ईशान्य अटलांटिक महासागरातील ग्रेट ब्रिटनची बेटे. यांस झेटलंड बेटे असेही म्हणतात. ग्रेट ब्रिटनच्या अगदी उत्तर भागात असलेल्या स्कॉटलंडच्या मुख्य भूमीपासून ईशान्येस २१० किमी.वर, तसेच ग्रेट ब्रिटनच्या ऑर्कनी बेटांच्या ईशान्येस ८० किमी.वर असलेल्या या द्वीपसमूहात लहान-मोठी सुमारे शंभरावर बेटे आहेत. त्यांपैकी केवळ २० बेटांवरच मनुष्यवस्ती आहे. या बेटांचे एकूण क्षेत्रफळ १,४६८ चौ. किमी. असून लोकसंख्या २२,९२० आहे (२०१९). यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ५९° ४८’ ३०” उ. ते ६०° ५२’ उ. व १° ५२’ प. ते २° ६’ प. असा आहे. या बेटांच्या पश्चिमेस नॉर्वेजियन समुद्र, तर पूर्वेस उत्तर समुद्र (नॉर्थ सी) आहे. स्कॉटलंडचा हा सर्वांत उत्तरेकडील प्रशासकीय विभाग आहे.

मेनलँड (क्षेत्रफळ ९७१ चौ. किमी.), येल (२११ चौ. किमी), अन्स्ट (१२१ चौ. किमी.), फेटलर, ह्वॉल्सी, ब्रेसे, फूल, मकल रो, पाप स्टर, वेस्ट बर, ईस्ट बर, ट्रोंड्रा, नॉस, फेअर ही या द्वीपसमूहातील प्रमुख बेटे आहेत. त्यांपैकी मेनलँड हे या द्वीपसमूहातील सर्वांत मोठे बेट असून त्याच्या उत्तर भागातील रोनस हिल (उंची ४५० मी.) हे सर्वोच्च शिखर आहे. मेनलँड बेटाच्या पूर्वेस ह्वॉल्सी व ब्रेसे बेटे, उत्तरेस येल, फेटलर आणि अन्स्ट (सर्वांत उत्तरेकडील बेट) ही बेटे आहेत. अन्स्ट बेटाच्या सर्वांत उत्तर टोकापासून १.६ किमी.वर ग्रेट ब्रिटनचे सर्वांत उत्तरेकडील ठिकाण असून तेथील खडकाळ टेकडीवर मकल फ्लगा दीपगृह आहे. मेनलँडच्या दक्षिणेस ३९ किमी.वर फेअर बेट असून ते पक्षिनिरीक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

शेटलंड बेटे आकाराने वेडीवाकडी, ओसाड, नापीक, वृक्षरहित आणि दलदलयुक्त आहेत. बहुतेक बेटे सस.पासून केवळ १५० मी. उंचीवर असून त्यांचे किनारे दंतुर आहेत. किनाऱ्यावर लांब व अरुंद उपसागर, आखाते (लॉक) किंवा फ्योर्ड प्रकारचे किनारे आढळतात. फ्योर्ड किनाऱ्यांना स्थानिक लोक व्हो म्हणतात. व्होभोवती तीव्र उताराच्या टेकड्या आढळतात. त्याशिवाय किनाऱ्यांवर समुद्रकडे, गुहा, सागरखुंट (स्टेक) व भूशिरे आहेत. मोठ्या बेटांवर गोड्या पाण्याची सरोवरे व ओढे आढळतात. उत्तर धृववृत्तापासून केवळ ६४० किमी. अंतरावर असूनही गल्फ या उष्ण प्रवाहाच्या प्रभावामुळे येथील हवामान सौम्य व दमट आहे. येथे वेगवान वारे जवळजवळ सातत्याने वाहत असतात व अनेकदा तीव्र वादळे उद्भवतात. त्यामुळे वनस्पती अतिशय विरळ आढळतात. उन्हाळ्यातील व हिवाळ्यातील सरासरी तापमान अनुक्रमे १३° से. ते ३° से. असते.

लर्विक शहर, मेनलँड

अश्मयुगापासून येथील काही बेटांवर वस्ती असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. मेनलँड बेटाच्या दक्षिण टोकावरील जार्लशॉफ येथील उत्खननात ब्राँझ व लोहयुगकालीन वस्तू सापडल्या आहेत. सातव्या-आठव्या शतकात येथील सेंट निनिअन बेटावर आयर्लंड किंवा पश्चिम स्कॉटलंडमधून ख्रिश्चन धर्मप्रसारक आले होते. त्यांनी येथील स्थानिक रहिवाशांचे धर्मांतर घडवून आणले. आठव्या व नवव्या शतकांत नॉर्मन (व्हायकिंग) टोळ्यांनी या बेटांवर आक्रमण केले. पंधराव्या शतकापर्यंत ही बेटे त्यांच्या ताब्यात होती. नॉर्वेचा राजा क्रिस्त्यान पहिला यांनी आपली राजकन्या मार्गारेट हिच्या विवाहाप्रित्यर्थ स्त्रीधन म्हणून ही बेटे स्कॉटलंडचा राजा जेम्स तिसरा यांना देण्याचे मान्य केले (इ. स. १४६९). जेम्स तिसरा व मार्गारेट यांच्या विवाहानंतर इ. स. १४७२ मध्ये कायदेशीर रित्या ही बेटे स्कॉटलंडच्या ताब्यात आली. स्कॉटिश इतिहास आणि परंपरा यांच्या मुख्य प्रवाहापासून ही बेटे कधीच वेगळी राहिली नाहीत. अठराव्या शतकापर्यंत नॉर्न (ओल्ड नॉर्स) ही येथील प्रमुख भाषा होती. त्यामुळे बेटांवरील अनेक व्यक्ती आणि स्थळांची नावे नॉर्स भाषेतील आहेत. दोन्ही महायुद्धांच्या काळात या बेटांवर ब्रिटिश हवाई दल, नौदल व भूदलाचा तळ होता. १९७५ पासून स्कॉटलंड शासनांतर्गत मंडळाकडून येथील कारभार पाहिला जातो.

