भौगोलिक दृष्ट्या हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून-पूर्वेकडे सामान्यपणे पंजाब हिमालय, कुमाऊँ हिमालय, नेपाळ हिमालय व आसाम हिमालय असे चार उपविभाग केले जातात. कित्येकदा काश्मीर हिमालय, पंजाब, कुमाऊँ, नेपाळ, सिक्कीम, दार्जिलिंग, भूतान व आसाम हिमालय अशा उपविभागांतही वर्गीकरण केले जाते.
काश्मीर हिमालय : हिमालयाचा सर्वाधिक रुंदीचा भाग जम्मू व काश्मीर राज्यात आहे. येथील हिमालयाची पश्चिम-पूर्व लांबी सुमारे ७०० किमी. व उत्तर-दक्षिण रुंदी सुमारे ५०० किमी. असून क्षेत्रफळ सुमारे ३,५०,००० चौ. किमी. आहे. येथील भूमिस्वरूपे, वनाच्छादन, मृदा प्रकार, हवामान व प्रदेशाची सुगमता इत्यादी घटकांमध्ये बरीच विविधता आढळते. हिमालयाच्या इतर कोणत्याही उपविभागापेक्षा काश्मीर हिमालयात सर्वाधिक हिमाच्छादन व हिमनद्या आढळतात. काश्मीरमध्ये ज्याप्रमाणे अनेक उंचउंच पसरलेल्या कर्णाकृती रांगा आणि तटबंदीयुक्त रांगांच्या दरम्यान द्रोणीसारखी अनुदैर्घ्य खोरी आढळतात, त्याप्रमाणे हिमालयाच्या अन्य कोणत्याही भागांत आढळत नाहीत. येथील बृहत् हिमालय श्रेणीमुळे उत्तर काश्मीर हिमालय व दक्षिण काश्मीर हिमालय असे दोन भाग झाले आहेत. काश्मीरमधील बृहत् हिमालय श्रेणी नंगा पर्वतापासून पूर्वेस सुमारे ८५० किमी. अंतरापर्यंत वेड्यावाकड्या स्वरूपात पसरली असून तेथील तिची सरासरी उंची ५,५०० मी. आहे. काश्मीर हिमालयाचा ईशान्य भाग लडाख पठाराने व्यापला आहे. या पठाराची सरासरी उंची सुमारे ५,३०० मी. आहे. भारतातील हे सर्वाधिक उंचीचे पठार आहे. भूतकालीन हिमानी क्रियांचे तसेच स्थलिप्राय मैदानांचे पुरावे येथे दिसतात. हिमाद्रीच्या दक्षिणेस वैशिष्ट्यपूर्ण हिमाचल श्रेण्या आहेत. हिमाचल पट्ट्याची येथील रुंदी सुमारे १०० किमी. व सरासरी उंची सुमारे ३,००० मी. आहे. काश्मीरमधील शिवालिक टेकड्या जम्मू प्रदेशात असून त्यांना जम्मू टेकड्या असेही संबोधले जाते. या टेकड्यांचा विस्तार झेलम नदीपासून ते रावी नदीपर्यंत आहे. शिवालिकच्या मैदानी प्रदेशात चिनाब नदीची उपनदी रावी हिच्या काठावर जम्मू शहर वसले आहे.
पंजाब हिमालय : पंजाब व हिमाचल प्रदेशातील पर्वतराजीला पंजाब हिमालय असे म्हणतात. क्षेत्रफळ सुमारे ४५,००० चौ. किमी. चिनाब, रावी, बिआस, सतलज आणि त्यांच्या उपनद्यांनी या हिमालयीन भागाचे जलवहन केले आहे.
कुमाऊँ हिमालय : उत्तराखंडमधील पर्वतराजीला कुमाऊँ हिमालय असे संबोधले जाते. सतलज व काली (शारदा) या नद्यांच्या दरम्यानचा भाग यात येतो. गंगा व यमुना नद्यांची उगमस्थाने या दृष्टीने कुमाऊँ हिमालयाला महत्त्व आहे. या विभागाचा विस्तार सुमारे ३८,००० चौ. किमी. असून शिवालिक, हिमाचल आणि हिमाद्री या तिन्ही पर्वतश्रेण्यांचे क्षेत्र स्पष्टपणे यामध्ये दिसते. यांपैकी शिवालिक प्रदेश यमुना व गंगा नद्यांदरम्यानच्या सुमारे ७४ किमी. लांबीच्या क्षेत्रात पसरला आहे. या भागातील उतार वनाच्छादित असून त्यात ९०० – १,००० मी. उंचीची सपाट माथ्याची शिखरे आढळतात. शिवालिकच्या उत्तरेस शिवालिकला समांतर अशा संरचनात्मक द्रोणी निर्माण झाल्या आहेत. पूर्वेकडील भागापेक्षा पश्चिमेकडील भागात या द्रोणी अधिक विकसित झालेल्या आढळतात. उदा., पश्चिम भागातील डेहराडून द्रोणी सुमारे ७५ किमी. लांबीची व १५ – २० किमी. रुंदीची आहे. कुमाऊँ हिमालयातच शिवालिकच्या व प्रामुख्याने द्रोणी प्रदेशाच्या उत्तरेस असलेल्या हिमाचल हिमालयात मसूरी व नाग टिब्बा या दोन श्रेण्यांचा समावेश होतो. त्यांपैकी सुमारे १२० किमी. लांबीच्या मसूरी श्रेणीत सुमारे २,००० – २,६०० मी. उंचीची मसूरी व रानीखेतसारखी अनेक गिरिस्थाने आहेत. त्यांपैकी मसूरीला हिमालयातील गिरिस्थानांची राणी असे संबोधले जाते. नैनिताल शहराजवळ अनेक सरोवरे (ताल) असून