एक उपयुक्त औषधी आणि धाग्यांसाठी वापरली जाणारी वनस्पती. मुरडशेंग ही वनस्पती स्टर्क्युलिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव हेलिक्टेरिस आयसोरा आहे. तिला केवण असेही म्हणतात. भारत, चीन, मलेशिया, सौदी अरेबिया आणि ऑस्ट्रेलिया इ. आशियाई देशांत मुरडशेंगेची झुडपे आढळून येतात. अनेक ठिकाणी ते इतर वृक्षांच्या खाली वाढलेले दिसते. त्याच्या दाट जाळ्या असतात. भारतात ते सर्वत्र आढळते.

मुरडशेंग (हेलिक्टेरिस आयसोरा) : वनस्पती, फुले आणि वाळलेली मुरडशेंग (फळ)

मुरडशेंग ५–८ मी. उंच वाढते. तिच्या कोवळ्या भागांवर लव असते, तर जून खोडाची साल करडी असते. पाने साधी, एकाआड एक व दंतुर असून वरच्या बाजूला खरखरीत, तर खालच्या बाजूला लवदार असतात. फुले लालभडक व द्विलिंगी असून २-६च्या झुबक्यात किंवा एकेकटी, ऑगस्ट-डिसेंबर या कालावधीत येतात. निदलपुंज पेल्यासारखा असतो. फुलामध्ये पाच पाकळ्या असून त्या सुट्या व असमान असतात. पुंकेसराचा दांडा जायांगधराच्या तळात जुळलेला असतो; त्यावर ऊर्ध्वस्थ अंडाशय असते. फुलातील पाच अंडपे मळसूत्री, म्हणजेच सुतळीला पीळ दिल्याप्रमाणे वळलेले असते आणि त्यांचे एक शुष्क फळ बनते. फळ ५-६ सेंमी. लांब, हिरवे व गोलसर असते. पिकल्यावर अंडपे सरळ होत असताना फळ तडकून बिया बाहेर पडतात. बिया अनेक व लहान असतात.

मुरडशेंगेचे अनेक औषधी उपयोग आहेत. या वनस्पतीत प्रतिऑक्सिडीकारक, प्रतिकर्करोधी व सूक्ष्मजीवरोधी गुणधर्म असून ती मधुमेहावर गुणकारी असल्याचे आढळते. सुकी फळे पोटाच्या तक्रारीवर गुणकारी असतात. मुरडशेंगेच्या शेंगा पौष्टिक असून त्या कर्बोदके, प्रथिने, तंतुमय पदार्थ, कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह (आयर्न) इत्यादींचा उत्तम स्रोत आहेत. प्रसूतीमुळे मातेला आलेला अशक्तपणा भरून येण्यासाठी खुराक म्हणून जे पदार्थ भारताच्या अनेक भागात तयार करतात त्यामध्ये मुरडशेंग वापरतात.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा