योकाई, माउरूस : (१८ फेब्रुवारी १८२५ – ५ मे १९०४). श्रेष्ठ हंगेरिअन कादंबरीकार. त्याचा जन्म विद्यमान स्लोवाकिया गणराज्यातील कोमारॉम येथे झाला. त्याचे आई वडील दोघेही सुखी आणि राजसंपन्न घराण्यातील होते. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्याचे शिक्षण घरीच झाले. माउरूसमध्ये बालवयातच बुद्धीचे तेज होते. त्याचे वडील व्यवसायाने वकील होते. अल्पावधीतच वडिलांचे निधन झाल्यावर कुटुंबाने त्याला वकिलीचे शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. १८४६ साली त्याने कायद्याची पदवी घेतली पण वकिलीचा व्यवसाय फारसा केला नाही साहित्य आणि राजकारण ह्या क्षेत्रांतच राहिला. वकिली व्यवसायातील केल्या जाणाऱ्या तडजोडी नैतिकदृष्ट्या त्याला अप्रिय वाटत होत्या.
हंगेरियन अकॅडमीने त्याच्या झेसिडा फि (ज्यू बॉय) ह्या पहिल्या नाटकाचे प्रयोग केल्याने तो बुडापेस्टला आपल्या साहित्य कारकीर्दीला वळण देण्यासाठी गेला. तेथील साहित्य चळवळीतील लोकांशी त्याचा परिचय झाला. प्रारंभी एका नियतकालिकात प्रकाशित झालेल्या त्याच्या वर्किंग डेज ह्या पहिल्या कादंबरीचे प्रकाशन झाले. त्याच्या साहित्यातील विलक्षण प्रभावामुळे लवकरच बुडापेस्ट मधील साहित्य विश्वात त्याला प्रसिद्धी मिळाली आणि त्या काळात लोकप्रिय आणि अभिजात दर्जा असणाऱ्या इलेटकीपेक (Életképek),या नियतकालिकाचे संपादकपद त्याला मिळाले. १८४५ मध्ये त्याने शोकात्म पात्रांचा अभिनय करणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रिशी विवाह केला.
१८४८ साली हंगेरीत झालेल्या क्रांतिकारक चळवळीत तो सहभागी होता. हंगेरिअन संसदेत विरोधी पक्षनेता म्हणून त्याने काही काळ काम केले. १८९७ मध्ये हंगेरिअन संसदेच्या वरिष्ठ गृहाचा आजीव सदस्य म्हणून त्याची निवड झाली. विक्टोरिया कालखंडातील इंग्रजी साहित्यामध्ये त्याच्या साहित्याला विशेष प्रसिद्धी मिळाली होती. खुद्द विक्टोरिया राणी त्याच्या साहित्याची चाहती होती असे सांगितले जाते. योकाईने नाट्यलेखन आणि कथालेखनही केलेले असले, तरी त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्याच्या कादंबरीलेखनावर. वर्किंग डेज (१८४६, इं. शी.) ही त्याची पहिली कादंबरी. त्याच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्यांत (सर्व इं. भा.) द गोल्डन एज इन ट्रान्सिल्व्हेनिया (१८५२), द डे ऑफ रॉथ (१८५६), द बॅरन्स सन्स (१८६९) आणि ब्लॅक डायमंड्स (१८७०) ह्यांचा समावेश होतो. जोमदार शैली, विनोदाचा परिणामकारक वापर आणि गतिमान कथानके ही त्याच्या कादंबरीची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत.
बूडापेस्ट येथे तो निधन पावला.
संदर्भ :
- https://moly.hu/konyvek/jokai-mor-a-jovo-szazad-regenye