युनुस एमरे : (मृत्यू -१३२०). मध्ययुगीन तुर्की कवी आणि सुफीसंत. तो सुफी संगीताचा रचनाकारही होता. अरबी आणि फार्शी या दोन भाषांपासून त्याच्या काव्यलेखानाला त्याने अलिप्त ठेवले आणि तुर्की भाषेतील लोकभाषा आणि लकब त्याने आपल्या काव्य अभिव्यक्तीसाठी वापरली. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात तो ॲनातोलिया (तुर्कस्तान) येथे रहात असावा आणि सिरिया, कॉकेशस या भागांत प्रवास करून त्याने प्रसिद्ध गूढवादी कवी जलाल-अल्-दिन रूमी आणि हाजी बेक्ताश यांचीही भेट घेतली असावी, असे दिसते.
अहमद येसावी आणि सुलतान वालद या दोन साहित्यिकांच्या साहित्याचा प्रभाव आजही तुर्की लोकजीवनावर आहे. याच लेखकांच्या साहित्याचा आदर्श त्याने आपल्या रचनांतून जोपासला. त्याच्या काव्यात्म भाषेचा प्रभाव विद्यमान तुर्की भाषेवर आजही जाणवतो. तुर्की भाषा बोलणाऱ्या प्रांतातील लोकसाहीत्यावर त्याच्या कवितेचा पगडा आहे. अनेक लोककथा आणि लोकगीते यामधून ही बाब प्रकर्षाने दिसून येते. मध्य आणि पश्चिम ॲनातोलियातील गूढवादी चळवळीचा युनुस एक मान्यवर प्रतिनिधी होता. त्याच्या कवितेत भावनाप्रधानता आणि धार्मिक उत्कटता यांचे उत्तम मिश्रण दिसून येते.
मानवी प्रारब्ध आणि मृत्यू हे विषय प्रामुख्याने त्याच्या काव्यात दिसून येतात. साधी, अनलंकृत भाषाशैली आणि तुर्की परंपरेतील साधी अक्षरवृत्ते ही त्याच्या काव्याची वैशिष्ट्ये होती. तुर्की साहित्यात विद्येच्या पुनरुज्जीवनाच्या काळात युनुस एमरेची कविता स्फूर्तिदायक ठरली. नंतरच्या पिढीतील गूढवादी कवींवरदेखील त्याचा फार मोठा प्रभाव पडला. त्याची कबर आपल्याच भूमीत आहे असे सांगणारी, सातांहून अधिक खेडी ॲनातोलियात आहेत पण साकार्या नदीजवळच्या सारीकॉम ह्याच खेड्यात बहुतेक त्याची कबर असावी, असे पुराव्यावरून दिसते.
संदर्भ : “Encyclopædia Britannica (2007)”.