पछिनी, फिलिपो( २५ मे, १८१२ – ९ जुलै, १८८३ ) 

इटली देशातील तुस्कानी प्रांतात पिस्तोया या गावी फिलिपो पछिनी यांचा जन्म झाला. इ. स. १८३० मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी फिलिपो यांना पिस्तोया या गावातील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयाची शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांच्या जीवनाचा मार्ग बदलला. सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने मानवी अवयवांचे निरीक्षण आणि शवविच्छेदन करीत ते मान्यताप्राप्त डॉक्टर झाले. त्यांच्या या आवडींमुळे महाविद्यालयातील पहिल्याच वर्षी त्यांना सततच्या निरीक्षणातून काही अज्ञात पेशींचा शोध लागला. या अज्ञात पेशी विशिष्ट मर्यादेपर्यंत कम्पन आणि दाब सहन करू शकतात असे त्यांना आढळून आले होते. त्यांनी आपल्या आवडीखातर तुटपुंज्या बचतीतून एक सूक्ष्मदर्शकदेखील विकत घेतला होता. पण हे संशोधन त्यांना इ. स. १८४० पर्यंत काही कारणांमुळे प्रसिद्ध करता आले नाही. आता या पेशी पछिनी पेशी म्हणून ओळखल्या जातात. या पेशी स्पर्श समजण्याच्या आणि शरीरावरील दाब समजण्याच्या क्रियेत मदत करतात हेही त्यांनी गृहीतक मांडून सिद्ध करून दाखविले होते.

इ. स. १८४० मध्ये त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले. त्यांनतर ते पिसा या गावी शरीरशास्त्र संस्थेत प्रोफेसर पावलो सावी यांचे मदतनीस म्हणून काम करू लागले. इ. स. १८४३ मध्ये त्यांना पिसा येथेच आणखी एका मानवी शरीरशास्त्र संबंधित संस्थेत शिकविण्याची संधी मिळाली.

वयाच्या ३७ व्या वर्षी इ. स. १८४९ मध्ये त्यांची फ्लोरेन्स विद्यापीठात शरीरशास्त्राचे प्रमुख म्हणून निवड झाली. त्या ठिकाणी असलेल्या संग्रहालयाचे नियंत्रक म्हणूनही त्यांनी कार्यभार स्वीकरला होता. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ते त्याच ठिकाणी राहिले. इ. स. १८४४ मध्ये तुस्कानीचा मानववंशशास्त्रज्ञ असलेल्या निकोलाय पॅक्सीनी या सरंजामदाराने खास त्यांच्या वापरासाठी एक चांगल्या क्षमतेचा सूक्ष्मदर्शक फ्लोरेन्स विद्यापीठाला दिला होता. त्याचा वापर करून त्यांनी मानवी नेत्रपटलावर बराच अभ्यास केला आणि त्याविषयीचे आपले शोधनिबंध त्याच वर्षी प्रसिद्ध केले. इ. स. १८६८ मध्ये त्यांनी अजून एक अवतरण सूक्ष्मदर्शक (inverted microscope) बनवून घेतला होता. मूलगामी जीवशास्त्राचे ज्ञान वैद्यकीय शिक्षण घेतांना असले पाहिजे असे त्यांना मनापासून वाटत होते. त्यामुळे फ्लोरेन्स विद्यापीठातील वैद्यकीय शिक्षणक्रमात त्यांनी तसे बदल घडवून आणले होते. त्या काळात हे करणे थोडे धाडसाचे होते पण त्या कार्यात त्यांना यश मिळाले. मात्र त्यासाठी त्यांना संस्थेच्या निर्देशकांचा रोष बरीच वर्षे सहन करावा लागला होता.

फ्लोरेन्स मध्ये इ. स. १८५४-५५ या साली कॉलऱ्याची मोठी साथ आली होती. जागतिक स्तरावरदेखील साथीच्या स्वरूपात असलेला कॉलराहा जीवघेणा रोग ठरत होता. त्यामुळे या रोगावर संशोधन देखील जोरात सुरु झाले होते. पछिनी यांनी रुग्णांच्या रक्ताची आणि विष्ठेची सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने तपासणी केली. तसेच या रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या आतड्यातील त्वचेची तपासणी करून त्यात कोणते बदल झाले याचाही अभ्यास केला. या कामात त्यांना त्यांचे साहाय्य्क फ्रान्सिस्को मॅग्नी यांची मोलाची मदत झाली होती. या त्यांच्या अभ्यासातून त्यांना लाखो सूक्ष्मजीव रक्ताच्या आणि विष्ठेच्या नमुन्यांमध्ये आढळून आले. या सूक्ष्मजीवांची कल्चर भारतातून अभ्यासासाठी यूरोपमध्ये नेण्यात आली होती. पण २ ते ३ वर्षांमध्ये ती नष्ट झाली कारण त्यावेळी कदाचित त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या आणि प्रयोगशाळेत त्यांचे अनुरक्षण करून ठेवण्याच्या पद्धती विकसित झाल्या नव्हत्या. पछिनी यांनी आपले निष्कर्ष Microscopic observations and deductions of pathological studies in the Asian cholera या शोधनिबंधाच्या स्वरूपात  १० डिसेंबर १८५४ साली यांनी फ्लोरेन्समधील मेडिकल फिजिक्स सोसायटीच्या सेमिनार मध्ये वाचले होते आणि नंतर प्रसिद्ध देखील केले होते. कॉलरा हा संसर्गजन्य रोग आहे हे गृहितक देखील त्यांनी जगासमोर ठेवले होते. त्यात आतड्यांना क्षते पडून ऱ्हास होतो आणि शरीरातील आणि रक्तातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते हे आपले निरीक्षण या शोधनिबंधात त्यांनी नोंदविले होते. जीवाणूंच्या हल्ल्यामुळे आतड्यांना क्षते पडून त्याचा नाश होतो हे प्रतिपादन त्यांनी केले. लहान आतड्यांचा पापुद्रा सुटून जीवाणूंच्या अतिजलद वाढीमुळे त्याचा ही विलय होऊ लागतो हे त्यांना ज्या रुग्णांचा या रोगामुळे मृत्यू झाला होता त्यांच्या शवविच्छेदनात आढळून आले होते. त्या जीवाणूंच्या विशिष्ट स्वल्पविरामासारख्या आकारामुळे त्यांचे नामकरण करतांना त्यांनी व्हिब्रिओ  शब्द वापरला होता.

