‘चिकणरंग चित्रण तंत्रपद्धती’मध्ये रंगद्रव्य सौम्य होण्यासाठी तसेच चित्र सुकल्यावर ते पक्के व्हावे, म्हणून तेल वा पाण्यासारख्या द्राव्य माध्यमात मिसळून चित्रणासाठी वापरले जाते. या तंत्रपद्धतीचा महत्त्वाचा गुण म्हणजे रंग खलविण्याकरिता वापरण्यात आलेले माध्यम हे रंगलेपनाचे साधन म्हणून उपयोगात आणले जाते. या पद्धतीत अंड्यातील पिवळा (बऱ्याचदा पांढराही) बलक, चुन्याची निवळी व निरसे दूध तसेच गोंद, सरस, राळ, वनस्पतींचा चीक यांचा द्राव्य माध्यम म्हणून वापर केला जातो. या पद्धतींना ‘अंडेमिश्रित चिकणरंग चित्रण तंत्रपद्धती’ आणि ‘गोंदमिश्रित चिकणरंग चित्रण तंत्रपद्धती’, असे त्यांतील द्राव्य माध्यमांनुसार संबोधिले जाते. या पद्धतींतील रंगलेप प्रकाश परावर्तित न करणारे आणि संपूर्णपणे जलरंगासारखे पारदर्शक नसतात.

चिकणरंग चित्रण तंत्रपद्धतीत रंगाचे पहिले थर पातळ द्यावे लागतात आणि हळूहळू त्यात जाडपणा वाढवावा लागतो. जाड थरांवरही पुन्हा पारदर्शक थर देता येतो आणि त्यामुळे रंगच्छटांचा गहिरेपणा वाढत जातो. हे चित्रण इमारतीच्या आतील तसेच बाहेरील कोरड्या पार्श्वभूमीवर अर्थात भिंती व इतर दर्शनी भागांवर केले जाते. म्हणूनच ही तंत्रपद्धती भित्तिचित्रणातील महत्त्वाचा प्रकार मानली जाते. याव्यतिरिक्त हे माध्यम काष्ठफलक तसेच कॅनव्हासवरील चित्रांसाठीही वापरले जाते.

फायूम शुष्कशव स्त्री-व्यक्तिचित्रे

‘अंडेमिश्रित चिकणरंग चित्रण तंत्रपद्धती’त चूर्ण केलेले रंगद्रव्य अंड्याच्या फक्त पिवळ्या बलकात घोटून त्यात आवश्यकतेनुसार पाणी मिसळून रंगलेपन केले जाते. अंडेमिश्रित तंत्रपद्धतीचा काळ साधारण प्राचीन इजिप्तपर्यंत मागे जातो. इजिप्तच्या कलाकारांनी रंगद्रव्य सौम्य करण्यासाठी अरबी गोंद, प्राण्यांच्या शरीरातील मज्जा ऊतींपासून तयार केलेला गोंद तसेच दुग्ध प्रथिनांचा बंधक म्हणून वापर केलेला आढळतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इजिप्त येथील उत्तर रोमन काळातील (इ. स. पू. पहिले ते इ. स. चौथे शतक) ग्रेको-रोमन कलाकारांनी केलेली लाक्षचित्रण पद्धतीतील (मेणाच्या माध्यमातील) फायूमची शुष्कशव व्यक्तिचित्रे (Fayum Mummy Portraits) होत. सूक्ष्म निरीक्षणानंतर यांतील बऱ्याच चित्रांमध्ये कुंचल्याने ‘अंडेमिश्रित चिकणरंग चित्रण तंत्रपद्धती’चा वापर करत रेषांकित फटकारे (strokes) केलेले आढळतात. वैज्ञानिक विश्लेषणानंतर यात अंड्याच्या बंधकातील मेदाम्लांची (fatty acids) सूक्ष्म संरचना आढळून आली. लंडन येथील पेट्री संग्रहालयातील शुष्कशव व्यक्तिचित्र (इ. स. चौथे शतक) हे पूर्णत: ‘अंडेमिश्रित चिकणरंग चित्रण तंत्रपद्धती’त केलेले असल्याचे आढळून आले. थोरला प्लिनी या रोमन निसर्गवैज्ञानिकानेही (इ. स. २४–७९) रोमन लोकांना अंड्यातील बलकाचा चित्रणात कसा वापर करायचा, हे माहीत असल्याचा उल्लेख केलेला आहे.

