महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत आढळणारी मुंडा ऊर्फ कोलवंशी आदिवासी जमात. मध्य प्रदेश राज्यातील सातपुडा पर्वतरांग हे या जमातीचे वसतिस्थान असून ती प्रामुख्याने

कोरकू स्त्री-पुरुष

आदिवासी होशंगाबाद, निमाड, खांडवा, बुऱ्हाणपूर, बैतूल आणि छिंदवाडा या जिल्ह्यांत आढळते; तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये यांची वस्ती प्रामुख्याने आढळत असून यवतमाळ, गडचिरोली, नागपूर, वर्धा इत्यादी जिल्ह्यांतही त्यांची वसती आहे. २०११ च्या जनगणनेनुसार कोरकू जमातींची लोकसंख्या ४६,१८,०६८ इतकी होती. कोरकू ही त्यांची स्वतंत्र बोलीभाषा असून मुंडा किंवा खेरवारी भाषासमूहामध्ये तिची गणना होते; मात्र या भाषेला कोणतीही लिपी नाही.

कोरु याचा अर्थ माणूस, कोरकू याचा अर्थ माणसे असा होतो. कोरकू लोकांचे छोटा नागपूरच्या कोरवा जमातीशी पुष्कळ साम्य आहे. कोरकूंना अनेक मानवशास्त्रज्ञ कोल ऊर्फ मुंडा मानववंशाची एक शाखा समजतात. कोरकूंची सर्वांत मोठी शाखा मवासी या नावाने ओळखली जाते. मवासींची लढवय्येपणाबद्दल व लूटमारी करण्याबद्दल ख्याती आहे. कोरकूंची स्वतःच्या उत्पत्तीबद्दलची दंतकथा पुढीलप्रमाणे आहे : रावणाने सातपुडा पर्वतावर मनुष्यवस्ती नसल्याचे पाहून महादेवाला तेथे माणसांची वसती करायला सांगितले. महादेवाने कागेश्वर नावाच्या कावळ्याला सातपुड्यावर तांबड्या मातीचे वारूळ आहे का, ते पाहून येण्यास सांगितले. कावळ्याला तसे वारूळ बैतूलजवळच्या सावलीगढ व भावरगढ या डोंगरात दिसले. महादेवाने तेथील मूठभर माती घेतली व तिच्यापासून नर व नारीच्या बाहुल्या केल्या; पण इंद्रदेवाचा घोडा तेथे आला व त्याने त्या प्रतिमा तुडवून मोडून टाकल्या. असे दोनदा झाले. त्यानंतर महादेवाने कुत्रा केला व त्याच्यात जीव घातला. त्यास पाठवून पुन्हा नर व नारीच्या प्रतिमा करून घेतल्या व त्यांत जीव घातला. त्या आद्य पुरुषाचे नाव मूला व स्त्रीचे नाव मूलाई असून हेच कोरकूंचे पूर्वज होत.

कोरकू जमातीची पूर्वी राजकोरकू म्हणून एक शाखा होती; परंतु त्यांच्या विद्यमान शाखा मवासी, बोपची, निहाल किंवा नाहून, बोंधी, बावरीया, रूमा व बोंदोया या आहेत. त्यांपैकी वीरवृत्तीमुळे मवासी सर्वांत श्रेष्ठ गणले जातात. बावरीयांची वस्ती बैतूल जिल्ह्यात आहे. रूमा अमरावती जिल्ह्यात आढळतात. बोंदोया यांना भोवादाय व भोपा अशीही नावे असून ते वर्धा जिल्ह्यात आढळतात. त्यांची गोत्रनावे देवकपद्धतीवर आधारलेली आहेत. अटकूटल, देवडा, भूरीरान, कसदा, जांबू, बनकू, ताखर इत्यादी गोत्रे त्यांच्यात आढळतात. बेठे, सेलू, सपकार, दर्शिमा, कासदा, धी, लोबो, चौहान, राठोड इत्यादी नावे कुलचिन्हांवरून पडलेली आहेत. त्यांच्यामध्ये बेठेकर, धिकर, सिंग, मौसी, मावरे, दर्शिमा, सेलूकर, सुपकर, अटकोम, बारस्कर, पटेल, लोबो इत्यादी आडनावे आढळून येतात. ते गवळी व राजगोंड लोकांकडून अन्नपाणी स्वीकारतात.

