कांताबाई सातारकर : (१९३९) महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वगसम्राज्ञी. गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्या पोटी कांताबाईंचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबात तमाशाचा कोणताही वारसा नव्हता. गुजरातमधून पुढे त्यांचे आईवडील सातारा या मूळगावी आले. साताऱ्याला आल्यावर कांताबाई आपल्या बाल सवंगड्यांसोबत खेळताना नृत्य करायच्या. साताऱ्याला विविध उत्सवप्रसंगी मेळे व्हायचे. या मेळ्यातील नर्तिका पायात घुंगरे बांधून नृत्य करायच्या ते कांताबाईंना मनापासून आवडायचे. मेळ्यात बघितलेल्या नृत्याची नक्कल करताना सुतळीच्या तोड्याला बांधलेल्या बाभळीच्या वाळलेल्या शेंगा घुंगरे म्हणून त्या पायात बांधायच्या. कोणत्याही गुरुविना छोट्या मित्र मैत्रिणींसमोर नृत्य सादर करता करता वयाच्या नवव्या वर्षी त्यांना साताऱ्यातील नवझंकार मेळ्यात नृत्याची संधी मिळाली आणि त्यांचा कलाप्रवास सुरु झाला.

काही महिन्यातच  सातारा जिल्ह्यातल्या सर्जेराव अहिरवाडीकर यांच्या तमाशात त्या काम करू लागल्या. अहिरवाडीकरांच्या तमाशात काम करताना कांताबाई सातारकर हे नाव गाजायला सुरुवात झाली. इतर तमाशा फड त्यांना आपल्या तमाशात घेण्यासाठी प्रयत्न करू लागले. शिवराम व भिवराम बाबर, बाबुराव पुणेकर या तमाशात काम करताना त्यांना पुण्या मुंबईत वेगवेगळ्या थियेटरमध्ये सादर होणाऱ्या तमाशा फडांबद्दल माहिती मिळाली. घरच्यांची परवानगी मिळत नाही हे बघितल्यावर त्या एकट्याच मुंबईला पळून गेल्या. मुंबईत हनुमान थियेटरमध्ये दादू इंदुरीकरांच्या फडात दाखल झाल्या. त्याचवेळी हनुमान थियेटरमध्ये तुकाराम खेडकर यांचाही तमाशा फड होता. खेडकरांचा तमाशाचा बाज बघितल्यावर त्यांनी खेडकरांच्या तमाशात जाण्याचा निर्णय घेतला. तुकाराम खेडकर यांच्या तमाशात कलाकार म्हणून काम करता करता त्यांच्यातील अस्सल कलाकार घडत गेला. खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली. पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक झाली. रायगडाची राणी अर्थात पन्हाळगडचा नजरकैदी, पाच तोफांची सलामी, महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, जय विजय, गवळ्याची रंभा अशा अनेक धार्मिक, पौराणिक, रजवाडी, सामाजिक आशय असलेल्या वगनाट्यातून ही जोडी ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. मुंबईतला गिरणी कामगार तर या जोडीचा अभिनय बघण्यासाठी पुन्हा पुन्हा हनुमान थियेटरला जाऊ लागला. कांताबाईना अनिता, अलका, रघुवीर व मंदाराणी अशी चार अपत्ये झाली. १९६४ मध्ये येवला तालुक्यातील एका खेडेगावात तमाशा सुरू असताना अचानक तुकाराम खेडकर यांची तब्येत बिघडली. त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला नेत असताना खेडकरांचे निधन झाले. खेडकर गेल्यानंतर शब्दशः वनवास म्हणता येईल अशी अवस्था कांताबाईंच्या आयुष्यात आली. त्यांना पतीच्याच तमाशातून बाहेर पडावे लागले.

