महमूद अब्द अल बाकी : (१५२६ – ७ एप्रिल १६॰॰). विख्यात तुर्की कवी.  इस्तंबूलमध्ये जन्मला. त्याचे वडील मुअझ्झीन (नमाज पढण्यासाठी मशिदीतून हाक देणारे अधिकारी) होते. आरंभी बाकीने खोगीरे बनविणाऱ्या एका इसमाकडे उमेदवारी केली परंतु पुढे त्याने कायद्याचा अभ्यास केला तो काव्यलेखन करू लागला तत्कालीन वाङ्मयीन वर्तुळातून त्याचा वावर होऊ लागला. यथावकाश तुर्कस्तानचा सुलतान पहिला सुलेमान (सुलेमान द मॅग्निफिसंट ह्या नावाने प्रसिद्ध असलेला कार. १५२॰-६६) ह्याचा आश्रय त्याला लाभला. ह्या सुलतानाच्या मृत्यूनंतर बाकीने त्याच्यावर लिहिलेली विलापिका बाकीच्या सर्वोत्कृष्ट काव्यरचनांत अंतर्भूत केली जाते. भावनोत्कटता आणि भव्योदात्ततेची जाणीव निर्माण करणारी भाषाशैली ही ह्या विलापिकेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत.

बाकी हा त्याच्या गझलरचनांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. जीवनातील सुखोपभोगांची क्षणभंगुरता हा त्याच्या कवितेचा मुख्य विषय होय. छंदांवरील प्रभुत्व वेचक, नादवती शब्दकळा आणि तांत्रिक सफाई हे त्याच्या कवितेचे अन्य काही विशेष.

‘कवींचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा हा थोर कवी इस्तंबूल येथे मरण पावला.

संदर्भ :

  • https://www.metmuseum.org/art/collection/search/447807

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.