पार्किन, विल्यम हेन्री : ( १२ मार्च १८३८ – १४ जुलै १९०७ )

विल्यम हेन्री पर्किन यांचा जन्म लंडन येथे झाला. वयाच्या १४ व्या वर्षी सिटी ऑफ लंडन स्कूल येथे शिक्षण घेत असताना थॉमस हाल या शिक्षकाने त्यांच्यातील शास्त्रीय गुण ओळखून त्यांना रसायनशास्त्रामध्ये अभ्यास करण्याचा सल्ला दिला. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ केमिस्ट्री येथे प्रवेश घेतला. ही संस्था आता इम्पेरिअल महाविद्यालयाचा भाग आहे. त्या ठिकाणी ऑगस्ट विल्यम वॉन हॉफमन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास सुरुवात केली. रसायनशास्त्रामध्ये जरी अणूची (atomic theory) संकल्पना स्विकारली होती तरी याकाळी रसायनशास्त्र हे अगदीच उर्जितावस्थेत होते.

त्या काळी हिवतापाची (मलेरीया) साथ बऱ्याच मोठ्या प्रमाणात आढळून येत असे. या रोगाच्या उपचारासाठी नैसर्गिक क्युनाइनचा उपयोग करीत असत. परंतु हे औषध खूप महाग होते. हॉफमन यांनी क्युनाइनची निर्मिती कृत्रिमरीत्या शक्य आहे याबाबत एक संकल्पना प्रकाशित केली. या काळात पर्किन हे हॉफमन यांचे सहाय्यक म्हणून काम करीत असल्यामुळे त्यांनी या दिशेने बरेचसे प्रयोग केले. १८५६ साली हॉफमन नाताळच्या सुटीमध्ये आपल्या जन्मगावी गेले असताना पर्किन यांनी आपल्या घरातील प्रयोगशाळेमध्ये काही प्रयोग केले आणि या प्रयोगामध्ये अनपेक्षितपणे ॲनालीन या पदार्थाचा शोध लागला. हा पदार्थ शुद्ध केल्यानंतर त्यांना गडद जांभळा रंग मिळाला.  पर्किन यांना मुळातच रंगकामाची आणि फोटोग्राफीची आवड असल्यामुळे त्यांच्या मनात याबाबत उत्सुकता निर्माण झाली.

त्यांनी आपला मित्र ऑथर चर्च आणि त्याचा भाऊ थॉमस यांच्याबरोबर यासंदर्भात विविध प्रयोग केले. हे सर्व प्रयोग क्युनाइन (quinine) या औषधाच्या निर्मितीशी संबधित नसल्यामुळे पर्किन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ॲनालीन (aniline) संबधीचे प्रयोग स्वत:च्या घरातील प्रयोगशाळेत केले आणि याबाबत गुप्तता पाळली.

या प्रयोगातून त्यांना माउव्हीन (mauveine) या जांभळ्या रंगाच्या पदार्थाचा शोध लागला आणि त्यांनी त्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरवले. या पदार्थाने रेशमाच्या कपड्यांना रंग दिल्यानंतर त्यावर धुण्याचा किंवा सूर्यप्रकाशाचा कोणताही परिणाम होत नाही असे दिसून आल्यामुळे त्यांनी काही नमुने पर्थ, स्कॉटलंड येथील रंगकामाशी संबंधीत प्रसिद्ध असलेल्या कंपनीकडे पाठविले आणि त्यांना कंपनीकडून अतिशय चांगला अभिप्राय मिळाला.

या नवीन संशोधनासाठी त्यांनी ऑगस्ट १८५६ मध्ये माउव्हीनचे पेटंट मिळावे यासाठी अर्ज केला. यावेळी त्यांचे वय अवघे १८ वर्षेच होते. त्याकाळी कपड्यांना रंग देण्यासाठी नैसर्गिक रंगाचा उपयोग करीत असत. परंतु ते महागही होते आणि बराच काळ टिकूही शकत नव्हते. जांभळा रंग हा पुरातन काळापासून प्रतिष्ठीत रंग समजला जात असल्यामुळे त्याला मागणी जास्त होती तसेच त्याची निर्मिती अवघड आणि महागडी असल्यामुळे पर्किन यांना या रंगासाठी कृत्रिम पदार्थाची नितांत आवश्यकता असल्याची जाणीव झाली आणि आपण माउव्हीनचे मोठया प्रमाणात यशस्वीरित्या उत्पादन करू शकू याची खात्री झाली.

इंग्लंड येथे त्या काळात औद्योगिक क्रांतीमुळे कपडा निर्मितीमध्ये प्रचंड प्रगती झाली होती. पर्किन यांनी जरी या पदार्थाचा शोध लावला असला तरी त्याच्या निर्मितीसाठी त्यांना पैशाची कमतरता जाणवू लागली. त्यासाठी त्यांनी आपले वडील आणि इतर भाऊ यांना या प्रक्रियेमध्ये भागीदार म्हणून सामावून घेतले. पर्किन यांनी रंगकामाशी संबंधीत असणाऱ्या कारखान्यांना शास्त्रीय दृष्टीकोनातून मार्गदर्शन केले आणि त्यानंतर आपली ही निर्मिती सर्व जगासमोर आणली.

याच दरम्यान इंग्लंडमध्ये व्हिक्टोरिया राणी आणि फ्रांसमध्ये तिसऱ्या नेपोलियनची पत्नी यांनी जांभळ्या रंगाच्या कपड्यांना प्राधान्य दिल्यामुळे थोड्याच अवधीत या रंगाच्या मागणीने जोर धरला. पर्किन यांच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बाब ठरली आणि त्यांची गरीबी दूर झाली. माउव्हीन या रंगाच्या शोधानंतर इतर बऱ्याच रंगाचा शोध त्यांनी लावला आणि संपूर्ण यूरोपमध्ये बरेच कारखाने सुरू केले.

सूक्ष्मजंतू मूळात पारदर्शक असल्यामुळे सूक्ष्मदर्शकाखाली ते स्पष्ट दिसू शकत नाहीत. यासाठी विशिष्ट रंगद्रवाचा वापर करून त्यांना रंगवावे लागते. माउव्हीन हा कृत्रिम रंग सूक्ष्मजंतूंना रंगवण्यासाठी पार्किन यांनी प्रथमच वापरला. या पूर्वी फेर्दीनंद कोन (Ferdinand Cohn) यांनी कारमाइन आणि हेमाटोझायलीन अशा रंगांचा वापर पेशींना रंगवण्यासाठी केला होता. हर्मन हॉफमन (Hermann Hoffman) यांनी सुद्धा कारमाइन या नैसर्गिक रंगाचा वापर  सूक्ष्मजंतूंना रंगवण्यासाठी केला होता. कार्ल वेईगर्ट (Karl Weigert) यांनी पुढे मिथिलीन ब्लू या कृत्रिम रंगाचा वापर केला. अशा रितीने विशेषत्वाने बॅक्टेरियाला रंग देऊन सूक्ष्मदर्शकाखाली बघितल्यावर त्याच्या विविध आकारांची शास्त्रज्ञांना स्पष्ट कल्पना येऊ लागली. या तंत्राला शास्त्रीय परिभाषेत ‘स्टेनिंग प्रक्रिया’ असे संबोधले जाते.

विल्यम पर्किन यांनी उरलेले आयुष्य सेंद्रीय रसायनशास्त्रामधील संशोधनामध्ये घालवले. यामध्ये बऱ्याचशा कृत्रिम रंगाचे संशोधन आणि त्याची विक्री याचा समावेश होता. हे काम करीत असतानाच त्यांनी कृत्रिम अत्तरासाठी लागणाऱ्या क्युमारिन (coumarin) आणि सिनॉमिक आम्ल (cinnamic acid) या दोन पदार्थाचा शोध लावला. त्यांनी अनथ्रासीन (anthracene) पासून गडद लाल रंगाच्या अलीझारीन (alizarin) या पदार्थाचा शोध लावला आणि त्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली. परंतु या संशोधनाच्या ४० वर्षे आधी म्हणजे १८२६ मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ पीरी रॉबीक्युट (Pierre Robiquet) यांनी अशाच एका लाल रंगाच्या पदार्थाचा शोध लावला होता आणि जर्मनी येथील एका कंपनीने पर्किन यांच्या एक दिवस आधीच या पेटंटसाठी अर्ज केला असल्यामुळे पेटंट मिळवण्याची ती संधी त्यांच्या हातून गेली.

नंतरच्या दहा वर्षात यूरोपमधले ब्रिटनचे औद्योगिक क्षेत्रातील वर्चस्व कमी होऊ लागले होते आणि १८९० मध्ये जर्मन साम्राज्याचे या क्षेत्रात वर्चस्व निर्माण झाले त्यामुळे पर्किन यांना जबरदस्तीने आपली सर्व मालमत्ता विकून निवृत्त व्हावे लागले.

आपल्या आयुष्यात पर्किन यांना बरेचसे सन्मान मिळाले. यामध्ये मुख्यत्वेकरून रॉयल सोसायटीची फेलोशिप, रॉयल पदक, डेरी पदक आणि माउव्हीन या पदार्थाच्या संशोधनाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पहिले पर्किन पदक याचा समावेश आहे. आजही अमेरिकेतील औद्योगिक रसायनशास्त्रामध्ये पर्किन पदक हा सर्वोच्च सन्मान समजला जातो आणि अमेरिकन औद्योगिक रसायनशास्त्रामध्ये दरवर्षी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुण संशोधकास दिला जातो.

मिडलसेक्स येथील ग्रीन फोर्ड येथे २०१३ साली विल्यम पर्किन चर्च ऑफ इंग्लंड हायस्कूलची स्थापना झाली. या शाळेस विल्यम पर्किन यांचे नाव दिले आणि पर्किन यांच्या माउव्हीन या संशोधनाच्या सन्मानार्थ या शाळेचा रंग आणि मुलांचा गणवेश यासाठी जांभळ्या रंगाचा उपयोग केला गेला.

पर्किन यांचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाला.

संदर्भ :  

समीक्षक : रंजन गर्गे