शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करायच्या अनुदेशनाची कामे संगणक तंत्राद्वारे करणे, म्हणजे संगणक साहाय्यित अनुदेशन होय. यामध्ये अभ्यासविषयाशी संबंधित माहिती पुरविणे, त्यावर आधारित विविध प्रकारचे प्रश्न विचारणे; विद्यार्थ्यांनी चुकीचे उत्तर दिल्यास प्रत्याभरणाद्वारे चुकलेले उत्तर दुरुस्ती करण्यास साहाय्य करणे; जिज्ञासू विद्यार्थ्याला अद्ययावत माहिती पुरवून अध्ययनास प्रेरित करणे; संकल्पना, तत्त्वे, नियम समजावून सांगणे व त्यांच्या दृढीकरणासाठी अधिकाधिक सराव देणे इत्यादी अनुदेशनाची कामे आहेत. संगणक साहाय्यित अनुदेशनामध्ये विद्यार्थी व संगणक यांच्यात विशिष्ट शैक्षणिक उद्दिष्ट गाठण्यासाठी आंतरक्रिया होत असते.

शालेय शिक्षणात शिक्षक व विद्यार्थी यांच्यात परस्पर आंतरक्रिया होत असतात. त्या वेळी शिक्षक ज्या विषयाचे अध्यापन करीत असतात, त्यासंबंधित ते संदर्भ वापरत असतात. काही वेळा विद्यार्थ्यांचे वर्तन, त्याबद्दलच्या सूचना किंवा विद्यार्थ्यांच्या विषयासंदर्भात असलेल्या काही शंका असतात. शिक्षक विद्यार्थ्यांशी जो संवाद साधतात, त्यातून विद्यार्थ्यांचे शंका निरसन होऊन त्यांना स्वयंअध्ययनाची प्रेरणा मिळते. नवीन वेगळे काहीतरी करून पाहावे, शिकावे अशी इच्छा त्यांच्यात निर्माण होते. आता हेच संगणकाच्या मध्यमातून विद्यार्थी करताना दिसून येत आहे.

अमेरिकेमध्ये १९६० मधील जनगणनेच्या वेळी सर्वप्रथम छोट्या संगणकाचा वापर करण्यात आला. त्यानंतर १९६४ मध्ये Programmed Logic for Automatic Teaching Operations (प्लॅटो) तयार करण्यात आले. या प्लॅटोद्वारे १९६६ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठात अंकगणिताचे स्वाध्याय घेण्यात आले; तर प्लॅटोमुळे प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या वाचनकौशल्याचा विकास झाला. या कृतीशील प्रयोगालाच संगणक साहाय्यित अनुदेशन असे म्हटले जाते. विद्यार्थी जेव्हा आकृत्या, नकाशे, चित्रे, प्रतिकृती बघून सूर्यग्रहण, पृथ्वीचे परिवलन, विविध भौगीलिक प्रदेश, तसेच ऐतिहासिक घटनांबद्दल शिकतात, तेव्हा त्यांचे डोळे व कान या दोन ज्ञानेद्रियांना मर्यादित कालावधीसाठी संवेदना मिळतात; मात्र वर उल्लेख केलेल्या भौगोलिक, ऐतिहासिक घटनांबरोबरच भौमितीक रचना, विज्ञानाचे प्रयोग, भाषेतील कविता, नाटके, मालिका, व्याकरण इत्यादी बाबी जर संगणकाद्वारे अनुभवायला मिळाल्या, तर दृक, श्राव्य यांबरोबरच दृकश्राव्य संवेदना, शारीरिक हालचाली अशा सर्व संवेदनांची अनुभूती मिळून त्या पुन्हा पुन्हा विद्यार्थांना अनुभवायला मिळू शकतात. त्यामुळे अध्ययन अनुभव दृढ व्हायला मदत होते.