कोरकू स्त्री व पुरुष काटक शरीरयष्टीचे व मध्यम बांध्याचे असून गोल चेहरा, बसके नाक, छोटे डोळे आणि कुरळे केस अशी त्यांच्या चेहऱ्याची ठेवण आहे. त्यांची वेषभूषा पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीची असते. त्यात पुरुष धोतर व स्त्रीया लुगडं परिधान करतात; मात्र आता त्यांचा आधुनिक जगाशी आलेला संपर्क आणि बदलत्या उपलब्धतेनुसार पुरुष शर्ट-पॅन्ट, स्त्रिया साडी-चोळी व विविध प्रकारचे आधुनिक कपडे, तसेच लहान मुले आधुनिक पद्धतीचा पेहेराव करतात. स्त्रिया अलंकारांमध्ये कंगनी (बांगड्या), पोले (पोकळ सलकडे), बहुतस (वाकी), तडीयास (पोकळ वाकी), टगली (भरीव कडे), माला (नाण्यांची माळ), जेमका (चांदीचा सर) असे चांदीचे दागिने वापरतात. वृद्ध स्त्रिया शिशापासून बनविलेली वाकी (मठी) दंडावर घालतात. त्याचबरोबर आता स्त्रिया मंगळसूत्र, नथ, बीऱ्या, बांगड्या इत्यादी सोन्याचे अलंकार ऐपतीननुसार घालताना दिसतात. स्त्रिया लहान वयातच हातावर, गालावर, कपाळावर, पायावर गोंदवून घेतात.

मानवाने केलेली वैज्ञानिक प्रगती पाहता कोरकू आजही बरेचसे मागासलेले आहेत. सातपुडा पर्वतरांगेतील दुर्गम भागामध्ये असलेले वास्तव्य आणि दळणवळणाची कमतरता यांमुळे त्यांच्या वसतीभागांत शिक्षणाचा प्रसारही फार झालेला नाही. आजही मेळघाटात बालमृत्युची समस्या देशासमोरील गहन प्रश्न असून आंतराष्ट्रीय संस्था याकडे खास लक्ष देत आहेत. कोरकूंमध्ये बऱ्यापैकी स्त्री व पुरुष समानता आढळून येते. शेतीपासून बाजारहाटापर्यंत दोघेही सोबत असतात. जीवनातील सर्व अत्यावश्यक कार्यक्रमात स्त्रियांचा सहभाग आढळून येतो.

कोरकूंचा पारंपारिक व्यवसाय शेती असून त्याच्या जोडीला शेतमजूरी हे त्यांचे उत्पन्नाचे साधन आहे. कोरकू स्त्रिया शेती वा मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावतात. काही भागातील कोरकू लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटल्याने ते आपल्या मुलांना शिक्षण देत आहेत. त्यामुळे काही कोरकू तरुण-तरुणी सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळे त्यांचे जीवनमान अल्प प्रमाणात सुधारताना दिसून येते.

कोरकू जमातीमध्ये लग्नाला ‘जुवान्जन’ म्हणतात. त्यांचा विवाह विषमगोत्रीय पद्धतीवर आधारला आहे. त्यांच्यात केवळ आंतरविवाहास मान्यता आहे. महाराष्ट्रातील कोरकूंमध्ये मौंसे, बवारिया, रूमा आणि बोंदोया अथवा बोपचे असे चार आंतरविवाही गट आहेत. लग्नात मुलीला ‘गोणम’ (देज) द्यावे लागत; मात्र आता काही ठिकाणी मुलीकडून देज घेतला जातो. ‘टिका’ म्हणजे लग्ननिश्चितीच्या दिवशी देजची अर्धी रक्कम वधुपक्षाला दिली जाते. लग्नाच्या वेळी लग्नघरी ‘ठुनी’चा मंडप उभारला जातो. ठुनी म्हणजे विविध प्रकारचे लाकडी ओंडके, ज्यामध्ये विवक्षित, अतीविशेष अशी लाकडे वापरली जातात. ठुनी एकूण पाच प्रकारच्या लाकडांच्या ओंडक्यांपासून बनविली जाते. सर्वांत प्रथम बांबू जमिनीत रोवला जातो. बांबू रोवायच्या आधी पान, सुपारी, हळद आणि एक नाणे ठेऊन जागेची मनोभावे पूजा केली जाते. जंगलातून महीन, सालई, सिपना, बास, गुल्लर इत्यादी झाडांचे ओंडके आणून ‘मंडा’ (मांडव-मंडप) बांधला जातो. मंडाचे छप्पर ‘खकरा’ म्हणजे जांभळाच्या पानांनी, तर काही ठिकाणी उंबराच्या पानांनी झाकले जाते.