त्यांपैकी नैनिताल आणि भीमताल ही सरोवरे विशेष सुंदर आहेत. नंदादेवी व त्रिशूल ही येथील हिमाचल श्रेणीतील प्रमुख शिखरे आहेत. कुमाऊँ हिमालयातील हिमाद्रीमध्ये सुमारे ६,६०० चौ. किमी. क्षेत्र हिमाच्छादित (हिमाल) आहे. गंगोत्री हिमालमधून गंगोत्री व केदारनाथ या हिमनद्यांना, तर नंदादेवी हिमालपासून मिलम व पिंडारी या हिमनद्यांना हिमाचा पुरवठा होतो. गंगोत्री हिमनदीची लांबी ३० किमी. असून तिच्या चार उप-हिमनद्या प्रत्येकी सुमारे आठ किमी. लांबीच्या आहेत. बद्रीनाथपासून कुमाऊँ हिमाद्रीमधील उंचउंच शिखरे दिसतात. नंदादेवी हे यांतील सर्वोच्च शिखर असून त्याशिवाय दूनगिरी (७,०६६ मी.), त्रिशूल (७,१२० मी.), नंदाकोट (६,८६१ मी.), नंदाकाना (६,३०९ मी.), नंदाघुंटी (६,०६३ मी.), कामेट (७,७५६ मी.), सतोपंथ (७,०८४ मी.), बद्रीनाथ (७,१३८ मी.), केदारनाथ (६,९४० मी.), गंगोत्री (६,६१४ मी.) व श्रीकांता (६,७२८ मी.) ही यातील इतर प्रमुख शिखरे आहेत.
सिक्कीम हिमालय : सिक्कीम हिमालयाची पश्चिम सरहद्द सिंगलिआ (सिंगलिला) श्रेणीने, तर पूर्व सरहद्द डोंख्या श्रेणीने सीमित केलेली आहे. हिमाद्री श्रेणी सिक्कीममध्ये आल्यानंतर तिची दिशा पूर्व बनलेली आहे. या दिशेत काही अंतर गेल्यानंतर ती ईशान्येकडे वळलेली दिसते. या भागात हिमालयाच्या दक्षिण सरहद्दीवर शिवालिक श्रेणीची केवळ एक अरुंद पट्टी दिसते. सिक्कीम हिमालयात तिस्ता नदीचे विस्तृत खोरे आहे. सिक्कीम व चुंबी खोरे यांदरम्यानचे व्यापारी मार्ग नथू ला व जेलेप ला या खिंडींतून जातात.
दार्जिलिंग हिमालय : दार्जिलिंग हिमालयात उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेल्या सिंगलिआ व दार्जिलिंग या दोन प्रमुख श्रेण्या आहेत. त्यांपैकी सिंगलिआ श्रेणीमुळे दार्जिलिंग जिल्हा (प. बंगाल) नेपाळपासून अलग झाला आहे. दार्जिलिंग श्रेणी तराई मैदानापासून सेंचल शिखरापर्यंत एकदम वाढत गेलेली दिसते. या हिमालयीन भागात सुमारे २,१०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात अनेक ठिकाणी चहाचे मळे आहेत. या हिमालयीन भागाचे जलवहन मेची, बालासन, महानंदा, ग्रेट रनगीट व तिस्ता नद्यांनी केलेले आहे. त्यांपैकी तिस्ता ही सर्वांत मोठी नदी आहे.
भूतान हिमालय : भूतान हिमालयाने सुमारे २२,५०० चौ. किमी. क्षेत्र व्यापले असून त्यात खोल दऱ्या आणि उंच पर्वतरांगा आढळतात. थोड्याशा अंतरात भूमिस्वरूपात एकदम बदल झालेले दिसतात. त्याचा येथील हवामानावर परिणाम झालेला दिसतो. भूतानच्या एका दिवसाच्या प्रवासात सायबीरियन हिवाळ्यासारखे अति थंड हवामान, सहारासारखे अतिशय उष्ण हवामान आणि इटलीतील भूमध्य सागरी प्रकारचे सौम्य आल्हाददायक हवामानही अनुभवास येते. भूतान हिमालयात तोसी नदीच्या पूर्वेस शिवालिक श्रेण्या पुन्हा दिसू लागतात. तेथून त्या पुढे देशाच्या पूर्व भागापर्यंत आढळतात. भूतान हिमाचलमध्ये उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेल्या श्रेण्या दिसतात. उदा., मसंग क्यूंगडू, थिंफू. थिंफू श्रेणीच्या पूर्वेस अतिशय ओबडधोबड असे पुनाखा खोरे आहे.
आसाम हिमालय : हिमालयाचा हा सर्वांत पूर्वेकडील भाग अरुणाचल प्रदेशात विस्तारलेला आहे. क्षेत्रफळ सुमारे ६७,५०० चौ. किमी. येथे हिमाद्री, हिमाचल व शिवालिक हे तीनही भाग स्पष्टपणे दिसतात. येथील सृष्टिसौंदर्यामध्ये खूपच विविधता आढळते. तसेच वनाच्छादित शिवालिक टेकड्या ब्रह्मपुत्रा खोऱ्यापासून एकदम सुमारे ८०० मी. उंचीपर्यंत वाढत गेलेल्या दिसतात. हिमाचल श्रेण्यांमध्ये समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारची वने आढळतात. आसाम हिमाद्रीचा विस्तार नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत असून त्यात ६,००० मी. पेक्षा अधिक उंचीची अनेक शिखरे आहेत.
समीक्षक : नामदेव गाडे