सूक्ष्मदर्शकाखाली केलेल्या निरीक्षणांमधून त्यांनी या व्हिब्रिओची चित्रे काढून ती देखील शोध निबंधात घातली होती. या जीवाणूंची लांबी २ मायक्रोमीटर आणि व्यास ०.५ मायक्रोमीटर आहे हे मोजमाप देखील त्यांनी सूक्ष्मदर्शकातून केले होते. एव्हढे सर्व महत्त्वाचे संशोधन करून, ते प्रसिद्ध करून त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्राच्या आणि वैद्यकीय इतिहासात मोलाची भर घातली आणि जगाला एका जीवघेण्या रोगापासून वाचविण्यासाठी योग्य मार्ग देखील दाखविला होता. परंतु त्यांचे कार्य दुर्लक्षित राहिले आणि त्यांच्या वाटयाला फक्त उपेक्षाच आली. इटली मध्ये इ. स. १८६६ साली ही कॉलरा साथ ओसरल्यानंतर या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजाविल्याबद्दल एका भव्य समारंभात इटालियन सरकारने ज्या लोकांचा पदके देऊन गुणगौरव केला त्यात पछिनी हे नाव नव्हते. इ. स. १८७९ साली त्यांनी या रोगांवर उपाययोजना सुचवितांना सलाईन (मिठाचे द्रावण) वापर करावा असे सांगितले होते. त्यामुळे शरीरातून झपाट्याने कमी होणारे पाण्याचे प्रमाण रोखता येते. पुढे जवळजवळ २० वर्षांनी रॉबर्ट कॉक यांनी इ. स. १८८४ मध्ये कॉलऱ्याच्या व्हिब्रिओचा पुन्हा एकदा शोध घेत जगासमोर आणला. त्यांनी आपल्या पद्धतीप्रमाणे हाच जीवाणू कॉलरा रोगासाठी जबाबदार आहे असेही सिद्ध करून दाखविले. बर्लिन मधील राष्ट्रीय आरोग्य कार्यालयात कॉलरा आयोगासमोर त्यांनी आपला हा शोध सादर केला. त्यावेळी आयोगाने स्पष्ट शब्दांमध्ये पछिनी यांचाही ह्या शोधात गौरवाने उल्लेख केला. पछिनी यांनी वर म्हंटल्याप्रमाणे कॉलरा हा संसर्गजन्य रोग आहे असे अनेक वेळा प्रतिपादन केले होते. एका माणसापासून तो दुसऱ्याला संसर्गाने होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे तेंव्हा यूरोपातील अनेक डॉक्टर मंडळींना मान्य नव्हते. कारण त्या सर्वांचा असा ठाम विश्वास होता की प्लेग आणि कॉलरा ह्या रोगांसाठी ‘वाईट हवा’ किंवा ‘प्रदूषित हवा’ त्याला जबाबदार आहे. कार्बनी किंवा सेंद्रिय पदार्थांच्या विघटनातून अशा हवेची निर्मिती होते. पछिनी आणि त्यांचे समकालीन असलेले जॉन स्नो यांनी या सिद्धांताला विरोध दर्शविला आणि कॉलरा हा संसर्गजन्यच आहे असेतीन चार शोध निबंधातून सांगण्याचा प्रयत्न केला. पण कदाचित प्रस्थापित मताच्या विरुद्ध त्यांचे मत असल्यामुळे त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष झाले.

इ. स. १९६५ मध्ये आंतरराष्ट्रीय नामकरण समितीने व्हिब्रिओ कॉलेरी पछिनी  १८५४ असे नामकरण स्वीकारले आणि पछिनी यांच्या कार्याला अधिकृत राजमान्यता मिळाली.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे