हुक, रॉबर्ट : ( २८ जुलै १६३५ ते ३ मार्च १७०३ ) 

रॉबर्ट हुक यांचा जन्म फ्रेश वॉटर, यूनाइटेड किंगडम येथे झाला. रॉबर्टला लहानपणी चांगले शिक्षण मिळाले. त्यांची तब्येत नाजूक असल्यामुळे त्यांचे बरेच शिक्षण घरीच झाले. लहानपणापासूनच  निरीक्षणे करणे, निरनिराळी यंत्रे  बनवणे आणि चित्रकला हे गुण त्यांच्यात होते. पुढे लंडनच्या वेस्टमिनस्टर शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. लवकरच त्यांनी लॅटीन, ग्रीक आणि हिब्रू या भाषांवर प्रभुत्व मिळवले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण वधम कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले.

ऑक्सफर्डमधील ख्राईस्ट चर्च येथे रसायन सहाय्यक म्हणून १६५३ साली थॉमस विलीस यांच्या हाताखाली ते रुजू झाले. तेथे त्यांची भेट प्रसिद्ध शास्त्रज्ञ रॉबर्ट बॉयल यांच्याशी झाली. १६५५ ते १६६२ या कालावधीत ते रॉबर्ट बॉयल यांचे सहाय्यक म्हणून कार्यरत होते. १६६३ साली त्यांना मास्टर ऑफ आर्ट्स ही पदवी मिळाली. ऑक्सफर्डमधील त्यांचे कार्य आणि सहवासात आलेली मंडळी, प्रामुख्याने क्रिस्टोफर रेन, जॉन विल्किन्स यांचे त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीत फार मोठे योगदान आहे. हीच मंडळी पुढे रॉयल सोसायटीच्या स्थापनेचा केंद्रबिंदू बनली. रॉबर्ट हुक यांची सखोल दृष्टी आणि गणितावर असलेले प्रभुत्व यामुळे रॉबर्ट बॉयल यांच्या सिद्धांताचे गणितीय विश्लेषण रॉबर्ट हुक यांनीच केले. जॉन विल्किन्स यांचे अतिशय मूलभूत पुस्तक De anima brutorum आणि त्यातील रॉबर्ट हुक यांची सुंदर रेखाचित्रे वेलकम ग्रंथालयात आजही उपलब्ध आहेत.

रॉयल सोसायटीची स्थापना १६६० साली झाली. ५ नोव्हेंबर १६६१ रोजी रॉबर्ट मूर यांनी असा प्रस्ताव मांडला की रॉयल सोसायटीत प्रयोगांची मांडणी व फेरतपासणी करण्यासाठी कोणाची तरी पूर्णवेळ नियुक्ती करावी. प्रस्ताव एकमताने मान्य झाला आणि १२ नोव्हेंबर १६६१ रोजी रॉबर्ट हुक यांची नियुक्ती झाली.

चित्र : रॉबर्ट हुकचे सूक्ष्मदर्शकयंत्र.

आर्थर डाक्रिस (Arthur Dacres) यांच्या जागी २० मार्च, १६६४ रोजी रॉबर्ट हुक यांची ग्रेशाम कॉलेज ऑफ लंडन येथे भूमितीचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. याच साली जॉन कटलर यांनी सोसायटीत यंत्र-तंत्रज्ञानावर भाषणे आयोजित करण्यासाठी वर्षाला ५० पौंडाची  तरतूद करावी असा प्रस्ताव मांडला. ११ जानेवारी १६६५ रोजी रॉबर्ट हुक यांची संग्रहालय प्रमुख  (Curator by Office) या पदावर ३० पौंड पगारावर नियुक्ती केली. रॉबर्ट हुक यांनी आपल्या कारकिर्दीत हवा, श्वासोछ्वास, गुरुत्वाकर्षण, हवामानाचा दाब, २०० फूट लांबीचा लोलक, स्प्रिंग इत्यादी विषयांवर प्रयोग केले. तसेच बंदुकीच्या दारूची शक्ती तपासण्यासाठी यंत्र बनवले. घड्याळाच्या इंजिनाचे बारीक दाते कापण्यासाठी यंत्र तयार केले. त्यांनी सूक्ष्मदर्शकयंत्र तयार केले. सूक्ष्मदर्शकयंत्राखाली बुचाचा छेद बघून पशींची रचना अभ्यासली.