संगणक साहाय्यित अनुदेशन ही स्वनिर्देशित/स्वदिग्दर्शित आणि वैयक्तिक पातळीवरची एक अनुदेशन प्रक्रिया असून तीद्वारे अध्ययन घडून येते. अध्ययन प्रक्रिया दर्जेदार होण्यासाठी संगणक साहाय्यित अनुदेशनात मजकूर, चित्रे/आलेख, ध्वनी व दृकश्राव्य या माध्यमांचे एकत्रीकरण केले जाते. शिक्षकाचे काम स्वतः करण्याची संगणकाची तयारी असते. प्रत्यक्ष अनुदेशन प्रस्तुती करणाचे कामदेखील संगणक करू शकतो. हे स्वयंअध्ययनाचे एक तंत्र असून याद्वारे विद्यार्थी ऑफलाईन अथवा ऑनलाईन पद्धतीने अनुदेशित साहित्याशी आंतरक्रिया करून तो सुलभ व प्रभावीपणे शिकतो. संगणकच्या साहाय्यानेच अनुदेशन साहित्य पुरविले जाते आणि घडत असलेल्या अध्ययनाचे नियंत्रण केले जाते. यामध्ये अध्ययनप्रक्रिया गुणात्मकतेने घडावी यासाठी आशय, आलेख, दृकश्राव्य माध्यमांचे एकत्रीकरण केले जाते. संगणक साहाय्यित अनुदेशनामध्ये संगणकाचा वापर साधन म्हणून केला जातो. स्वाध्याय, सराव, अभिरूपता आणि समस्या निराकरण यांमध्ये आशयाचे सादरीकरण तसेच विद्यार्थ्यांना आशय समजावा यासाठी संगणक साहाय्यित अनुदेशन उपयुक्त ठरते.

संगणक साहाय्यित अनुदेशन हे संगणक व अध्ययनकर्ता यांच्या आंतरक्रियेवर अवलंबून असून मानवी अध्ययन हे त्याचे उद्दिष्टे असते. विद्यार्थ्याला प्रत्यक्ष माहिती देऊन त्याला विशिष्ट पातळीपर्यंत नेण्यासाठी संगणकामध्ये आवश्यक ती माहिती भरून ठेवलेली असते. विद्यार्थ्याला स्वतः व्यक्तिगत रित्या, स्वतःच्या वेगाने अध्ययन करता यावे, अशी व्यवस्था संगणकामध्ये केलेली असते. व्यक्तीच्या गतीने, कोणत्याही क्षणी व सवडीनुसार वापर करणे, दिलेल्या प्रतिसादावर त्वरित प्रत्याभरण करणे, सर्व प्रकारच्या अध्ययन-अध्यापनात वापर करणे, एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना अध्यापन करता येणे इत्यादी संगणक साहाय्यित अनुदेशनाची गृहीतके आहेत.

संगणक साहाय्यित अनुदेशनाचे प्रकार :

  • १) संवाद : विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना आवश्यक ती विशिष्ट माहिती संगणकामध्ये भरलेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन करताना त्यांना जी माहिती हवी असेल, ती संगणकाला प्रश्न विचारून मिळवू शकतात. विद्यार्थ्याने संगणकाला प्रश्न विचारायचा व उत्तर मिळवायचे असा प्रकार येथे अभिप्रेत असतो. यामध्ये विद्यार्थ्यी अध्ययन करताना त्यांना प्रश्न निर्माण होणे महत्त्वाचे आहे. फ्रेइरे आणि रोमन फ्लेचा या शिक्षणतज्ज्ञांनी अध्यापनाशास्त्राचे तंत्र म्हणून संवादाबाबत अनेक प्रकारच्या आंतरक्रिया असणारे सैद्धांतिक भाग व तंत्र विकसित केले. उदा., शिक्षक व विद्यार्थी यांच्यात होणारे संवाद व विचारांची देवाणघेवाण. संवाद नेहमी समान पातळीवर घडतो. त्यात कोणीही अधिकारी व्यक्ती नसते. हे संवाद प्रत्यक्ष किंवा संगणकाच्या माध्यमातून करता येतात.
  • २) उजळणी : सुधारणा अथवा दुरुस्ती करण्यासाठी एखाद्या गोष्टीत केलेला बदल म्हणजे उजळणी होय. स्मरणात ठेवण्यासाठी ही अतिशय परिणामकारक प्रक्रिया आहे. उजळणी करतांना चाचणी, पूर्वी झालेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका, प्रश्नोत्तरे आणि उजळणी करतांना त्यात अंतर ठेवणे महत्त्वाचे असते. उजळणीमुळे आपल्याला रचना, स्पष्टता व विकास यांतील सुधारणा सूचतात.

