सामान्य बियाणे कोरडी झाल्यास किंवा थंडीने गोठविल्यास त्यांच्यावर दुष्परिणाम होत नाही; ती जिवंत राहतात, रुजून त्यांच्यापासून नवीन रोपटे तयार होऊ शकते. अशी बियाणे पेढ्यांमध्ये साठविता येतात. सुमारे ७५ ते ८० टक्के फुलझाडांच्या बिया सामान्य असतात. उदा., गहू, तांदूळ, ज्वारी, मका वगैरे अन्नधान्ये, कडधान्ये आणि पेरू, केळी, सफरचंद, इ. फळे. याउलट, उद्दाम बियाणांची साठवण करता येत नाही. अशा बियांना निद्रिस्त काळ नसतो. ती कोरडी केल्यास किंवा थंडीने गारठ्ल्यास जिवंत राहत नाहीत वा ते रुजवता येत नाहीत. परिणामी अशी बियाणे पेढ्यांमध्ये साठविता येत नाहीत. सुमारे ५ ते १० टक्के फुलझाडे उद्दाम किंवा हट्टी बियाणे तयार करतात. उदा., आवोकाडो, आंबा, रातांबा, चिकू, लिची, कोको आदि फळे आणि पाण्यात वाढणारी कमळ (Nymphaea caerulia), व्हायोला प्रजाती. खाडीकाठच्या वनात वाढणारे तिवराचे बीही उद्दाम समजले जाते, कारण त्या बियांना निद्रिस्त काळ नसतो.
कॉफीचे बी सामान्य, उद्दाम आणि दोहोंच्या दरम्यान समजले जाते. मंद, अनिश्चित रुजणे – मोड येणे, कुजणे वा रोप अल्पायुषी असणे या कारणांमुळे व्यापारी तत्वावर कॉफीची रोपे मिळत नाहीत. परिपक्वतेची प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने सामान्य बिया उद्दाम झाल्या असाव्यात, कारण या बिया फळात असतानाच रुजल्या आणि त्यांना मोड आले. असाही एक संभव आहे की, अपक्व फळांचा प्रसार झाल्याने या बिया उद्दाम झाल्या असाव्यात. या बियांवर प्रयोग केला असता, सामान्यतः १०० से.पेक्षा कमी तापमानात ते जिवंत राहू शकत नाहीत. परंतु, तेच बियाणे उच्च आर्द्रतायुक्त, खेळत्या हवेमध्ये आणि मार्यादित गारव्यात जेमतेम १ ते २ आठवड्यांपर्यंत साठविता येतात.
उद्दाम बियाणे गोळा करण्यासाठी फळ काही एका पातळीपर्यंत पक्व होणे जरुरीचे असते आणि त्याच वेळी बिया ओल्या वा कोरड्या असताना गोळा करता येतात. काकडी, पपनस, टोमाटो, कलिंगड यांच्या ओल्या बिया फळ अतिपक्व झालेले असते, तेव्हा गोळा करता येतात.
उद्दाम बियांमध्ये हट्टीपणा निर्मितीची क्रिया दोन प्रकारची असते. पहिल्या प्रकारात बियांच्या पेशीतील द्रव्यांचा नाश होऊन हट्टीपणा निर्माण होतो. उदा., ओट या धान्य बियांच्या पेशीच्या आवरणातील स्निग्धतेचा नाश आणि नंतर ३ ते ४ दिवसांत कोरडेपणामुळे प्रथिनांचा नाश होणे असे अत्याधुनिक उपकरणे वापरून केलेल्या प्रयोगांद्वारे दिसून आले आहे; तर दुसऱ्या प्रकारात बियांमध्ये मुक्त विषारी द्रव्ये (free toxic radicals) निर्माण झाल्यामुळे चयापचय क्रियेवर होणारा परिणाम. उदा., चेस्टनटच्या बियांमध्ये कोरडेपणामुळे होणारी चयापचय क्रिया सतत चालू राहून ऑक्सिकरण होते आणि बी निर्जीव होते.
संदर्भ :
- Christian Walters; Patricia Berjak; Norman Pammenter; Kathryn Kennedy and Peter Raven Science: pp. 915-916, 2013.