांच्याकडे आली.

इंग्रजांच्या सल्ल्यावरून १८०३ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने पुरंदर किल्ला रामोशींच्या ताब्यातून काढून घेण्याचा प्रयत्न केला, यावेळी रामोशींनी कडाडून विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या पेशव्यांनी रामोशी लोकांचे हक्क, वतने, जमिनी जप्त केल्या. उमाजींनी पेशव्यांच्या या अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष केला. उमाजी उत्तम संघटक होते. बरेचशे रामोशी त्यांना आपला नेता मानत होते. गरिबांना लुटणारे सावकार, वतनदार व जमीनदार यांना त्यांनी आपले लक्ष बनविले. गोरगरिबांना लुटून सावकार झालेल्या मुंबईच्या चानजी मातिया या पेढीवाल्याचा माल उमाजींनी पनवेल-खालापूरजवळ धाड घालून पळविला. तेव्हा उमाजी इंग्रजांच्या हाती लागले व त्यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर एका दरोड्यात ते पुन्हा पकडले गेले व त्यांना सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. कैदेत असताना ते लेखन–वाचन शिकले.

उमाजी खंडोबाचा भक्त होते. त्यांच्या पत्रावर ‘खंडोबा प्रसन्न’ असे शीर्षक दिसते. त्यांचा भाऊ आमृता याने सत्तू बेरडाच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचा भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला (१८२४-२५). या लुटीमध्ये उमाजींची भूमिका महत्त्वाची होती. १८२५ मध्ये सत्तू मृत्यू पावल्यानंतर त्याच्या टोळीचे उमाजी प्रमुख झाले. उमाजींविरुद्ध इंग्रज सरकारकडे तक्रारी वाढल्याने २८ ऑक्टोबर १८२६ रोजी इंग्रजांनी त्यांच्याविरुध्द पहिला जाहीरनामा काढला. यामध्ये उमाजी व त्यांचा साथीदार पांडूजी यांना पकडून देणाऱ्यांना १०० रु. चे बक्षीस जाहीर केले. तर दुसऱ्या जाहीरनाम्यात उमाजीला साथ देणाऱ्यांना ठार मारण्यात येईल, असे जाहीर केले. परिणामी उमाजींनी इंग्रजांविरुद्ध मोहीमच सुरू केली. भिवडी, किकवी, परिंचे, सासवड व जेजुरी भागात त्यांनी लुटालूट केली. त्यामुळे इंग्रज सरकारने उमाजींना पकडण्यासाठी स्वतंत्र घोडदळाची नियुक्ती केली व १५२ ठिकाणी चौक्या बसविल्या, परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती सापडले नाहीत.

८ ऑगस्ट १८२७ रोजी इंग्रजांनी पुन्हा एक जाहीरनामा काढून उमाजींना पकडण्याचे आवाहन केले. जे लोक सरकारला मदत करणार नाहीत, त्यांना उमाजीचे साथीदार समजण्यात येईल असे घोषित केले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. इंग्रजांनी जनतेला पैशाचे आमिष दाखवत उमाजींना पकडणाऱ्यास १२०० रु. चे बक्षीस जाहीर केले. या काळात उमाजींचा दबदबा वाढला. त्यांनी स्वत:ला ‘राजे’ म्हणवून घेण्यास सुरुवात केली. न्यायनिवाडा सुरू केला. इंग्रजांनी उमाजींना पकडण्यासाठी यवतचा रामोशी राणोजी नाईक, रोहिड्याचा रामोशी आप्पाजी नाईक यांचीही मदत घेतलेली दिसते. १८२७ मध्ये उमाजीने इंग्रजांना आव्हान देत पुण्याचा कलेक्टर एच. डी. रॉबर्टसन याच्याकडेच आपल्या मागण्या केल्या. मागण्या मान्य न केल्यास रामोशाच्या उठावास सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली. तेव्हा उमाजींच्या विरोधात रॉबर्टसनने ५ कलमी जाहीरनामा काढला (१५ डिसेंबर १८२७). यामध्ये उमाजींना पकडून देणाऱ्यास ५००० रु. चे बक्षीस जाहीर केले होते. या जाहीरनाम्याला प्रतिरोध म्हणून २५ डिसेंबर १८२७ रोजी ठाणे व रत्नागिरी सुभ्यासाठी उमाजींनी स्वतंत्र जाहीरनामा काढला. या जाहीरनाम्यानुसार १३ गावांनी उमाजींना आपला महसूल दिला. ही घटना इंग्रजांना धोक्याची घंटा होती. उमाजी आपल्या हातामध्ये येत नाही म्हटल्यावर इंग्रजांनी त्यांची पत्नी, दोन मुले व एका मुलीस कैद केले. तेव्हा उमाजी इंग्रजांना शरण गेले. इंग्रजांनी त्यांचे सगळे गुन्हे माफ केले व आपल्या पदरी नोकरीस ठेवले. १८२८–२९ या काळात उमाजींकडे पुणे व सातारा या भागात शांतता ठेवण्याची जबाबदारी होती. या काळात त्यांनी अनेक मार्गांनी पैसा जमा केला. त्यामुळे इंग्रजांनी ऑगस्ट १८२९ मध्ये त्यांच्यावर लुटमारी, खंडण्या गोळा करणे, मेजवाण्या घेणे इत्यादी आरोप ठेवले; परंतु नोकरीतून काढून टाकले नाही. या काळात उमाजींनी इंग्रजांविरोधात सैन्य जमवण्यास सुरुवात केली होती. भाईचंद भीमजी प्रकरणात त्यांनी पैसे उकळल्याचे प्रकरण समोर आल्यावर इंग्रजांनी अचानक उमाजींना कैद केले; मात्र त्यातूनही निसटून ते कऱ्हे पठारावर गेले. या ठिकाणाहून इंग्रजांच्या विरोधात त्यांनी कारवाया सुरू केल्या.