उजळणी करतांना उजळणीचे वेळापत्रक तयार करणे, त्यानुसार सराव करणे, वरील कामासाठी विशिष्ट वेळ ठरविणे, सकाळी त्याचे वाचन व तयारी करणे, उजळणी तयार ठेवणे, जुन्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न उजळणीसाठी वापरणे आणि सारांश स्वरूपातील लेखन तयार करणे यांसारखी तंत्रे वापरावी लागतात.

संगणक साहाय्यित अनुदेशनाच्या उजळणी प्रक्रियेत उजळणीतील कृतींची रचना, आशयाची तात्विक मांडणी, अचूक शब्दांचा वापर, योग्य आवाज व शैली, भाषेचा योग्य वापर आणि वाक्यांतील सहजता या कृती महत्त्वपूर्ण असतात.

  • ३) स्वाध्याय : स्वाध्याय ही परस्परांत ज्ञान/माहितीची देवाण घेवाण करण्याची पद्धत आहे. स्वाध्यायात विविध उदाहरणांद्वारे विचारप्रवृत्त केले जाते. संगणकाधारित स्वाध्यायात संगणकावर तयार केलेली व वापरली जाणारी आज्ञावली असते. ही आज्ञावली विविध घटकांची परस्परांची जोडणी व अवलंबित्व लक्षात आणून देते. सॉफ्टवेअर स्वाध्यायाचे तीन प्रकार आहेत. १) दृकश्राव्य स्वाध्याय : यामध्ये स्वाध्याय ऐकूण व पाहूण केले जाते. २) आंतरक्रियात्मक स्वाध्याय : यामध्ये अध्ययन करणारा पडद्यावरील सूचना ऐकून स्वाध्याय लिहितो व प्रत्याभरण मिळवितो. ३) वेबिनार : वेब कॉन्फरंसिंग सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरात कोठेही असलेल्या व्याख्यानांचा लाभ घेवून ऑनलाईन स्वाध्याय देता येतात. परिणामत: संबंधित कार्यशाळेत सहभागी होता येते.

वेबिनार हा प्रकार अधिक गुंतागुंत असते. यामध्ये क्रमावर आधारित पाठ असतात. प्रथम संगणक पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारतो. विद्यार्थ्याने उत्तर दिले की, तो पुढील भाग सादर करतो. अन्यथा पूर्वज्ञानावर आधारित भागावर आशय अभ्यासण्यासाठी देऊन परत पश्न विचारतो. येथे प्रत्याभरण, प्रबलनांचा वापर होतो. स्वयंअध्यापनासाठी हे उपयुक्त साधन आहे.

  • ४) पृच्छा : अध्ययन करताना विद्यार्थांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. अर्थात, ती एक नैसर्गिक कृती आहे. उदा., भूगोलाचे अध्ययन करताना सूर्यग्रहण म्हणजे काय? कंकणाकृती अथवा खंडग्रास ग्रहण म्हणजे काय? इंद्रधनुष्य कधी व का दिसते? पाऊस कसा पडतो? भूकंप कसा होतो? इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी विद्यार्थाला संगणकाचा वापर करता येतो. तेथे त्याला या प्रश्नांची माहिती दृक, श्राव्य, दृकश्राव्य या स्वरूपांत मिळू शकते. माहिती स्वीकारताना जर दुसरा प्रश्न पडला, तर त्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठीही संगणकाचा वापर करता येतो. पडलेल्या प्रश्नाची उत्तरे मिळविण्यासाठी समस्या निराकरण तंत्राचाही वापर केला जातो.
  • ५) अभिरूपता : अभिरूपता ही वास्तव परिस्थितीच्या प्रतीमानाचा आराखडा तयार करणे व चुका आणि शिका (प्रयोग व प्रमाण) या मार्गाने जाणारी प्रयोगांची साखळी निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पुढील आकृतीवरून स्पष्ट होईल.