शेटलंड बेटावर क्राफ्टिंग प्रकारची म्हणजे अगदी मर्यादित प्रमाणात उपलब्ध असलेल्या लागवडीयोग्य लहान लहान जमिनीच्या तुकड्यांवर निर्वाह शेती केली जाते. ओट, बार्ली, बटाटे इत्यादी येथील कृषिउत्पादने आहेत. तसेच अशा क्राफ्टरना समाईकातील कुरणांवर (स्कॅटल्ड) मेंढ्या चारण्याचा अधिकार असतो. येथे मेंढपाळ व्यवसायही महत्त्वाचा असून मेंढ्यांपासून उत्तम प्रतीची लोकर मिळते. बेटांवरील कारागिर या लोकरीपासून उत्तम प्रतीची लोकरी कपडे विणतात व त्यांची निर्यातही करतात. शेटलंड आणि फेअर हे येथील लोकरी कापडाचे वैशिष्ट्यपूर्ण आदर्श नमुने आहेत. अनेक क्राफ्टरना शेती व मेंढपाळ व्यवसायातून आपल्या कुटुंबाच्या गरजा भागविता येत नाहीत. त्यामुळे असे लोक उत्तर समुद्रातील तेल उद्योगांत, देशाच्या नौसेनेत किंवा परदेशांत नोकरी करतात. मासेमारी हा येथील नेहमी चालणारा परंपरागत प्रमुख व्यवसाय आहे. शेतीबरोबरच क्राफ्टर लोक आपली अन्नाची गरज भागविण्यासाठी आणि उत्पन्न मिळविण्यासाठी मासेमारी करतात. स्कॅलोवे (बेटांची प्राचीन राजधानी), बर, ह्वॉल्सी व स्केअरीझ ही द्वीपसमूहातील प्रमुख मासेमारी बंदरे आहेत. येथील शेटलंड तट्टू आणि धनगरी कुत्री प्रसिद्ध आहेत.

उत्तर समुद्रात खनिज तेलाचा शोध लागला आणि येथील लोकांचे जीवनमान बदलून गेले. १९७० च्या दशकात उत्तर समुद्रातून खनिज तेलाच्या उत्पादनास सुरुवात झाली. उत्तर

सम्बर विमानतळ, मेनलँड

समुद्रातील खनिज तेलाचे प्रमुख साठवण व वितरण केंद्र मेनलँड बेटाच्या उत्तर भागातील सलॉन व्हो येथे बांधण्यात आले. उत्तर समुद्रातील खनिज तेल नळमार्गाने येथपर्यंत आणले जाते. तेव्हापासून परंपरागत जीवनमान आढळणाऱ्या या बेटांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आगमन झाले. खनिज तेलाची येथून पुढील वाहतूक सुरक्षित व खोल पाणी असलेल्या येल साऊंड (सामुद्रधुनी) मार्गे तेलवाहू जहाजांच्या साहाय्याने केली जाते. या बेटांवरील खनिज तेल उद्योगाच्या विकासामुळे मेनलँड बेटाच्या दक्षिण टोकाशी असलेल्या सम्बर विमानतळाचेही महत्त्व वाढले. बेटा-बेटांदरम्यान तसेच मुख्य भूमीशी फेरी वाहतूक चालते. खनिज तेल उद्योगासाठी पुरविल्या जाणाऱ्या वस्तू व सेवांमुळे शेटलंड बेटांची अर्थव्यवस्था चांगलीच सुधारली आहे. मेनलँड बेटावरील लर्विक हे या द्वीपसमूहातील सर्वांत मोठे नगर, प्रमुख बंदर, व्यापारी व प्रशासकीय केंद्र आहे. लर्विक येथील म्यूझीयम आणि आर्काइव्ह्ज (२००७) मध्ये ठेवलेल्या मानवनिर्मित वस्तूंवरून व शिल्पांवरून या बेटांचा प्राचीन वारसा प्रतिबिंबित होतो. अन्स्ट बेटावर सॅक्सव्हर्ड हे प्रमुख रडार केंद्र आहे. अप्रतिम सृष्टिसौंदर्यामुळे ही बेटे पर्यटनाच्या दृष्टीनेही प्रसिद्ध आहेत.

समीक्षक : माधव चौंडे

https://www.youtube.com/watch?v=IFY2wS2hpZs