पश्चिम घाटाची ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळख असलेले कास पुष्प पठार हे सातारा शहरापासून २५ किमी.वर आहे. समुद्रसपाटीपासून १२०० मी. उंचीवर असलेले हे पठार सुमारे १० चौ.किमी. क्षेत्रात विस्तारले आहे. येथे ३ ते ४ हजार मिमी. पाऊस पडतो. १० – ३० से. तापमान असते,  तर आर्द्रता मध्यम असते. हे निमसदाहरित पानगळीचे रान (Semi Evergreen Deciduous Forest) या प्रकारचे वनपरिक्षेत्र आहे. येथील बेसाल्ट खडकाची झीज होऊन त्याची माती बनते. ही माती ‘जांभी मृदा’ या प्रकारची असते. या पठारावर तिचा साधारण २.५ ते ३ सेंमी. उंचीचा थर तयार होतो. त्याखाली सुमारे ४० किमी. बेसाल्ट खडक असतो. येथून जवळच २०-३० कि.मी. अंतरावर कोयना अभयारण्य असल्यामुळे हे पठारही संरक्षित वनक्षेत्र म्हणून गणले जाते.

कास पुष्प पठारावर जून ते ऑक्टोबर या कालावधीत फुले येतात. सतत बदलते हवामान आणि तापमान यांमुळे येथे फुलणारी फुले आकाराने लहान असतात. त्यांच्या पुनरुत्पादनाची शक्यता जास्तीत जास्त असावी, यासाठी फुलांमध्ये कोट्यवधी परागकणांची निर्मिती होत असते. त्यामुळे एका वेळेस एका जातीची अगणित फुले फुलतात आणि फुलांचा एकाच रंगाचा गालिचा पसरल्यासारखा दिसतो. ‘सीतेची आसवे’ (युट्रिक्युलेरिया) निळी, हबे आमरी (हॅबेनेरिया) पांढरी, तेरडा (इम्पेटिएन्स) गुलाबी, सोनकी (सेनेशिया) पिवळी, मंजिरी (पोगोस्टेमन) जांभळी अशी फुले वेगवेगळ्या वेळी बहरल्यामुळे पठाराचा रंग सतत बदलत राहतो.

कास पुष्प पठारावर आठशेपेक्षा जास्त वनस्पती प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यांपैकी ४७ प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तेथे तेरड्याच्या (बाल्समिनेसी) कुलातील प्रजाती विपुल प्रमाणात आढळतात.

‘वायतुरा’ (ॲपोनोजेटोन सातारेन्सिस) ही ॲपोनोजेटोनेसी कुलातील वनस्पती जगात फक्त याच भागात सापडते. हिच्या देठाला इंग्लिश ‘वाय’सारखे (‘Y’सारखे) दोन फाटे फुटून प्रत्येक फाट्यावर छोटी गुलाबी फुले येतात. मात्र जमिनीतील याचे कंद विनाकारण उपटले गेल्यामुळे अलीकडे या कास परिसरातही ही वनस्पती फारशी दिसत नाही.

कास पुष्प पठारावर फुलणारी आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती म्हणजे टोपली कारवी (प्लिओकॉलिस रिची). याचे झुडूप उपडी टाकलेल्या टोपलीसारखे दिसते. याला आठ वर्षांनी फुलोरा येतो. याच्या पानांचा रस पोटाच्या विकारांवर गुणकारी समजला जातो.

पिवळ्या रंगाची सोनकी म्हणजे ऑर्किडेसी या कुलातील सुमारे दहा प्रजाती तेथे आढळतात. मुख्यत: पांढऱ्या व फिकट हिरव्या रंगांची फुले असतात. तसेच कंदीलपुष्प (सेरोपेजिया) या वनस्पतीच्या सहा प्रजाती आढळतात.

सीतेची आसवे (युट्रिक्युलेरिया) व दवबिंदू (ड्रॉसेरा) या कीटकभक्षी वनस्पती तेथे आढळतात. सीतेची आसवे या वनस्पतीच्या मुळांवर छोट्या पिशव्या आणि दाट केस असतात. दवबिंदू वनस्पतीच्या लांब काड्यासारख्या पानांवर केस आणि केसांच्या टोकांशी दवबिंदूसारखे दिसणारे चमकदार चिकट द्रवाचे थेंब असतात. कीटक या केसांमध्ये अडकतात आणि पचविले जातात.

कास पुष्प पठारावरील अनेक वनस्पती औषधी असल्याचे आढळून आले आहे. जंगली हळद या झिंजिबरेसी कुलातील वनस्पतींमध्ये प्रतिजैविक (Antibiotic) गुणधर्म आहेत. तसेच रक्तातून मेद नाहीसा करणे, सूज कमी करणे व गाठ कमी/नाहीशी करणे यांसाठीही या वनस्पतीचे विविध भाग वापरतात,

नरक्या (नोथॅपोटायडस) या वनस्पतीच्या खोडामध्ये आणि इफिजिनिया स्टेलाटामध्येही कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे समजले जाते. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेच्या (यूनेस्कोच्या) पथकाने ऑक्टोबर २०१० मध्ये कास पुष्प पठाराला भेट दिली होती. येथील अलौकिक जैवविविधता पाहून या परिसराला ‘जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा (World Natural Heritage Site चा) दर्जा बहाल करण्यात आला.

या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वन खात्याने व निसर्गप्रेमी स्वयंसेवी संस्थांनी विविध उपाय योजले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कुंपण घालण्यात आले आहे. रोज फक्त तीन हजार पर्यटकांनाच येथे येण्याची परवानगी दिली जाते.

संदर्भ :

  • इंगळहळीकर, श्रीकांत, नवा आसमंत, करोला पब्लिकेशन्स, पुणे, २०१२.
  • मोहिते, शेखर, फ्लॉवर्स ऑफ कास प्लॅटो , सातारा, २०१४.
  • डॉ. श्रोत्री, संदीप,पुष्प पठार कास , सातारा, २००९.

समीक्षक : बाळ फोंडके