सामान्यत: स्त्रिया आणि मुलींशी संबंधित असलेले गुणधर्म, आचरण, विविध भूमिकांचा समूह म्हणजे स्त्रीत्व. यामध्ये स्त्रियांनी काय करावे?  कसे वागावे?  कसे बोलावे?  कसे दिसावे? त्यांच्यासाठी काय उपयुक्त आहे? इत्यादींबाबतचे समाजनियम सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेमार्फत मुली आणि स्त्रिया यांना शिकविले जातात. प्रस्थापित स्त्रीत्वाच्या गुणवैशिष्ट्यांमध्ये कोमलता, सहानुभूती, नम्रपणा, सहनशीलता, गृहकृत्यदक्षता, शालीनता इत्यादींचा समावेश होतो. स्त्रीत्व हे भिन्नलिंगी आदर्श, स्वार्थहीन पत्नी, गृहिणी, माता, बहीण इत्यादी निकषांवर आधारित आहे. कुटुंबाची, वडिलधाऱ्या माणसांची आणि मुलांची काळजी घेणे, ही तिची प्राथमिक जबाबदारी मानली जात असून यांसारख्या पुरुषकेंद्री निकषांवर स्त्रीत्व घडविले जाते. त्यामुळे स्त्रीत्व ही संकल्पना समाजरचित आहे. ती विविध सत्तासंबंधांतून आकाराला येत असून ती सर्व समावेशक नाही. स्त्रीत्व ही स्त्रिया घडविण्याची सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. स्त्रीकडे केवळ स्त्रीचे शरीर असून चालत नाही, तर तिच्याकडे स्त्रीत्वाचे गुणदेखील असणे गरजेचे आहे. स्त्रियांना स्वतःचे स्त्रीत्व सिद्ध करण्यासाठी विविध बाबी आत्मसात कराव्या लागतात. स्त्रीत्व आणि पुरुषत्व या लिंगाधारित अस्मिता आहेत. लिंग हे जैविक संकल्पनेपेक्षा भिन्न असून पुरुष आणि स्त्री हे दोघेही स्त्रीत्वाची अथवा पुरुषत्वाची वैशिष्ट्ये व्यक्त करू शकतात. उदा., स्त्रिया या पुरुषी (रागीट, धाडसी, धोका पतकरणाऱ्या, कुटुंबाचे पालन-पोषण करणाऱ्या) असू शकतात, तर पुरुष हे बायकी (कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे, स्वयंपाक बनविणे, प्रेमळ, संवेदनशील) असू शकतात.

स्त्रीत्वाची गुणवैशिष्ट्ये सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक संदर्भानुसार बदलताना दिसून येतात. उदा., बंडखोरी अथवा नक्षलवादी उठावांमध्ये स्त्रियांचा असलेला सहभाग. तसेच समकालीन भारताच्या संदर्भात जहाल हिंदू संघटनांमध्ये स्त्रियांचा अतिरेकीपणा आणि मर्दानी वैशिष्ट्ये इत्यादी. स्त्रियांचा हिंसक संघटनांमधील सहभाग प्रस्थापित कुटुंब केंद्रित स्त्रीत्वाच्या चौकटीस प्रश्नांकित करून तिला धूसर बनवितो. त्यामुळे स्त्रीत्व हा कोटिक्रम एकसंध नसून तिचे अनेक प्रकार आढळतात. ही संकल्पना गतिशील असून तिची संस्कृती आणि व्यक्तींनुसार धारणा बदलते. प्रदेश, जात, धर्म, वर्ग, राष्ट्रीय संस्कृती आणि इतर सामाजिक घटकांनुसार स्त्रीत्वाची परिभाषा केली जाते.

अधिसत्ताक स्त्रीत्व : कोनेल या विचारवंताच्या मते, समाजामध्ये स्त्रीत्वाचे सर्व प्रकार हे समाजरचित असून ते पुरुषांच्या तुलनेत दुय्यम आहे. त्यामुळे स्त्रियांमध्ये असे कोणतेही स्त्रीत्व नाही, जे पुरुषांप्रमाणे अधिसत्ताक स्थान मिळवू शकेल. कोनेल यांच्या मांडणीला प्रश्नांकित करून केरी पिचर या विचारवंताने अधिसत्ताक स्त्रीत्व याविषयी शाळेतील वर्ग आणि मैदान या अवकाशाचा वापर करून केलेल्या अभ्यासानुसार त्यांनी बऱ्याचदा मुली या टॉमबॉय, अल्फा गर्ल या पुरुषत्व आणि स्त्रीत्व ही दोन्ही गुणधर्मे व्यक्त करत असतात. तसेच शाळेमध्ये ज्या मुली सत्ता एकवटू शकतात, त्या अधिक लोकप्रिय असतात. अधिसत्ताक स्त्रीत्व दर्शविणाऱ्या मुली शाळेमध्ये कनिष्ठ दर्जा असलेल्या मुलींशी अंतर पाळतात व त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. याउलट, शाळेबाहेर त्याच मुली (अधिसत्ताक स्त्रीत्व) फॅशनेबल कपडे परिधान करतात. अधिसत्ताक पुरुषत्व आणि स्त्रीत्व हे समान गुणवैशिष्ट्ये आत्मसात करतात. त्यामुळे त्यांच्या वर्तणुकीवर आणि सादरीकरणावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. असे असले, तरी अधिसत्ताक स्त्रीत्व व्यक्त करणाऱ्या मुली किंवा स्त्रिया या अधिसत्ताक पुरुषत्वाच्या तुलनेत दुय्यमच राहून त्या अधिसत्ताक पुरुषत्वाला आव्हान देऊ शकत नाही.

