हिमालय पर्वताच्या बऱ्याचशा भागाची अचूक भूशास्त्रीय माहिती अद्याप उपलब्ध नाही. हिमालयाची संरचना सामान्यपणे आल्प्ससदृश आहे. सांरचनिक दृष्ट्या हिमालय श्रेणी ही पश्चिमेकडील हिंदुकुश व बलुचिस्तान श्रेण्यांशी आणि पूर्वेकडील चीनमधील सिंक्यांग व पश्चिम म्यानमारमधील श्रेण्यांशी संबंधित असल्याचेही मानले जाते. मध्य हिमालयाच्या आसाच्या भागात आढळणारी अनेक उंच शिखरे ग्रॅनाइट खडकांनी बनलेली आहेत. याशिवाय पट्टिताश्म, सुभाजा व फायलिट या खडकरचना आढळतात. हिमालयात ठिकठिकाणी अगदी प्राचीन अवसादी व रूपांतरित (हिमालयीन अवसादापेक्षाही जुने) खडक आढळतात.
हिमालयाचा उंच उठाव, त्यांवरील हिमाच्छादित भव्य शिखरे, खोलवर विच्छेदित भूमिस्वरूपे, जटिल भूशास्त्रीय संरचना, मोठ्या हिमनद्यांच्या वरच्या टप्प्यांकडील विस्तीर्ण हिमक्षेत्रे, उंच कड्यांवरून मोठ्याने आवाज करीत कोसळणारे धबधबे, पूर्व प्रस्थापित नदीप्रणाल्या, नद्यांनी तयार केलेल्या खोल घळया व रुंद दऱ्या, विविध प्रकारची समृद्ध वने इत्यादी भूदृश्ये हिमालयात सर्वत्र आढळतात. पश्चिम भागापेक्षा पूर्व भागातील हिमालयाची मैदानी प्रदेशापासून उंची एकदम वाढलेली दिसते. हिमालयाची दक्षिण सीमा पश्चिम भागात ३०० मी. उंचीच्या समोच्च रेषेने, तर पूर्व भागात ती १५० मी. समोच्च रेषेने सीमित होते. हिमालयातील खिंडी या जगातील सर्वाधिक उंचीवरील खिंडी आहेत. त्यांपैकी बहुतेक खिंडी नोव्हेंबर ते मे दरम्यान हिमाच्छादित असतात. प्राकृतिक दृष्ट्या हिमालय पर्वतप्रणालीत पश्चिम-पूर्व दिशेत एकमेकींना समांतर पसरलेल्या तीन पर्वतश्रेण्या आहेत; तर उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे (१) बृहत् हिमालय किंवा हिमाद्री (ग्रेटर हिमालय), (२) छोटा हिमालय किंवा हिमाचल किंवा महाभारत रांग (लेसर किंवा लोअर हिमालय) आणि (३) शिवालिक टेकड्या किंवा बाह्य हिमालय (आउटर हिमालय) याप्रमाणे या श्रेण्या आहेत.
(१) बृहत् हिमालय किंवा हिमाद्री (ग्रेटर हिमालय) : सर्वांत उत्तरेकडील, सलग आणि सर्वाधिक उंचीची ही पर्वतश्रेणी आहे. तिचे हिमाद्री हे प्राचीन नाव असून बृहत् हिमालय हे अलीकडील नाव आहे. हिमालयाच्या उत्तरेला विस्तीर्ण असे तिबेटचे पठार असून या पठाराच्या दक्षिण भागातच हिमाद्री ही पहिली रांग आहे. कायमस्वरूपी हिमरेषेपेक्षाही उंच असलेली ही एकमेव श्रेणी आहे. त्यामुळे सतत हा भाग हिमाच्छादित असतो. यामध्ये अनेक हिमाच्छादित शिखरे व कटक आढळतात. या रांगेची सरासरी उंची सुमारे ६०० मी. असून मौंट एव्हरेस्ट (उंची ८,८४८ मी.) हे जगातील सर्वोच्च शिखर याच रांगेत आहे. जगातील सर्वांत उंच १२ शिखरांपैकी ९ शिखरे या रांगेत असून सस.पासून ७,३०० मी. पेक्षा अधिक उंचीची ३० शिखरे या रांगेत आहेत. एव्हरेस्टशिवाय जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंचशिखर कांचनजंघा (८,५९८ मी.), धौलागिरी (८,१७२ मी.), नंगा पर्वत (८,१२६ मी.), नंदादेवी (७,८१७ मी.), नामचा बारवा (७,७५६ मी.) ही प्रमुख शिखरे आहेत. सर्वाधिक उंची या वैशिष्ट्याशिवाय हिमाच्छादित व तीव्र उताराची खडबडीत शिखरे, मोठमोठ्या हिमनद्या, खोल घळया, समशीतोष्ण कटिबंधीय व अल्पाइन प्रकारची वने ही या श्रेणीची इतर वैशिष्ट्ये आहेत. उत्तरेकडे या श्रेणीचा उतार क्रमाक्रमाने कमी होत जातो. काही प्रमुख नद्यांची खोरी बऱ्याच अंतरापर्यंत या श्रेणीला समांतर जाताना दिसतात. यामध्ये ग्रॅनाइट खडक तसेच रूपांतरित अवसाद आढळतात.