कोरकू जमातीच्या लग्नात बोरीच्या झाडाला फार महत्त्व आहे. लग्न लागण्यापूर्वी नवरा मुलगा व त्याचे आईबाप बोरीच्या झाडाजवळ जातात. भुमका ऊर्फ पुजारी त्यांना दोर गुंडाळून त्या झाडाला बांधून टाकतो. नंतर एक कोंबडा मारून त्याचे रक्त झाडाच्या मुळाशी शिंपडतो आणि सूर्य व चंद्र यांची प्रार्थना करतो. सूर्य व चंद्र हे कोरकूंचे आद्य पूर्वज व देव आहेत, असे मानले जाते. त्यानंतर सर्व वऱ्हाडी त्या झाडाभोवती नाचतात व गातात. लग्नाची वरात वराच्या घरून वधुगृही जाते. लग्नघरी टाकलेल्या मंडपात नवरा आपल्या नवरीच्या गळ्यात ‘मुचकू’ बांधतो आणि तिला साडी भेट म्हणून देतो. नवरी मुलगी स्वतःच्या पायात जोडवी घालते. लग्नात मेढीभोवती वधूवरांनी सात फेरे घालणे हाच मुख्य लग्नविधी असतो.

कोरकू भाषेत देवाला ‘गोमज’ म्हणतात. कोरकू लोकांचा चंद्र व सूर्य हा पहिला देव, डोंगर हा त्यांचा दुसरा देव आणि मुतुआ हा तिसरा देव होय. मुतुआ देव म्हणजे गाव सीमेवर असलेली दगडांची रास. त्याला प्रतिवर्षी डुक्कर बळी देण्याची प्रथा आहे; मात्र आता ही प्रथा काही प्रमाणात कमी झाल्याची दिसून येते. त्याचबरोबर मेघनाद बाबा हेसुद्धा त्यांचे पारंपारिक देव आहे. घरातील मध्यवर्ती खांबाला ते दैवत माणतात. प्रत्येक कुलातील देवता ही शीव देवतेशी संबंधित असते. पाऊस पडावा अथवा इतर नवस बोलणारे कोरकू लोक पावसाळ्यानंतर ‘नाडपा गडा’ या देवाचे पुजन करतात. या वेळी कोंबडे, बकरे कापतात; नारळ, अगरबत्ती लावून देवाला नैवेद्य दाखवितात व नवस फेडतात. हा देव नदीच्या पुरापासून गावाचे रक्षण करतो व पिण्यासाठी शुद्ध पाणी देतो अशी कोरकू लोकांची श्रद्धा आहे. आंखतीज, गुडीपाडवा, होळी, नागपंचमी, मेघनाद बाबा इत्यादी सण ते साजरे करतात. त्यांच्यात मौखिक गाणे ही परंपरा समृद्ध आहे. ठुला, दंडार, मेठेरा, फागूना इत्यादी नृत्यप्रकार असून धार्मिक व सणाच्या कार्यक्रमा वेळी सर्व कोरकू स्त्री-पुरुष एकत्रितपणे लोकनृत्यात सहभागी होतात.

कोरकू जमातीचे पुजारी परिहार व भुमका असे दोन प्रकारचे असतात. भुमका हा जमातीचा मुख्य पुजारी असतो आणि गावातली सर्व धर्मकृत्ये तोच पार पाडतो. ‘मेरघाटो’ म्हणजे

कोरकू जमातीची बैठक

प्रत्येक कोरकूसाठी त्याच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीमध्ये राखीव जागा असते. तेथे मृतांना पुरतात. मृताला खड्ड्यात ठेवल्यानंतर मृताच्या डोक्याच्या बाजूला तांतुळाच्या पेजेने भरलेले मडके फोडले जाते. नंतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ज्येष्ठतेनुसार थडग्यावर माती टाकतात. मृताच्या थडग्याला प्रथम जलांजली देतात. त्याला ‘पितर-मिलोनी’ असे नाव आहे; पण अखेरचे श्राद्ध करतात त्याला ‘सिडोली’ असे म्हणतात. त्यामध्ये संपूर्ण एक पिढी मृत पावल्यास प्रत्येक मृतात्म्यांच्या स्मरणार्थ एक एक दगड पुरला जाऊन ‘मठ’ उभारला जातो. सिडोली मृत्यू घडल्यापासून चार महिने ते चार वर्षांपर्यंत केव्हाही करतात. त्या वेळी तागाच्या झाडाला सात वेळा पांढऱ्या दोऱ्याचे वेढे देतात व दारूचा नैवैद्य दाखवितात. त्यानंतर ते झाड कापून त्याची फांदी आणून त्याचा खांब करतात व त्याच्यावर चंद्र व सूर्य यांच्या आकृती कोरतात. त्याला ‘मुंडा’ म्हणतात. चंद्र-सूर्याच्या आकृतीखाली कोळी, माणसाचा कान व इतर आकृत्यादेखील कोरतात. मृताच्या नावाने या खांबाची प्रतिष्ठापना करतात व गावभोजन देतात.

संदर्भ :

  • Russel, R. V.; Lal, Hira, Tribes and Castes of Central Provinces of India, Vols. 3-4, London, 1916.
  • Sing, K. S., India’s Communities, Vol. 3, Delhi, 1997.

समीक्षक : लता छत्रे

https://www.youtube.com/watch?v=xjpviYItgv0