मध्वमुनि : (१६८९-१७३१). मराठी कवी. ते नासिकचे होते. मध्वमुनी हे नीराकाठच्या कळबोळी गावाचे रहिवासी होते, असे कविकाव्यसूचिकार चांदोरकर ह्यांचे मत आहे. मध्वमुनीच्या मूळ नावाबद्दलही अभ्यासकांत मतभेद दिसतात. ते त्र्यंबक असल्याचे गुब्बी सांगतात, तर चांदोरकर ते महादेव असल्याचे नूमद करतात. चांदोरकर ह्यांनी मध्वमुनीचा जन्मशक (१६११ (इ. स. १६८९) असा दिलेला असून त्यांचे निधन शके १६५३ मध्ये (इ. स. १७३१) सेंदुरवाडा येथे झाल्याचे गुब्बी ह्यांनी म्हटले आहे. गुब्बी यांनी मध्यमुनींच्या चरित्राबद्दल दिलेल्या अन्य माहितीनुसार मध्वमुनीच्या वडिलांचे नाव नारायणचार्यांनी व आईचे द्वारामती होते. हे कुटूंब वैष्णव असूनही नारायणाचार्यानी आपल्या पुत्राचे नाव त्र्यंबक असे ठेवावे, ह्यांचा वैष्णवांना राग आलेला होता. त्यामुळे त्यांनी मध्यवाचार्याच्या समोर त्र्यंबकाला उभे केले. त्र्यंबकाच्या बोलण्यातून त्याची पात्रता मोठी असल्याचे मध्वाचार्यांच्या लक्षात आले आणि मध्वाचार्यांनी त्याला ‘ मध्वमुनीवर ’ असे नाव देऊन गौरविले. भक्तिपर मधुर रचना करणारा प्रसिद्ध मराठी कवी आणि कीर्तनकार अमृतराव ह्याचे मध्वमुनी हे गुरू होते, असे म्हटले जाते. तथापि अमृतरावचे गुरू कोण होते, ह्याबद्दल मतभेद आहेत. मध्वमुनींप्रमाणेच अंबिकासरस्वती इत्यादिकांची नावेही अमृतरायाच्या कवितेत येतात.

मध्वमुनींच्या कवितेत काही स्फुट पदे, चरित्रे , आरत्या ह्यांचा समावेश होतो. त्यांनी काही संस्कृत आणि हिंदी काव्यरचनाही केली आहे. त्यांची काव्यरचना मधुर आणी हरिदासी थाटाची आहे. अनेक ग्रंथांचे व ग्रंथकाराचे उल्लेक त्यांच्या कवितेत आढळतात. प्र. व्य. गुब्बी ह्यांनी मध्वमुनींची कविता मध्वमुनीश्वरांची कविता (१९३३) ह्या नावाने संपादिली आहे.

संदर्भ :

  • https://www.transliteral.org/pages/z170521045512/view