युक्रेनमधील डोनेट्स्क प्रांताची राजधानी आणि एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र. यास स्टालिनो शहर असेही म्हणतात. लोकसंख्या सुमारे ९,६,००० (२०१९). युक्रेनच्या आग्नेय भागात कॅल्मीअस नदीकाठावर हे शहर वसले आहे. रशियन सम्राज्ञी कॅथरिन द ग्रेट हिच्या कारकीर्दीत येथील मूळ वसाहत अॅलेक्झांड्रोफ्का या नावाने ओळखली जात होती. इ. स. १८६९ मध्ये या शहराची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला डोनेट्स या समृद्ध कोळसा क्षेत्रात काम करण्यासाठी वेल्समधून आलेले कामगार येथे वास्तव्यास होते. त्यामुळे इंग्लिश कॉलनी म्हणून हे ठिकाण परिचित होते. ब्रिटिश वस्तीमुळे या शहराचा आराखडा व वास्तुकलेवर ब्रिटिश छाप दिसते. इ. स. १९२४ पर्यंत हे ठिकाण ‘यूझफ्का’ या नावाने ओळखले जात होते. ऑक्टोबर क्रांतीनंतर इ. स. १९२४ मध्ये त्याचे स्टालिन, तर इ. स. १९२९ मध्ये त्याचे स्टालिनो असे नामकरण करण्यात आले. सोव्हिएट युनियन राजवटीत रशियातील स्टालिनवरून आलेली सर्व नावे बदलण्याच्या धोरणाचा भाग म्हणून १९६१ मध्ये या शहराचे सांप्रत वापरात असलेले डोनेट्स्क असे नामांतर करण्यात आले.
वेल्समधील (ग्रेट ब्रिटन) उद्योजक जॉन ह्यूझ यांनी येथे इ. स. १८७२ मध्ये लोह-पोलाद व कोळसा खाणकाम उद्योगाची स्थापना केली. रशियात लोहमार्गांचा वेगाने विकास केला जात होता. या कारखान्याच्या स्थापण्यामागे या लोहमार्गांसाठी लागणार्या सर्व साधनांची निर्मिती करणे, हा मुख्य उद्देश होता. या उद्योगाला लागणारा दगडी कोळसा जवळच्याच डोनेट्स या कोळसा क्षेत्रातून उपलब्ध होत असे. या कारखान्याच्या स्थापनेपासून शहराच्या औद्योगिक विकासास गती मिळाली. सोव्हिएट राजवटीत कोळसा खाणकाम व लोह-पोलाद निर्मिती उद्योगांचा येथे वेगाने विकास होत गेला. आजही हे शहर या दोन उद्योगांसाठी अग्रेसर आहे. इ. स. १९१४ मध्ये येथे चार धातुकर्म प्रकल्प व १० कोळसा खाणी होत्या.
दुसर्या महायुद्धकाळात २१ ऑक्टोबर १९४१ रोजी जर्मन फौजांनी या शहरावर आक्रमण केले होते. ८ सप्टेंबर १९४३ रोजी सोव्हिएट फौजांनी पुन्हा त्याचा ताबा मिळविला. या दरम्यान शहराची प्रचंड हानी झाली होती. युद्धोत्तर काळात औद्योगिकीकरणाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविल्यामुळे शहराचा भरीव व शाश्वत आर्थिक विकास घडून आला. अवजड उद्योग आणि कुशल मनुष्यबळाचे येथे केंद्रीकरण झालेले आहे. कोळसा खाणकाम, कोकनिर्मिती, लोह-पोलाद निर्मिती उद्योगांसारखे अवजड उद्योग, यंत्रनिर्मिती, धातु-जोडकाम, कृषी अवजारे, बांधकामासाठीची पोलादी उत्पादने, खाणकामाची यंत्रे, खाद्यपदार्थ निर्मिती, कापड, रसायने, प्लॅस्टिक, पादत्राणे, लाकडी सामान, प्रशीतक इत्यादी निर्मिती उद्योग येथे चालतात. येथे औद्योगिक विकास वेगाने झालेला असला, तरी त्यामुळे काही पर्यावरणीय व पारिस्थितिकीय समस्या आव्हानात्मक बनल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या २०१२ मधील अहवालात जगातील वेगाने लोकसंख्येत घट होणार्या शहरांपैकी एक डोनेट्स्क असल्याचा उल्लेख आहे. शहराची लोकसंख्या २००६ मध्ये ९,९३,५०० होती, ती २०१७ मध्ये ९,१९,००० पर्यंत कमी झाली.
शहराचा विस्तार खाणींमुळे एकसंध न होता ठिकठिकाणी झालेला दिसतो. शहराचे क्षेत्रफळ सुमारे ४२० चौ. किमी. असून त्यात निवासी भाग, औद्योगिक विभाग व खुल्या जागा असे भाग आढळतात. येथील लोहमार्ग स्थानकापासून पोलाद उद्योगांपर्यंतचा ९ किमी. लांबीचा रस्ता मुख्य असून त्याच्या कडेने दुकाने, उपहारगृहे व प्रशासकीय इमारती आढळतात. शहरात विविध शिक्षण-प्रशिक्षण व संशोधन संस्था आहेत. त्यांत विद्यापीठ, तंत्रनिकेतन, खाणकाम प्रशिक्षण, दगडी कोळसा संशोधन, वैद्यकीय व व्यापारी संस्था आणि विविध विज्ञान संशोधन संस्थांचा समावेश होतो. अकॅडेमी ऑफ सायंन्सेस ऑफ युक्रेनची शाखा या शहरात आहे. डोनेट्स्कमध्ये अनेक संगीतिका गृहे असून बॅले नृत्यप्रकार, कळसूत्री-बाहुल्यांचे खेळ, संगीत यांसारख्या सांस्कृतिक सुविधा देणारी रंगमंदिरे व संस्था आहेत. येथे भूशास्त्रीय आणि खनिजविज्ञानविषयक व इतर सांस्कृतिक वस्तुसंग्रहालये आहेत.
सन २०१४ पासून डोनेट्स्क शहर आणि परिसराचा ताबा मिळविण्यासाठी रशियन विभाजनवादी समर्थक सैन्य आणि युक्रेनचे लष्कर यांच्यात डोनबास युद्ध चालू आहे. या संघर्षाचे प्रमुख केंद्र हे शहर आहे. २०१९ मध्ये या शहराचा पूर्ण ताबा ‘डोनेट्स्क पीपल्स रिपब्लिक’ (डीपीआर) ने घेतला आहे.
समीक्षक : नामदेव गाडे