नाट्यछटा : मराठीमधील एक गद्य लघुवाङ्मयप्रकार. सुरुवात १९११ पासून. दिवाकर (१८८९–१९३१) यांच्याकडे याच्या जनकत्वाचा मान जातो. दिवाकरांनी आपली पहिली नाट्यछटा १८ सप्टेंबर १९११ रोजी लिहिली आणि या व यापुढील दोन वर्षांत त्यांनी आपल्या एकूण नाट्यछटांपैकी बऱ्याचशा नाट्यछटा लिहून टाकल्या. या नाट्यछटापैकी दोन, १५ एप्रिल १९१३ च्या केसरीच्या अंकातून प्रसिद्ध झाल्या आणि त्यांनतर उद्यान, मनोरंजन, रत्नाकर अशा मासिकांतून इतर नाट्यछटाही प्रसिद्ध झाल्या. नाट्यछटा हे नाव वासुदेव बळवंत पटवर्धन यांच्या सूचनेवरून निश्चित झाले. पटवर्धन हे दिवाकरांचे स्नेही आणि त्यांना पाश्चात्त्य वाङ्मयाच्या अध्ययनात साहाय्य आणि मार्गदर्शन करणारे गुरू. रॉबर्ट ब्राउनिंग ह्या इंग्रजी कवीची काव्ये दिवाकरांनी पटवर्धनांच्या बरोबर वाचली होती. ब्राउनिंगच्या नाट्यात्मक एकभाषितांमुळे (ड्रॅमॅटिक मोनोलॉग) नाट्यछटा लिहिण्याची प्रेरणा दिवाकरांना मिळाली. या आधी मराठीत मनोरंजन आणि करमणूक या नियतकालिकांतून ‘नेपथ्यपाठ’ या नावाने एकभाषितांची पद्धती स्वीकारून केलेले लेखन येत असे. दिवाकरांनी ते पाहिलेले असावे तथापि नाट्यछटांची प्रेरणा आपणास ब्राउनिंगच्या एकभाषितांमुळे झाली, असे त्यांनीच सांगितले आहे.
नाट्यछटा या नावातील ‘छटा’ या लघुत्वसूचक शब्दाने हे लेखन दीर्घ नसावे, अशी जी कल्पना होते, ती खरी आहे. नाट्यछटा सामान्यतः पंचवीस ते पन्नास ओळींइतकी असते. तिच्या नावातील ‘नाट्य’ या शब्दाने लेखकाच्या स्वतःच्या आत्माविष्कारापेक्षा त्याने कल्पिलेल्या व्यक्तीचा आत्माविष्कार अभिप्रेत आहे. नाट्याचे वाहन जो संवाद तोच येथेही या आत्माविष्काराचे वाहन असतो मात्र हा संवाद एकमुखी असतो. यात बोलणारे पात्र एकच, परंतु ते दुसऱ्या एक अथवा अनेक व्यक्तींशी बोलत असते त्या व्यक्तींनी दिलेला प्रतिसाद या एकमुखी संवादात गृहीत आणि सूचित असतो या छटेमध्ये प्रसंग एकच निवडलेला असतो आणि तो नाट्यपूर्ण, लक्षणीय असावा अशी अपेक्षा असते. प्रसंग एकच असल्याने त्याचा परिणामही एकजिनसी होतो. त्याकरिता हे लेखन एकात्म व सुश्लिष्ट असावे लागते. त्याची रचना प्रमाणबद्ध आणि आटोपशीर असणे आवश्यक असते. पात्राला आणि प्रसंगाला अनुरूप अशी भाषा, वेचक मोजक्या शब्दांनी मनोगत व्यक्त करणारी शैली, विरामचिन्हांनीही अर्थ व्यक्त करण्याचे कौशल्य, अर्थसूचक मथळे, अथपासून इतिपर्यंत असणारी वेधकता हे उत्तम नाट्यछटेचे आवश्यक असे विशेष आहेत. नाट्यछटेमधून कल्पिलेल्या व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्ये तिच्या स्वभावातील विसंगती, खोल जिव्हाळ्याची दुःखे, सामाजिक दोष वा अन्याय यांवरील टीका, जीवनावरील भाष्य यांपैकी काहीना काही दिवाकरांनी व्यक्त केलेले असे. त्यांच्या नाट्यछटेचे मूल्य पुष्कळसे आशयातील या विशेषांवर अवलंबून असे. त्यांच्या उत्तम नाट्यछटांत ‘पंत मेले–राव चढले’ ‘वर्ड्स्वर्थचे फुलपाखरू’ ‘फाटलेला पतंग’ ‘बाळा, या नारळाला धक्का लावू नकोस बरे’ ‘पण बॅट नाही’ इ. नाट्यछटांचा समावेश होतो.
दिवाकरांच्या हयातीत आणि त्यानंतर काही वर्षे नाट्यछटांना बहर आला. काही काळ ते नियतकालिकांचे एक नित्याचे अंग झालेले होते. अन्य नाट्यछटालेखकांमध्ये ‘धनंजय’, ‘गोमागणेश’ (ग. कृ. फाटक), कटककर, वि. स. गोगटे, सी. ल. देवधर, कमतनूरकर इत्यादींचा उल्लेख अवश्य करावयास हवा परंतु या लेखकांची दृष्टी प्राध्यान्याने स्वभावविसंगतीवर केंद्रित झालेली होती. त्यामुळे दिवाकरांच्या नाट्यछटांप्रमाणे त्यांत विविधता आणि वजन येऊ शकले नाही. शिवाय दिवाकरांइतकी काटेकोर व काटकसरी परिश्रमशीलताही या नाट्यछटांंच्या पाठीशी नव्हती. दिवाकरांच्या नंतर दहा–पंधरा वर्षांतच या प्रकारच्या लेखनास ओहोटी लागली आणि नाट्यछटा नामशेष का झाली, या विचाराला प्रारंभ झाला. दिवाकरांनी आपल्या कित्येक यशस्वी नाट्यछटांमधून स्वभावविसंगतीवर भर दिला असल्याने, नंतरच्या नाट्यछटाकारांस तेच एक नाट्यछटेचे मूलतत्त्व अथवा यशाचे रहस्य आहे असे वाटून ते त्यातच गुरफटून गेले आणि नाट्यछटेला साचेबंद रूप प्राप्त झाले. साहजिकच त्यांचा वाचकांस आणि लेखकांसही कंटाळा आला अशी नाट्यछटा नामशेष का झाली याची मीमांसा करण्यात येते.
मराठी नाट्यछटेचे इतर भाषिकांनी स्वागत केले असल्याचे दिसत नाही. वि. स. गोगटे यांनी आपल्याच मराठी नाट्यछटांचे भाषांतर गुजरातीमध्ये केले व अगदी अलीकडे त्यांच्या नाट्यछटांचा अनुवाद हिंदीमध्ये होऊ लागला आहे.
संदर्भ :
- कानेटकर, शं. के. मराठी नाट्यछटा, आवृ. दुसरी, पुणे, १९३९.
- लागू, रा. कृ. संपा. नाट्यछटा, आवृ. दुसरी, पुणे, १९३९.