सिंग, जे. एस. : (१९४१ – ) अलाहाबाद विद्यापीठातून बी. एस्सी. आणि एम. एस्सी. या पदव्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर सिंग यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून पीएच्. डी. मिळवली. कुरुक्षेत्र विद्यापीठात सुमारे १६ वर्षे शिकवल्यावर त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक म्हणून १० वर्षे, आणि सन्माननीय प्राध्यापक म्हणून ४ वर्षे शिकवले. कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीत त्यांनी ५ वर्षे संशोधन केले.
हिमालय आणि शुष्क विषुव-वृत्तीय परिसंस्थांचा अभ्यास हे त्यांचे आवडते विषय आहेत. भारतातील गवताळ प्रदेश, त्यातील उत्पादकता, जैवविविधता, उर्जाप्रवाह यांची गणितीक प्रतिमा तयार करून अशा परिसंस्थांच्या व्यवस्थापनाचा पाया घातला. हिमालय पर्वतराजीतील नैसर्गिक ओक वृक्षांच्या ठिकाणी पाईन वृक्षांच्या लागवडीमुळे जमिनीतील नायट्रोजन ओक वृक्षाना उपलब्ध होत नाही हे दाखवून दिले.
भातशेतीमुळे मिथेन प्रदूषण होऊन पृथ्वीचे तापमान वाढते अशा प्रचाराला उत्तर म्हणून केलेल्या संशोधनाद्वारे जे. एस. सिंग यांनी सिद्ध केले की कोरडवाहू जमिनीवरची भातशेती आणि नैसर्गिक परिसंस्था या मोठ्या प्रमाणावर मिथेन शोषून घेऊन मिथेनचा समतोल राखतात. खाणीमुळे संहार झालेल्या जमिनीचे पुनरुत्थापन करण्यास स्थानिक वनस्पतीप्रकारच जास्त उपयुक्त असल्याचे त्यांनी अनेक खाणी परिसंस्थांचा अभ्यास करून दाखवून दिले.
जे. एस. सिंग यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत त्यापैकी काही: एस. एस. भटनागर पुरस्कार, पितांबर पंत राष्ट्रीय पर्यावरण फेलो, प्रवणानंद सरस्वती
ॲवॉर्ड, बिरबल सहानी मेडल, इ. शिवाय, अनेक महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी कार्य केले आहे: अध्यक्ष, पर्यावरण विभाग, इंडिअन सायन्स कॉंग्रेस २००४; संचालक, पंत हिमालयन पर्यावरण विकास संस्था, अल्मोरा: सभासद, केरळ वनसंशोधन संस्था; राष्ट्रीय वन आयोग; नियोजन मंडळ; इंटरनॅशनल व्हेजीटेशन सायन्स, स्वीडन; इंटिग्रेटेड माउंटन डेवलपमेंट सेंटर, काठमांडू; भारतीय वन सल्लागार समिती इत्यादी.
जे. एन. सिंग यांनी ४३ विद्यार्थ्याना पीएच्.डी.साठी मार्गदर्शन केलेले असून, ४०० च्यावर शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. या सर्व कार्याचा पसारा ते इतका व्यवस्थित सांभाळतात की ४०० पैकी कोणत्याही शोधनिबंधाची प्रत मागितल्यास ते काही सेकंदात शोधून देऊ शकतात. सध्या वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून बनारस हिंदू विश्वविद्यालय येथे ते संशोधन करत आहेत.
समीक्षक : चंद्रकांत लट्टू
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.