टेलर, मार्टिन जे. : (१८ फेब्रुवारी १९५२ – ) ब्रिटीश गणिती मार्टिन जे. टेलर यांचा जन्म ब्रिटनमधील लीसेस्टर (Leicester) इथला असून त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड येथील पेम्ब्रोक (Pembroke) महाविद्यालयात झाले. १९७६ साली लंडनमधील किंग्ज महाविद्यालयातून अल्ब्रेख्त फ्रोलिश (Albrecht Frӧhlich) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना ‘Galois Module Structure of the Ring of Integers of l–extensions’ या प्रबंधावर डॉक्टरेट मिळाली.

केंब्रिज येथील ट्रिनिटी महाविद्यालय आणि मँचेस्टर विद्यापीठात शुद्ध गणिताचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केल्यानंतर २०१० मध्ये ऑक्सफर्ड येथील मर्टन (Merton) महाविद्यालयात मुख्य अधिकारी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आणि त्यांच्या निवृत्तीपर्यंत ते तेथेच कार्यरत राहिले.

टेलर यांनी मुख्यत: बीजगणितीय संख्यांचे (algebraic numbers) विविध गुणधर्म आणि त्यांची संरचना या विषयी संशोधन केले. बीजगणितीय अंक आणि काही विश्लेषणात्मक फलांचे वर्तन, जी आर्टीन एल-फलें (Artin L-functions) म्हणून ओळखली जातात, यांच्यातील सममितीसंबंधी असलेली फ्रोलिश अटकळ (Frӧhlich Conjecture) त्यांनी १९८१ मध्ये सिद्ध  केली.

टेलर यांचे आणखी एक उल्लेखनीय योगदान म्हणजे बीजगणितीय संस्थितीतील (algebraic topology) ‘गट वलय लाग’ (Group Ring Logarithm) बाबतचे संशोधन. त्यांच्या ह्या संशोधनामुळे, बहुपदी फलांच्या सममिती समजून घेण्यात सुधारणा तर झालीच शिवाय बीजगणितीय संस्थितीच्या क्षेत्रातही नवी दालने उघडली गेली.

टेलर यांनी अंकगणितीय भूमितीतल्या विविध पैलूंवरही संशोधन केले. त्यांनी त्यांच्या सहकारी गणितींसोबत अनेक पूर्णांकी चल असलेल्या बहुपदींच्या उकलींचे भौमितिक गुणधर्म सहचर्य असलेल्या ल-फलांच्या वर्तनानी कसे शोधता येते हे दाखवले.

टेलर यांनी स्वतंत्रपणे तसेच इतर गणितींसह सुमारे नव्वद शोधलेख आणि काही पुस्तके देखील प्रसिद्ध केली आहेत: ‘Algebraic Number Theory’; ‘Class Groups of Group Rings, Elliptic Functions and Rings of integers’ आणि ‘Group Rings and Class Groups’ ही त्यांची महत्त्वपूर्ण पुस्तके आहेत.

टेलर लंडन मॅथेमॅटिकल सोसायटीचे चार वर्षे अध्यक्ष होते. ते रॉयल सोसायटीचे पाच वर्षे उपाध्यक्ष आणि कार्यवाह म्हणूनही कार्यरत होते.

लीसेस्टर (Leicester), बोर्दू (Bordeaux) आणि यू.ई.ए. (University of East Anglia) ह्या विद्यापीठांकडून टेलर यांना मानद डॉक्टरेटच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या. त्यांना एफ.आर.एस., EPSRC Senior Fellowship आणि नाईट बॅचलर हे बहुमान देऊन गौरविण्यात आले. व्हाईटहेड पुरस्कार, ॲडम्स पुरस्कार आणि वुल्फ्सन मेरिट ॲवॉर्ड हे टेलर यांना मिळालेले आणखी काही उल्लेखनीय पुरस्कार आहेत.

संदर्भ :

 समीक्षक : विवेक पाटकर