हिमालय पर्वताची निर्मिती स्तरित आणि रूपांतरित खडकांच्या रचना असलेल्या प्रदेशात वलीकरण क्रिया होऊन झालेली आहे. ॲल्फ्रेड व्हेगेनर (वॅगनर) यांच्या खंड विप्लव (वहन) सिद्धांतानुसार अगदी सुरुवातीला अस्तित्वात असलेल्या पॅन्जीया या महाखंडाचे ट्रायासिक कालखंडात (सुमारे २४.५ ते २०.८ कोटी वर्षांपूर्वीचा काळ) पश्चिम-पूर्व दिशेत विखंडन होऊन उत्तरेकडील लॉरेशिया (अंगारालँड) व दक्षिणेकडील गोंडवनभूमी (गोंडवानालँड) अशी दोन भूखंडे अस्तित्वात आली. दोन्ही भूखंडांच्या दरम्यानच्या भागात पडलेली भेग रुंदावत जाऊन त्या ठिकाणी पाणी साचून तेथे टेथीस समुद्र अस्तित्वात आला. दोन्ही भूखंडांकडून वाहत येणाऱ्या नद्यांनी मोठ्या प्रमाणावर वाहून आणलेला गाळ, चिखल आणि वाळूचे टेथीसच्या तळावर संचयन केले. वरच्या थराचा व पाण्याचा दाब पडत जाऊन या सर्व पदार्थांचे कालांतराने गाळाच्या (स्तरित) खडकांत रूपांतर झाले. कालांतराने गोंडवनभूमी उत्तरेकडे सरकू लागल्यामुळे दोन्ही खंडे एकमेकांजवळ येऊ लागली. परिणामतः टेथीसमधील गाळाच्या मृदू खडकांवर दाब पडून तेथील भूकवचाला वळ्या पडू लागल्या. दाब जसजसा वाढत गेला, तसतशा वळ्या उंचावत गेल्या. ही पर्वतनिर्माणकारी हालचाल सुमारे ५० द. ल. वर्षांपूर्वी सुरू झाली असावी. ही वलीकरण क्रिया अगदी संथ गतीने दीर्घकाळपर्यंत चालू राहून टेथीस समुद्राच्या जागेवर उंच हिमालयीन पर्वतश्रेण्या अस्तित्वात आल्या. व्हेगेनर यांच्या मते, गोंडवाना भूखंडात अनेक प्रस्तरभंग घडून येत होते. या प्रस्तरभंगांमुळे गोंडवाना अनेक तुकड्यांत विभागले जाऊन त्यांचे वहन चालू होते. त्यामुळे हे तुकडे एकमेकांपासून दूर जाऊ लागले. आज दख्खनच्या पठारावरून पश्चिमेस वाहणाऱ्या नर्मदा आणि तापी नद्यांच्या प्रवाहमार्गांच्या जागेवर दोन मोठे प्रस्तरभंग होते. या सर्व घटना हिमालय पर्वत निर्मितीशी निगडित आहेत. हिमालय पर्वताच्या निर्मितीची ही प्रक्रिया न्युम्युलाइट कालखंडानंतर सुरू होऊन ती प्लाइस्टोसीन कालखंडापर्यंत चालू राहिली. पूर्ण उंचीच्या पर्वताची निर्मिती होण्यासाठी एकूण सुमारे ६-७ द. ल. वर्षे लागली. त्याच वेळी क्षरण क्रियाही चालू होती. हिमालय उंचावण्याची ही गती अतिशय मंद असल्यामुळे येथून पूर्वीपासून वाहणाऱ्या नद्यांनी आपले मूळ प्रवाहाचे क्षरण करून कायम ठेवले. उदा., पश्चिमवाहिनी सतलज नदीने येथील उत्तर-दक्षिण पर्वतश्रेणीचे कल्पा (चिनी) येथे सुमरे ६०० मी. खोल क्षरण करून हिमालय पार केला आहे. हिमालय निर्मितीची उत्क्षेप क्रिया चालू असताना तीन वेळा मोठे रेटे बसले. त्यामुळे हिमालयाच्या एकमेकींना समांतर अशा तीन श्रेण्या अस्तित्वात आल्या. भूवैज्ञानिक दृष्ट्या हिमालयाच्या निर्मितीचा हा काळ तृतीयक कालखंडाचा मानला जातो. सर्वांत अलीकडच्या पर्वत निर्माणकारी हालचालींमधून हिमालय पर्वताची निर्मिती झालेली असल्यामुळे याला सर्वांत तरुण पर्वत समजले जाते. गोंडवनभूमी उत्तरेकडे सरकण्याची आणि हिमालयाची उंची वाढण्याची क्रिया अजूनही चालू आहे; परंतु ती अतिशय मंद आहे.