तमाशाच्या बोर्डावर शिवाजी संभाजी या पुरुषी भूमिका रंगवणाऱ्या कांताबाई खऱ्या आयुष्यातही तशाच धाडसी होत्या. त्यांनी खानदेशात आनंदराव महाजन यांच्या तमाशात काही काळ काम केले. पण कधीकाळी पतीच्या म्हणजे स्वतःच्याच तमाशा फडात मालकीण म्हणून काम केलेल्या कांताबाईंना दुसऱ्याच्या फडात काम करणे रुचत नव्हते. त्यांनी अवघ्या चार पाच वर्षात जिद्दीने पै-पै जमवून काही रक्कम जमा केली. त्यावेळी चंद्रकांत ढवळपुरीकर सह बाबुराव सविंदेकर सोबत दत्ता महाडिक पुणेकर हा तमाशा फड सर्वत्र गाजत होता. ही सर्व मंडळी तुकाराम खेडकर यांना मानणारी होती. यांच्याकडे तमाशाचे काही सामान विक्रीला आहे हे कळल्यावर कांताबाईंनी जुने स्टेज, तमाशाच्या सीन सिनरीचे तीन जुने पडदे, स्टेजवर लावायची चांदणी, एक ताडपत्री आणि जुनी बाजाची पेटी विकत घेतली. संगमनेरजवळच्या वडगावपानला सर्कसचे तंबू शिवले जायचे तिथे एक तंबू शिवायला टाकला. एक जुनी गाडी विकत घेतली आणि एक भाड्याची गाडी घेतली. १९६९ मध्ये कांताबाई सातारकर सह मास्टर रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ या नावाने स्वतःचा तमाशा फड सुरु केला. एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत मात्र स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे खचितच आढळतील. कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब वठवल्या की पुरुष कलाकारांना त्या भूमिकांची नक्कल करावी वाटायचे.

कन्या अनिता आणि अलका याही कांताबाईंबरोबर तमाशात काम करायच्या. सुमारे दहा वर्षे तमाशा चालवल्यावर  पुन्हा आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. तमाशा फड बंद पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण याही वेळी कांताबाई खचून गेल्या नाहीत. त्यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना आपली अडचण सांगण्याचे ठरवले. सोबत दोन तीन कलाकार घेऊन त्या मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटल्या. आपली अडचण सांगितली. आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्री पवारांनी व्यक्तिगत पातळीवर पंधरा हजार रुपये मदत केली. संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी व पुढे सिक्कीमचे राज्यपाल झालेले श्रीनिवास पाटील यांनी एका राष्ट्रीयीकृत बँकेद्वारा त्यांना कर्ज मिळवून द्यायला मदत केली. पुनश्च हरिओम म्हणत कांताबाईंनी तमाशाला सुरुवात केली. तमाशा नव्याने सुरू झाला. मुलगा रघुवीर सोंगाड्या म्हणून तमाशा रंगभूमीवर कार्यरत झाला आणि तेव्हापासून महाराष्ट्रातील अग्रगण्य तमाशा फड म्हणून या तमाशाची ओळख आहे.

कांताबाई सातारकर यांचे वैशिष्ट्य म्हणजे सातत्याने नवनवीन प्रयोग करीत रहाणे. पुण्यात तमाशा असला की त्या वर्तमानपत्रात आपल्या तमाशाची जाहिरात करायच्या. रायगडची राणी या वगनाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कांताबाई सातारकर करणार असा उल्लेख असलेली जाहिरात प्रेक्षकांना आकर्षित करायची. तमाशाला पांढरपेशा म्हणवणारी मंडळी तर यायची पण शे दीडशे स्त्रियाही हमखास येऊ लागल्या. रायगडची राणी  हे वगनाट्य त्यातल्या कांताबाई सातारकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे गाजलेच पण गवळ्याची रंभा, गोविंदा गोपाळा, १८५७ चा दरोडा, तडा गेलेला घडा, अधुरे माझे स्वप्न राहिले, कलंकिता मी धन्य झाले, असे पुढारी आमचे वैरी, डोम्या नाग अर्थात सख्खा भाऊ पक्का वैरी, कोंढाण्यावर स्वारी आदी वगनाट्यात कांताबाईनी आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली.

कांताबाईंच्या तमाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंब आजही एकत्र राहून तमाशा रंगभूमीची सेवा करीत आहे. त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर खेडकर, मुली अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित व अभिजित, नातसून अमृता, नात पूजा, जावई दीपकराव मेंगजी, गोतान्बर सौन्दाडेकर, राजेश खोल्लम असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे. सन २००५ मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात तंबू लाऊन सिने, नाट्य सृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमानही त्यांना मिळाला आहे.

संदर्भ : क्षेत्र संशोधन