इंग्रजांनी उमाजींना पकडण्यासाठी ॲलेक्झांडर मॅकिंटॉश यांची नियुक्ती केली. पुण्याचा कलेक्टर जॉर्ज गिबर्न याने २६ जानेवारी १८३१ रोजी उमाजींविरुध्द जाहीरनामा काढून पुन्हा जनतेला पैशाचे आमिष दाखवले, तथापि उमाजींविरुद्ध कोणीही तक्रार केली नाही. त्यानंतर उमाजींनी इंग्रजांच्या विरोधात आपला जाहीरनामा काढला (१६ फेब्रुवारी १८३१). हा जाहीरनामा ‘स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ म्हणून देखील ओळखला जातो. यामध्ये त्यांनी दिसेल त्या यूरोपियनला ठार मारावे, ज्या रयतेची वतने व तनखे इंग्रजांनी बंद केली आहेत, त्यांनी उमाजीच्या सरकारला पाठिंबा द्यावा, त्यांची वतने व तनखे आपण त्यांना परत मिळवून देऊ; कंपनी सरकारच्या पायदळात व घोडदळात असणाऱ्या शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावावेत, अन्यथा आपल्या सरकारची शिक्षा भोगण्यास तयार राहावे व कोणत्याही गावाने इंग्रजांना महसूल देऊ नये, नाहीतर त्या गावांचा विध्वंस केला जाईल, असा इशारा उमाजींनी दिला होता. उमाजींनी आपण सर्व हिंदुस्तानसाठी हा जाहीरनामा काढला आहे, असा उल्लेख होता. संपूर्ण भारत एक देश अथवा एक राष्ट्र ही संकल्पना यामध्ये दिसून येते. तसेच यामध्ये हिंदू-मुसलमान राजे, सरदार, जमीनदार, वतनदार, सामान्य रयतेचा समावेश होता. या जाहीरनाम्यानंतर उमाजींनी ‘समस्त गडकरी नाईक’ यांना उद्देशून एक पत्रक काढले व इंग्रजाविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले.

उमाजी व त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व मराठवाड्यात अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक इंग्रज अधिकारी नेमले गेले. ८ ऑगस्ट १८३१ रोजी इंग्रजांनी आणखी एक जाहीरनामा काढून उमाजींना पकडून देणाऱ्यास १०,००० रु. बक्षीस व ४०० बिघे जमीन देण्याचे जाहीर केले. या आमिषाला उमाजीचे दोन साथीदार काळू व नाना हे बळी पडले. त्यांनी उमाजींना १५ डिसेंबर १८३१ रोजी स्वत: पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. त्यानंतर इंग्रजांनी उमाजींना पुणे येथे ३ फेब्रुवारी १८३४ रोजी फाशी देण्यात आली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून घडून आलेला हा पहिला क्रांतिकारी प्रयत्न होता.

संदर्भ :

  • Mackintosh, Alexander, An Account of the Origin and Present Condition of the Tribe of Ramoossies: including the life of chief Oomiah Naik, Bombay, 1833.
  • आठवले, सदाशिव, उमाजीराजे–मुक्काम डोंगर, पुणे, १९९१.
  • खोबरेकर, वि. ग. इंग्रजी सत्तेविरुद्ध महाराष्ट्रातील सशस्त्र उठाव (१८१८-१८६०), मुंबई, १९५९.
  • झांबरे, स. ध. महान भारतीय क्रांतिकारक (१७७०-१९००), महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, २००७.
  • नऱ्हे, शंकर, उमाजी नाईक, पुणे, २००१.

                                                                                                                                    समीक्षक : अरुण भोसले; सरोजकुमार मिठारी