हिमालयाच्या निर्मितीबाबत अशीही एक शक्यता वर्तविली जाते की, नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे टेथीसच्या तळभागावर प्रचंड प्रमाणावर निक्षेपण होऊन त्यापासून तेथे गाळाच्या खडकांची निर्मिती झाली. गाळाच्या खडकाच्या राशींमुळे टेथीसच्या तळभागावर प्रचंड वजनाचा दाब पडून तेथे भूद्रोणी निर्माण झाली. भूगतिकी शक्तींमुळे उत्तरेकडील अंगाराभूमी दक्षिणेकडे सरकू लागल्यामुळे गोंडवनभूमी आणि अंगारा या खंडांदरम्यानचे अंतर कमी होऊ लागले. अंगाराभूमीच्या दाबामुळे टेथीसचा तळ हळूहळू वर उचलला जाऊ लागला. कालांतराने तेथे हिमालय या घडीच्या पर्वतश्रेण्यांची निर्मिती झाली. उत्तरेकडून अंगाराभूमीचा दाब पडून हिमालय निर्माण झाल्याने त्याचा आकार कमानीप्रमाणे झाला असून त्या कमानीचा बहिर्वक्र भाग दक्षिणेकडे आला आहे.
भूपट्ट सांरचनिकी सिद्धांतानुसार दक्षिणेकडील भारतीय भूपट्ट आणि उत्तरेकडील यूरेशियन भूपट्ट यांचा परस्परांवर आघात होऊ लागला. दोन्ही भूपट्ट एकमेकांकडे सरकत राहिल्यामुळे भूपट्टांच्या सीमारेषांवर (कडांवर) दाब पडू लागला. त्या दाबामुळे भूपट्टांच्या कडांवर गिरिजनक हालचाली सुरू होऊन त्यातूनच हिमालयाची निर्मिती झाली असावी, असे मानले जाते. क्रिटेशस कालखंडात (सुमारे ७० द. ल. वर्षांपूर्वी) भारतीय भूपट्ट वर्षाला १५ सेंमी. या वेगाने उत्तरेकडे सरकत होता. या वेगाने भारतीय भूपट्ट उत्तरेकडे सरकत राहिल्यामुळे सुमारे ४० ते ५० द. ल. वर्षांपूर्वी भारतीय व यूरेशियन भूपट्ट एकमेकांना येऊन भिडले. त्यामुळे टेथीस समुद्र पूर्णपणे बंद झाला. कालांतराने टेथीसच्या तळावरील गाळाच्या खडकांवर पडलेल्या दाबामुळे तो भाग उंचावत गेला आणि शेवटी तेथे हिमालयाची निर्मिती झाली. यातील मौंट एव्हरेस्ट शिखर सागरी चुनखडीच्या खडकांपासून बनलेले आहे.
सांप्रत भारतीय भूपट्ट सातत्याने यूरेशियन भूपट्टाखाली (तेथील तिबेटच्या पठाराखाली) सरकत असल्यामुळे तिबेटच्या पठाराचा भाग उंचावत आहे. किंबहुना तिबेटच्या पठाराची निर्मिती या प्रक्रियेतूनच झालेली असावी. भारतीय भूपट्टाच्या उत्तरेकडील सरकण्यामुळे हिमालयाची उंची वर्षाला ५ मिमी. या वेगाने वाढत आहे; मात्र या वेगाबद्दल मतभिन्नता आढळते. भारतीय भूपट्ट यूरेशियन भूपट्टाखाली सरकण्यामुळे हा भाग क्रियाशील भूकंपप्रवण बनला आहे. म्यानमारमधील आराकान योमा पर्वत आणि बंगालच्या उपसागरातील अंदमान व निकोबार या बेटांच्या उंचवट्याची निर्मिती अशाच प्रकारे भूपट्टांच्या एकमेकांवरील आघातामुळे झालेली आहे.
समीक्षक : माधव चौंडे