यूरोपमध्ये मध्ययुगात हे प्राथमिक माध्यम बायझंटिन व सुरुवातीच्या ख्रिस्ती चित्रकारांमध्ये फारच प्रचलित होते. बारावे-तेरावे शतक ते पंधराव्या शतकापर्यंत काष्ठफलकावरील उच्च दर्जाच्या चित्रांसाठी प्रामुख्याने ‘अंडेमिश्रित चिकणरंग चित्रण तंत्रपद्धती’चा वापर झालेला दिसतो. चौदाव्या शतकात प्रबोधनकाळाच्या सुरुवातीस इटली व इतरत्र यूरोपमध्येही ही पद्धती लाकडी चित्रफलकावरील प्रमुख माध्यम म्हणून पुढे आली. इटालियन चित्रकार चेनिनो चेनीनो (Cennino Cennino, १३७०-१४४०) याने ‘अंडेमिश्रित चिकणरंग चित्रण तंत्रपद्धती’चे साहित्य व कार्यपद्धती Il Libro dell’ Arte (१४३७, The Book of Art) या त्याच्या ग्रंथात प्रथमच चित्रित केलेली दिसते. मध्यप्रबोधनकाळात (१४०० – १४५०) या तंत्रपद्धतीने महत्तम प्रगती केल्याचे आढळून येते. या निश्चित तंत्राला उत्तम कलाकौशल्याची जोड मिळाल्याने या काळात या तंत्रपद्धतीत सर्वोत्तम निर्मिती झाल्याचे, हे प्रबोधनकाळातील गिरलांदिओ (Ghirlandaio), बोत्तिचेल्ली (Botticelli), व्हेररॉक्क्यो (Verrocchio) यांसारख्या अनेक चित्रकारांच्या चित्रांतून दिसून येते. बोत्तिचेल्लीने चिकणरंग रंगलेपनावर रेझिन-तैल रंगाचाही वापर केला आहे.

बाप्तिझम ऑफ ख्राइस्ट, १४७५

आंद्रेई देल व्हेररॉक्क्यो (लिओनार्दो दा व्हींचीचे गुरू) हा इटालियन चित्रकार त्याच्या चित्रांसाठी ‘अंडेमिश्रित चिकणरंग चित्रण तंत्रपद्धती’चा वापर करताना, चित्राला अधिक उठाव यावा म्हणून बऱ्याचवेळा चित्र चिकण रंगात रंगवून त्यावर तैलरंग देत असे. त्याने त्याच्या बाप्तिझम ऑफ ख्राइस्ट (सु. १४७५) या चित्रात अशीच दोन्ही माध्यमे वापरली होती. त्याने हे चित्र चिकणरंग तंत्रामध्ये पूर्ण करून लिओनार्दोला त्यातील देवदूत आणि पार्श्वभूमी रंगवायला दिले होते. या तंत्रामध्ये केलेल्या चित्रांना एक तकतकीत पृष्ठभाग असतो, त्यामुळे त्याचे रंग अधिक तजेलदार दिसतात. अंड्याचा पिवळा बलक, पाणी आणि रंगाची पूड एकत्र मिसळून हे रंग तयार केले जात. पातळ रंगाचे पद्धतशीरपणे एकावर एक थर देऊन आणि खारीच्या केसांपासून बनवलेल्या कुंचल्याने (सेबल ब्रश) बारीक फटकारे मारत चित्र रंगविले जाई. उभ्याआडव्या रेषांनी रंगच्छटा आणि आकारांची गोलाई येऊन चित्रातले तपशील जिवंत होत. रंग पाण्यात मिसळणारे असले तरी ते वाळले की जलरोधक (waterproof) होत.

भारतातील चिकणरंग चित्रण तंत्रपद्धती :

भारतात ‘गोंदमिश्रित’ वा ‘सरसमिश्रित चिकणरंग चित्रण तंत्रपद्धती’चा वापर केलेला दिसतो. या तंत्रपद्धतीची भारतातील सर्वांत प्राचीन भित्तिचित्रे अजिंठा येथील लेण्यांमध्ये पाहायला मिळतात. भारतातील प्राचीन संहितांपैकी विष्णुधर्मोत्तर पुराण (सहावे-सातवे शतक) हे अगदी अजिंठा येथील भित्तिचित्रांच्या नंतरच्या काळात लिहिले गेले असल्याने, तेथील चित्रणपद्धती समजून घेणे महत्त्वाचे ठरते. श्रीकुमार यांच्या शिल्परत्न (सोळावे शतक) या दक्षिण भारतीय प्राचीन संहितेमध्ये भित्तिलेपचित्र (fresco) व शुष्कपद्धती (sekko) बरोबर चिकणरंग चित्रण या तंत्रपद्धतीचाही उल्लेख दिसतो.

अजिंठा येथील चिकणरंग चित्रण तंत्रपद्धतीमध्ये प्राथमिक गिलाव्यासाठी जवळच्या वाघुरा नदीतील कमी प्रसरण पावणाऱ्या मृत्तिका, स्फटिक (quartz), चुना यांबरोबरच भाताचे तूस, वनस्पतींचे तंतू आणि बीज यांचा वापर केलेला दिसतो; तर रंगलेपनाच्या थरांसाठी स्थानिक खनिज रंगद्रव्यांबरोबर जैविक समावेशक म्हणून निरसे दुध अथवा केओलीन याचा वापर केलेला दिसतो. [यामध्ये फक्त नीलाश्म (lapis lazuli) पर्शियामधून आयात केलेला असावा].

जयपूर पद्धतीच्या भित्तिचित्रांकरिता चिकणरंग चित्रण तंत्रपद्धतीचा वापर केला जातो. जेमिनी रॉय, गगनेंद्रनाथ टागोर, अवनींद्रनाथ टागोर, असितकुमार हळदर, नंदलाल बोस, कालिपाडा घोष इत्यादी आधुनिक भारतीय चित्रकारांनी आपल्या कलेमध्ये या तंत्रपद्धतीचा वापर भरपूर प्रमाणात केला आहे.

