अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील रॉकी पर्वताच्या पूर्वेकडील उतारावरून आणि त्याच्या निकटची मैदाने यांच्यावरून वाहणाऱ्या उबदार, शुष्क व अतिशय संक्षुब्ध अशा पश्चिमी वाऱ्यांना चिनूक वारे म्हणतात. हे चंडवात प्रकारचे वारे अल्पावधीत एकाएकी जोरावून नंतरच्या अनेक मिनिटांत क्रमश: मंद होतात. यांची दिशा अनेकदा बदलते. यांच्या गतीत चढउतार होतात. ही गती ताशी ५० ते १०० किमी. दरम्यान असते. कोलंबिया नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या चिनूक इंडियन लोकांच्या देशातून (प्रदेशातून) हे येत असावेत, असे मानले गेल्याने त्यांचे हे नाव पडले आहे. या शब्दाचा अर्थ ‘हिमभक्षक’ (स्नो-इटर्स) असा आहे. हे त्यांचे नाव समर्पक आहे; कारण पर्वताच्या तळाकडे येताना त्यांचे तापमान वाढत जाते व ते खाली पसरल्यावर त्यांच्यामुळे हिमाचे आच्छादन जलदपणे वितळविले जाते किंवा त्याचे संप्लवन होते. म्हणजे हिमाचे पाण्यात रूपांतर न होता थेट वाफेत रूपांतर होते. हिवाळ्यात यांच्यामुळे येथील तापमान अचानक वाढलेले दिसते. अशा प्रकारचे वारे जगातील वेगवेगळ्या भागांत आढळतात. त्यांना सामान्यपणे फॉन (फोएन) वारे असे म्हणतात. चिनूक वारे हे फॉन वाऱ्यांचे एक खास उदाहरण आहे.
चिनूक वारे हिवाळ्यात व वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळात वाहतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा वायव्य भाग व कॅनडाचा नैर्ऋत्य भाग येथे ते वाहतात. मूलत: पॅसिफिक महासागराकडून वाहत येणारी ही बाष्पयुक्त हवा (वारे) रॉकी पर्वताच्या वाताभिमुख उतारावर पायथ्याकडून माथ्याकडे जाते. पर्वतमाथ्याकडे जाताना ती प्रसरण पावते व थंड होते. त्यामुळे तिच्यातील बाष्पाने ती बाष्पसंपृक्त बनते. तिचे संघनन होऊन तेथे प्रतिरोध प्रकारचे वर्षण होते. त्या वेळी तिच्यातील सुप्त उष्णता बाहेर पडते. त्यानंतर हवा जशी वातविमुख उतारावरून खाली उतरू लागते, तशी ती जलदपणे संकोज पावते आणि अधिक उबदार व शुष्क बनते. पर्वताच्या उतारावरून खाली येताना ९० मी. अंतरामागे यांचे तापमान १° से. ने वाढते. १,६८० मी. खाली आल्यावर तापमान १७° ने वाढते व पर्वताच्या तळाशी ते कोरडे होतात.
हिवाळ्यात चिनूक वारे कधीकधी रॉकी पर्वताच्या पायथाटेकड्यांतील किंवा लगतच्या मैदानावरील पुरोभागालगतच्या पुष्कळच अधिक थंड अशा साचून राहिलेल्या ध्रुवीय हवेवर थडकतात. या पुरोभागाच्या क्षितिजसमांतर लहान आंदोलनांमुळे एखाद्या ठिकाणी तापमानात काही तासांत २५° ते ३०° से. चे अनेक चढउतार होतात.
वॉशिंग्टन व ऑरेगन राज्यांतील पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर राहणारे लोक नैर्ऋत्येकडून येणाऱ्या उबदार, आर्द्र वाऱ्यांना ‘आर्द्र (वेट) चिनूक’ म्हणतात.
चिनूक वारे ज्या प्रदेशांतून वाहतात, त्या प्रदेशातील लोकांना डोकेदुखी, मळमळ, उलटी यांसारखे त्रास जाणवतात. तसेच त्यांच्या प्रकाश, आवाज व गंध या संवेदनक्षमतांवर परिणाम होतो.
समीक्षक : वसंत चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.