अनेक अभ्यास अधिसत्ताक पुरुषत्व आणि स्त्रीत्व हे भिन्न लैगिंकतेशी संबंधित आहे, असे मानतात. प्रस्थापित भिन्नलिंगी स्त्रीत्व आदर्शवत आणि महत्त्वाकांक्षी मानले जाऊन ते स्त्रीत्वाचे गुणधर्म पितृसत्ताक व्यवस्थेला हातभार लावतात. एम. शिपर्स हे प्रबळ स्त्रीत्वाबाबत मांडणी करताना म्हणतात की, ज्या स्त्रिया पितृसत्ताक मूल्ये आणि संस्कृती यांचे पालन करतात, त्यांना समाज मान्यता व काही विशेषाधिकार प्राप्त होतात; मात्र पुरुषांच्या तुलनेत त्या गौणच राहतात. त्यामुळे स्त्रीत्वाच्या वर्णपटलावर असलेल्या अधिसत्ताक स्त्रीत्व, लेस्बियन स्त्रीत्व इत्यादी प्रकारांना पितृसत्ताक समाजात विशेष महत्त्व दिले जात नाही.

स्थित्यंतरे : एकोणिसाव्या शतकात स्त्रीत्वाच्या साच्यामध्ये पारंपरिक ते आधुनिक असे स्थित्यंतरे दिसून येते. त्याकाळी कुटुंब हेच स्त्रियांचे प्राथमिक क्षेत्र आहे, असे समजून त्यांना शिक्षण देताना गृहोपयोगी शिक्षण देण्याची मागणी समाज सुधारकांकडून करण्यात आली. याउलट, उच्च जातीय आणि मध्यम वर्गीय कुटुंबांमध्ये शिक्षित पतीला साजेशी, आधुनिकतेची कास धरणारी पत्नी असावी या मागणीनुसार स्त्रियांनी गाणे शिकणे, इंग्रजी बोलायला शिकणे इत्यादी प्रकारे स्वतःमध्ये बदल करावेत, यांवर भर देण्यात आला. हे करित असताना आदर्श आधुनिक स्त्रीची जी प्रारूप उभी केली गेली, ती पारंपरिक, कनिष्ठ जातीय स्त्रियांच्या एकदम विरुद्ध होती. त्यामुळे कनिष्ठ स्त्री ही त्याकाळी कधीच आदर्श स्त्री समजली गेली नाही. आजही काही समाजांमध्ये पारंपरिक विचारधारणेच्या पुरुषांमुळे स्त्रियांना दुय्यम लेखले जाते. एवढेच नव्हे, तर भोपाळमधील बरकातुल्ला विद्यापीठाने स्त्रियांना स्त्रीत्वाच्या साच्यामध्ये बसविण्यासाठी २०१८ मध्ये एक अल्प मुदतीचा ‘आदर्श बहू’ असा अभ्यासक्रम सुरू केला होता. हा प्रकार स्त्रीत्वाच्या घडणीच्या प्रक्रियेमध्ये सातत्य तसेच स्थित्यंतरे आणणारा, आधुनिकता आणि पारंपरिकता या द्वैतांमध्ये स्त्रीत्व अडकविणारा असल्याचे दिसून येते. समकालीन टप्प्यावर आधुनिक स्त्रियांनी उच्च शिक्षण घेत असताना आदर्शाचा पारंपरिक साचा सोडता कामा नये, यासाठीचा हा संस्थात्मक पातळीवर केलेला प्रयत्न होता.

स्त्रीत्व नैसर्गिक रीत्या अभिव्यक्त केली जाणारी बाब नसून ती पितृसत्ताक समाजरचित पूर्वनिर्धारित अटी व नियमांवर आधारित सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. स्त्रीत्व घडत असताना पितृसत्ता, संस्कृती आणि भांडवलशाही या तीन बाबी मुख्य भूमिका बजावितात. लहानपणासूनच मुलींना सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून लिंगाधारित भूमिका आणि गुण आत्मसात करण्यास शिकविले जाते. स्त्रीत्वाच्या घडणीमध्ये स्त्रियांचे दिसणे, वागणे आणि समाजात वावरने यांबाबत पावित्र्य आणि सौंदर्यशास्त्राच्या कल्पना लादल्या जातात. सोयीस्कर रीत्या त्यांच्या शरीराचे आदर्श प्रतिमांच्या माध्यमातून गौरवीकरण केले जाते. उदा., देवी, भारतमाता इत्यादी. स्त्रीत्व हे कुटुंब किंवा समाजाचे प्रतिक मानले, तर दुसऱ्या बाजुला तिला लज्जास्पद, त्रासदायक, भीतीदायक, संघर्षाची भूमी, तिरस्करणीय इत्यादी दृष्टीकोनातून प्रक्षेपित केले जाते.