चिकणरंग चित्रण तंत्रपद्धतीवरील वातावरणक्रिया :

द लास्ट सपर

इमारतीच्या बाहेरील पार्श्वभूमीवर म्हणजे भिंतीवर, इतर दर्शनी भागांवर तसेच प्रवेशद्वारांवर केलेल्या चिकणरंग चित्रण तंत्रपद्धतीतील चित्रणांचा प्रखर सूर्यप्रकाश, पाऊस यांच्याशी थेट संपर्क होतो. अशा संपर्कामुळे वातावरणी अपक्षय होऊन अंतर्भागात केलेल्या चित्रांपेक्षा या भित्तिचित्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. विशेषत: पावसामुळे बऱ्याचदा पृष्ठभागावरील रंगकाम पूर्णत: वाहून जाते. तुटलेल्या फरश्या, भिंती अथवा डागाळलेले छप्पर यांतून पावसाचे पाणी आत शिरते. यामुळे रंग मऊ पडून पाण्याबरोबर वाहून जातात. पाण्याचा अशाप्रकारचा हा शिरकाव इमारतीच्या बांधकामपद्धतीवर, भित्तिचित्रांची स्थिती व वाऱ्याच्या दिशा यांवर अवलंबून असतो. पावसाचे पाणी बऱ्याच वेळा किंचित आम्लधर्मी असते. हवेतील प्रदूषित वायूंचे त्यात काही प्रमाणात विलयन होते; जसे कार्बन डायऑक्साईडाचे कार्बाम्लात (carbonic acid) रूपांतर होऊन गिलाव्यातील चुना विरघळतो व परिणामी चित्रणासाठी दिलेल्या गिलाव्याचे आम्ल-उत्कीर्णन होते. मुळातच नाजूक स्वरूपातील असलेल्या या चित्रणातील मृत्तिकाही पावसाच्या थेट संपर्कामुळे पूर्णत: वाहून जातात. उदा., लिओनार्दोचे मिलान येथील द लास्ट सपर हे भित्तीचित्र. हे चित्र (काही तज्ज्ञांच्या मते) फ्रेस्को-सेक्को या प्रकारांतील असले तरी त्यासाठी त्याने ‘अंडेमिश्रित चिकणरंग चित्रण तंत्रपद्धती’चा वापर केलेला दिसतो. लिओनार्दोने अंड्यातील अल्ब्युमिन व विशिष्ट प्रकारचा गोंद मिसळून तयार केलेल्या द्रावणाचा सुकलेल्या गिलाव्यावर थर दिला. रंगच्छटा तयार करताना अंजिराच्या झाडापासून तयार केलेल्या चिकाबरोबरच (fig latex) त्याने तेलाचाही वापर केला. याचा दुष्परिणाम असा झाला की, लिओनार्दोच्या हयातीतच या भित्तिचित्राला तडे जायला सुरुवात झाली होती. तज्ज्ञांच्या मते द लास्ट सपर या भित्तिचित्राच्या विनाशाची बीजे लिओनार्दोने वापरलेल्या रंगलेपनाच्या तंत्रात होती. शिवाय मिलानच्या हवामानाने त्यात भर घातली. या काळात आल्प्स पर्वत हिमविरहित होता; हिवाळे अतिशय कोरडे होते. त्यामुळे प्लास्टर लवकर वाळून चित्राला भेगा व तडे पडायला सुरुवात झाली. हे चित्र १४९७ मध्ये पूर्ण झाले होते; परंतु १५०० साली महापूर आल्याने भिंती दमट होऊन चित्राच्या खपल्या पडू लागल्या होत्या. १५५६ मध्ये वासारी या इटलीच्या चित्रकाराने द लास्ट सपर प्रत्यक्ष पाहिले, तेव्हा त्याने केलेल्या नोंदीत चित्रामध्ये रंगांच्या धबधब्यापलीकडे फारसे काही दिसतच नव्हते, असा उल्लेख आहे.

पहा : भित्तिचित्रण

संदर्भ :

  • Agarwal, O.P.; Pathak, Reshma, Examination and Conservation of Wall Paintings : A Manual, New Delhi, 2001.
  • Chakrabarti, Jayanta, Techniques in Indian Mural Painting, K.P. Bagchi and Company, Calcutta, 1980.
  • Lal, B.B., Conservation of Wall Painting in India, Indian Association for the Study of Conservation of Cultural Property, New Delhi, 1996.
  • Singh M.; Arbad, B. R. ‘Ancient Indian Painting Recipes and Mural Art Technique at Ajanta’, in International Journal of Conservation Science, Vol. 5, Issue 1, 2014: 35-50.
  • Thompson, D.V. Jr., The Practice of Tempera Painting: Materials and Methods, New York, 1936.
  • घारे, दीपक, लिओनार्दो बहुरूपी प्रतिभावंत, मुंबई.                                                                                                                                                                                                                        समीक्षक : मनीषा पोळ