(२) छोटा हिमालय किंवा हिमाचल (लेसर हिमालय) : हिमाद्रीच्या दक्षिणेस, हिमाद्रीस समांतर अशी सुमारे ७५ किमी. रुंदीची ही श्रेणी आहे. श्रेणीची सरासरी उंची सुमारे २,००० ते
३,००० मी. आहे. या श्रेणीचे दक्षिण उतार तीव्र व उघडे असून उत्तरेकडील उतार मंद आणि वनाच्छादित आहेत. या श्रेणीची दक्षिणेकडील पायथ्यालगतच्या टेकड्यांपासून उत्तरेकडे वेगाने उंची वाढत गेलेली दिसते. या श्रेणीत अनेक ठिकाणी एकमेकींना समांतर अशा स्थानिक रांगा पसरलेल्या आढळतात. भूविज्ञानाच्या दृष्टीने याला जरी छोटा हिमालय म्हटले जात असले, तरी यातील शिखरे सुमारे ५,००० मी. पर्यंतच्या उंचीची आहेत. तसेच काही ठिकाणी वर्षभर हिमाच्छादित भाग आढळतात. काही ठिकाणी ही श्रेणी हिमाद्रीत विलीन झालेली दिसते. यातील खडक अल्गाँक्वियन ते इओसीन कालखंडातील संपीडित व रूपांतरित स्वरूपाचे आढळतात.
(३) शिवालिक टेकड्या किंवा बाह्य हिमालय (आउटर हिमालय) : छोट्या हिमालयाच्या पायथ्यालगतच्या टेकड्या आणि पर्वतश्रेण्यांच्या प्रदेशास शिवालिक या नावाने ओळखले जाते. याला बाह्य हिमालय असेही संबोधले जाते. शिवालिक टेकड्यांच्या दक्षिणेस उत्तर भारतीय मैदान आहे. या प्रदेशाची सरासरी उंची सुमारे ६०० ते १,२२० मीटरच्या दरम्यान असून रुंदी १० ते ५० किमी. आहे. शिवालिकच्या अंतर्गत भागात अनेक समांतर कटक आणि सांरचनिक दऱ्या आढळत असून काही ठिकाणी या प्रदेशाची उंची १,५०० मी. पर्यंतही वाढलेली दिसते. सर्वांत अलीकडच्या म्हणजे साधारण मध्य मायोसीन ते लोअर प्लाइस्टोसीन काळातील भूहालचालींमधून या भागाची निर्मिती झालेली आहे. हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन या भागात आढळते.
शिवालिक पर्वतराजीच्या उत्तरेकडील डोंगररांगांना समांतर अनुलंब अशी खोरी आढळतात. डोंगररांगांवरून वाहून आणलेल्या खडे-मातीने भरलेली ही सपाट तळाची, सुपीक खोरी असून त्यांना दून (डून) असे म्हणतात. उदा., डेहराडून किंवा डेहरा खोरे. हे खोरे सुमारे ७५ किमी. लांब, २५ किमी. रुंद व ३६० ते ९०० मी. उंचीपर्यंत चढत गेलेले आहे. शिवालिक भागात आधुनिक सागरी निक्षेप, मृदु वालुकाश्म, शेल, पिंडाश्मयुक्त खडक अशा रचना आढळतात. दक्षिणेकडील पायथ्यालगत अधिक पर्जन्यमान असलेला तराई हा गवताळ व दलदलयुक्त प्रदेश आहे. पायथ्यालगतच्या, परंतु नद्यांच्या पात्रापासून उंचवट्यावरील दगडगोटे व भरड रेती यांच्या जुन्या व जाडसर गाळाच्या प्रदेशास भाबर या नावाने ओळखले जात असून त्याची सस.पासून सरासरी उंची सुमारे १,३७० मी. आहे. या विभागात दाट वने आहेत. भाबर प्रदेशातील कार्स्ट भूमिरूपांमुळे अनेक नद्यांचे प्रवाह भूमिगत होतात. हे भूमिगत प्रवाह तराई प्रदेशात पुन्हा भूपृष्ठावर येतात. त्यामुळे तराई प्रदेश दलदलयुक्त बनला आहे. या प्रदेशात बोरु-वेताची वने आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार व नेपाळमध्ये तराई प्रदेश आढळतो.
समीक्षक : माधव चौंडे