चित्र : बुचाच्या पातळ छेदाचे सूक्ष्मदर्शकाखालील चित्र.

रॉबर्ट हुक हे प्रामुख्याने त्यांच्या मायक्रोग्राफिया  या १६६५ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकासाठी जगभर ओळखले जातात. यात त्यांनी दुर्बिणीतून आणि सूक्ष्मदर्शकाखाली केलेल्या निरीक्षणांचा सचित्र लेखाजोखा घेतलेला आहे. त्यांनी दुर्बिणीतून मंगळ आणि गुरुचे भ्रमण बघितल्याची नोंद आहे. त्यांनी जीवाश्मांच्या निरीक्षणाद्वारे उत्क्रांतीसंबंधी देखील भाष्य केले आहे. सूक्ष्मदर्शकाखाली त्यांनी कीटक, स्पॉंज, ब्रायोझोन्स आणि फोरमेनिफेरा यांचे निरीक्षण केले. त्यातील सर्वात प्रसिद्ध निरीक्षण म्हणजे त्यांनी बुचाच्या पातळ आडव्या छेदाचे केलेले निरीक्षण. या निरीक्षणात दिसलेल्या छिद्रांना त्यांनी पेशी असे संबोधले. त्यांनी  वनस्पतीपेशींचा शोध लावला. त्यांनी पेशीच्या भित्तीकेचे निरिक्षण केले. पेशी (Cell) हा शब्दप्रयोगच मुळी त्यांनी  सर्वप्रथम केला. बुचाच्या पातळ छेदाचे निरीक्षण करत असतांना दिसलेल्या खोक्यांसारख्या रचनेची तुलना त्यांनी  मोनास्ट्रीमधील खोल्यांशी (सेल्स) केली आणि पेशीसाठी त्यांनी ‘सेल’ हा शब्दप्रयोग वापरला आणि तो पुढे जीवशास्त्रात रूढ झाला. अशीच रचना त्यांना लाकूड आणि वनस्पतीच्या छेदात दिसून आली. सूक्ष्मदर्शकयंत्राचा प्रायोगिक उपयोग ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी कसा करावा हे रॉबर्ट हुक यांनी जगाला प्रथम सांगितले.

ते म्हणतात : In the collection of most of which I made use of microscopes and some other glasses and instruments that improve the senses… only to promote the use of mechanical helps for the Senses, both in the surveying the already visible World, and for the discovery of many others hitherto unknown”

रॉबर्ट हुक आणि आंतोन व्हान ल्यूव्हेनहॉक (१६३२-१७२३) हे समकालीन होते. ल्यूव्हेनहॉकने १६७६ साली आपली सूक्ष्मजंतूंची निरीक्षणे आणि १६७७ साली स्वतः तयार केलेले सूक्ष्मदर्शकयंत्र रॉयल सोसायटीला पाठवले तेव्हा रॉबर्ट हुक यांनीच त्याची सत्यता पडताळून पहिली होती. १६६५ साली प्रसिद्ध झालेला रॉबर्ट हुकचा मायक्रोग्राफिया आणि १६७६ साली प्रसिद्ध झालेली ल्यूव्हेनहॉकची सूक्ष्मजंतुंविषयीची निरीक्षणे या सूक्ष्मजीवशास्त्राच्या इतिहासातील आद्य घटना म्हणून नोंदवल्या गेल्या.

कालांतराने रॉबर्ट हुक हे रॉयल सोसायटीचे सचिव झाले. १६८२ साली त्यांनी रॉयल सोसायटीची आपली नोकरी सोडली तरीदेखील त्यांचे संशोधन कार्य अखंड चालूच होते. डिसेंबर १६९१ मध्ये रॉबर्ट हुक यांना भौतिक शास्त्राची पीएच्.डी. ही पदवी प्राप्त झाली.

त्यांचा मृत्यू लंडन येथे झाला.

संदर्भ :  

समीक्षक : मुकुंद बोधनकर