अभिरूपता ही संगणकाच्या साहाय्याने अनुदेशन करण्यासाठी वापरली जाते. या तंत्रात एखाद्या क्रियेचा किंवा वस्तुचा अभ्यास करण्यासाठी हुबेहूब परंतु भासमय अशी परिस्थिती निर्माण करून अध्यापन केले जाते. विद्यार्थी त्यात प्रतिसाद देतात. त्यामुळे अध्ययनार्थीला आपल्या काही चुका झाल्या, तर त्या लक्षात येतात. यामध्ये खेळ, भूमिका, अभिनय यांसारख्या तंत्रांचा समावेश असतो. अभिरूपतेची प्रक्रिया पुढील आकृतीत दिल्याप्रमाणे चालते.

संगणक साहाय्यित अनुदेशनाचे फायदे : १) संगणक साहाय्यित अनुदेशनामुळे विद्यार्थी स्वत: गतीने अध्ययन करू शकतात. २) विद्यार्थ्यांकडून चुका झाल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी ते पुन्हा पुन्हा सराव करू शकतात. ३) वेळ व श्रमाची बचत होते. ४) संकल्पना, तत्त्वे, नियम, सामान्यीकरण इत्यादी दृढीकरण होण्यास मदत होते. ५) विद्यार्थ्यांचे अध्ययन परिणामकारक होते. ६) विद्यार्थी अध्ययन करते वेळी कोणत्याही क्षणी आपल्या प्रगतीचे मूल्यमापन करू शकतात. ७) अध्ययनाचे प्रबलन होते. ८) विद्यार्थी अध्ययनासाठी संगणकाचा कोठेही वापर करू शकतात. ९) स्किनरच्या अध्ययन उपपत्तीनुसार प्रत्येक घटकाचे छोट्या घटकात रूपांतर करून विद्यार्थ्यांना अध्ययन करता येते. १०) मंदगतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्ययनासाठीसुद्धा संगणक वापरता येतो. ११) संगणक साहाय्यित अनुदेशनाचा उपयोग दुरस्थ शिक्षणासाठी मोठ्या प्रमणात करता येतो इत्यादी.

संगणक साहाय्यित अनुदेशनाच्या मर्यादा : संगणक साहाय्यित अनुदेशन ही प्रणाली अध्ययनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असली, तरी तीमध्ये काही मर्यादा आहेत. १) शिक्षक व विद्यार्थी यांच्यात आंतरक्रिया होत नाही. २) विचार प्रक्रियेला मार्यदा घातली जाते. ३) ही यांत्रिक प्रक्रिया असल्यामुळे मानसिक थकवा निर्माण होतो, डोळ्यांवर तणाव निर्माण होतो. ४) संगणक साहाय्यित अनुदेशन कार्यक्रम तयार करण्यासाठी अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकाची अथवा तज्ज्ञ व्यक्तीची गरज असते. ५) विद्यार्थ्यांच्या भावनांवर नियंत्रण मिळविता येत नाही इत्यादी.

संगणक साहाय्यित अनुदेशन कार्यक्रम तयार करतांना मजकूर अथवा बहुमाध्यम आशय निश्चिती, बहुपर्यायी प्रश्न विकसन, समस्या मांडणी, त्वरित प्रत्याभरण, चुकीच्या प्रतिसादावर प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे सरांशीकरण, सरावासाठी स्वाध्याय, चाचण्या व कृती पत्रिकांचे विकसन इत्यादी महत्त्वाचे असते. संगणक केवळ शिक्षकाप्रमाणे अध्ययन करीत नसून त्याद्वारे प्रत्यक्षपणे अनुदेशन प्रस्तूत केले जाते.

समीक्षक : अनंत जोशी