स्त्रीत्वाच्या प्रक्रियेमध्ये बहुतांश स्त्रिया आदर्श स्त्रीची प्रतिमा प्राप्त करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात संघर्ष करताना दिसतात. आदर्श स्त्री किंवा देशाचे-समाजाचे प्रतिक बनण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्व स्त्रियांना समान संधी मिळत नाही. आदर्श प्रतिकांमध्ये बहुतांश वेळा उच्च वर्गीय, गौरवर्णीय स्त्रियांचा समावेश केला जातो; तर कनिष्ठ वर्गीय, कृष्णवर्णीय स्त्रियांना दारिद्र्य, मागास, कुपोषित, अशुद्ध, तिरस्कारणीय अशा साच्यात बंधिस्त केले जाते.

पितृसत्ताक समाजात पुरुषत्वाच्या गुणवैशिष्ट्यांना अधिक महत्त्व दिल्यामुळे आपोआप स्त्रियांना दुय्यम दर्जा मिळतो. त्यामुळे त्यांच्या स्त्रीत्वाच्या गुणांचे अवमूल्यन केले जाते. स्त्रीने जरी काही धाडसी कामगिरी करून दाखविली, तरी ती स्त्रीत्वाची गुणवैशिष्ट्ये समजली जात नसून तो पुरुषत्वाचा गुणधर्म समजण्यात येते. उदा., निवेदिता मेनन त्यांच्या सिइंग लाईक ए फेमिनिस्ट  या पुस्तकातील ‘खूब लढी मर्दानी, वोह तो झांसीवाली राणी थी’ हे वाक्य. समाजामध्ये प्रमाणित नमुना हा पुरुषांच्या गुणविशेषांचा असल्यामुळे स्त्रियांना नेहमी त्याच प्रमाणित नमुन्याच्या साच्यामध्ये पाहिले जाते. अनेकदा स्त्रीत्वाच्या वर्तणुकीबद्दलचे संदेश, नमुने हे जाहिराती, सामाजिक माध्यमे, शैक्षणिक साहित्य इत्यादी माध्यमांतून स्त्रियांवर ठसविले जातात. चित्रपट, जाहिराती यांच्या माध्यमांतून ‘नवीन स्त्री’ प्रारूप समोर येते; जे स्त्रीत्वाची पुन्हा एकदा परिभाषा करताना दिसते. यामध्ये सशक्त, आत्मविश्वासू, आधुनिक पेहराव केलेली, स्वतंत्र स्त्री अशी स्त्रीची प्रतिमा उभी केली जाते; मात्र असे असूनही तिच्यावर आधुनिकता व पारंपरिकता या दुहेरी परस्परविरोधी संकल्पनांची सांगड घालण्याचे ओझे असल्याचे दिसून येते. फेमिनीझम इन इंडिया या संस्थेने २०१८ मध्ये केलेल्या एका अभ्यासात ४८% जाहिराती या लिंगाधारित साचेबंद कल्पनांना अधिक मजबूत करतात. मुख्यतः सण-समारंभामध्ये जेवण बनविणे, वाढणे अशा अनेक कौटुंबिक उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये स्त्रिया, तर गाडी, यंत्रे यांसारख्या बाहेरील उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये मध्यवर्ती भूमिकेत पुरुष असल्याचे दिसून येतात.

थोडक्यात, स्त्रीत्वाचा साचा हा विविध सामाजिक, सांस्कृतिक आयामांनी आकाराला येतो आणि काही वेळा पुरुषत्व आणि स्त्रीत्व यांच्यातील अस्मितेच्या रेषा या धूसर असतात. स्त्रियांच्या बदललेल्या अपेक्षा, जीवनमान, भूमिका या विस्तारलेल्या आहेत, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. जेणेकरून स्त्रीत्वाचा कोटिक्रम हा एकसंध नसून गतिशील आहे, हे लक्षात येईल.

संदर्भ :

  • Butler J., Gender Trouble : Feminism and Subversion of Identity, 1990.
  • Menon, N., Seeing like a feminist, New Delhi, 2012.
  • Paechter, C., Hegemonic Femininities in the Classroom, Germany, 2018.
  • Sangari, Kumkum.; Vaid, Sudesh., Recasting Women : Essays in Indian Colonial History, Delhi, 1990.
  • Schippers, M., Recovering the Feminine Other : Masculinity, Femininity and Gender Hegemony, 2007.

समीक्षक : स्नेहा गोळे