किशोरवयीन मुलांमधील स्थूलता ही जागतिक आरोग्य समस्या बनते आहे. स्थूलतेचा परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत असल्याने ती टाळणे काळाची गरज आहे. ठराविक वय, उंची आणि लिंगासाठी असणाऱ्या सर्वसाधारण वजनापेक्षा अधिक वजन म्हणजे स्थूलता होय. शरीरातील त्वचेखाली व इतर अवयवांमध्ये जास्तीची चरबी साठते तेव्हा मुलांमध्ये स्थूलता निर्माण होते.
स्थूलतेस कारणीभूत घटक :
- वय : कोणत्याही वयात हे होऊ शकते व साधारणत: वयाप्रमाणे स्थूलता वाढत जाते. १/३ स्थूलता असलेले प्रौढ लहानपणापासूनच स्थूल असतात.
- लिंग :पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्येच स्थूलतेचे प्रमाण जास्त आढळते, परंतु ज्यादा वजानवाढीचे प्रमाण पुरुषांमध्ये आढळते
- अनुवंशिकता : स्थूल पालकांची मुले स्थूल असण्याची शक्यता अधिक असते.
- खाण्याच्या सवयी : प्रामुख्याने गोड पदार्थ खाणे, एकाचवेळी खूप खाणे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ व चरबीयुक्त पदार्थ खाणे, दोन जेवाणांच्यामध्ये खाणे, दूरदर्शन पाहतांना खाणे व भरपूर उष्मांक असणारे, सहज उपलब्ध होणारे बाजारी खाऊ खाणे. सवयी या वर्तनात उतरतात. मुलांच्या खाण्याच्या सवयींमध्ये जेवण टाळणे (मुख्यतः सकाळचा नाश्ता) व रात्री उशिरा जेवणे यांचा समावेश होतो. झोपण्यापूर्वी खाल्लेल्या पदार्थांतील उष्मांक वापरले जात नाहीत व ते चरबी स्वरुपात साठविले जातात. त्यामुळे ही समस्या अधिकच वाढते.
- शारीरिक हालचाली नसणे : बैठे काम व कमी शारीरिक हालचाली वजन वाढण्यास करणीभूत असतात आणि स्थूलपणामुळे हालचालींवर निर्बंध येतात. हे दुष्टचक्र चालू होते.
- उर्जेचा कमी वापर : सतत विश्रांती घेत राहिल्याने शारीरिक ऊर्जेचा वापर कमी होतो.
- सामाजिक व आर्थिक परिस्थिती :भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीचा देखील स्थूलतेवर परिणाम होतो.
- अंतःस्रावी ग्रंथींची कारणे : तुरळक कारणांमध्ये याचा समावेश होतो, उदा. कुशिंग संलक्षण, वाढीच्या अंतःस्रावांची कमतरता.
- औषधे : काही औषधांचा वापर उदा. कोर्टिको- स्टेरॉइड्स, संतती प्रतिबंधक औषधे, इन्शुलिन इत्यादींमुळे वजन वाढू शकते.
स्थूलतेचे दुष्परिणाम :
- शारीरिक आरोग्य : उच्च रक्तदाब, श्वसनाचे आजार, हाडासंबंधी तक्रारी, मधुमेह, रक्तातील सिराम लिपीड चे प्रमाण वाढणे अशा प्रकारच्या प्रौढावस्थेत आढळणाऱ्या आरोग्य समस्या या किशोरवयातील स्थूलतेशी निगडीत आहेत.
- मानसिक व सामाजिक आरोग्य : स्थूलतेमुळे इतरांकडून भेदभावाची वागणूक मिळू शकते. मित्रांकडून चिडवले जाण्यामुळे मुलांमध्ये स्वतःविषयी नकारात्मक भावना निर्माण होते व त्यामुळे त्याच्यात वर्तणूकीच्या व शिकण्याच्या समस्या उद्भवतात.
वजन नियंत्रण म्हणजे ते आरोग्यदायी किंवा मान्यतेप्रमाणे बॉडी मास इंडेक्स च्या प्रमाणात राखणे होय. यात सर्व लोकांमध्ये वजनवाढ ५ किग्रॅ. पेक्षा जास्त होऊ न देणे आणि जे मुळातच जास्त वजनाचे आहेत त्यांचे वजन ५-१०% ने कमी करणे याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते.
परिचर्या उपाय योजना : शालेय आरोग्य परिचारिकेने किंवा बाल आरोग्य परिचारिकेने शालेय मुलांना देण्याचे आरोग्य शिक्षण
- आहारातील बदल – थोडे थोडे पण जास्त वेळा खाणे, कच्च्या भाज्या (सॅलड), फळे, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात भरपूर वापर, बाजारी खाद्यपदार्थ टाळणे.
- शारीरिक हालचाली व व्यायाम वाढविणे. अन्न ऊर्जा ही आवश्यक ऊर्जा वापरपेक्षा जास्त न घेणे.
- वर्तणूकीतील बदल- जीवनशैलीतील बदल, रोजच्या जेवणाचे नियोजन, खाण्याच्या सवयी बदलणे, उपलब्ध अन्नपदार्थांचे पोषक तत्व वाढविणे, मुलांमधील स्थूलतेविषयीचे लोकांचे ज्ञान वाढविणे, वजन नियंत्रणात लोकांचा सहभाग.
- इतर प्रतिबंधात्मक उपाय- भूक कमी करणारी औषधे, अतिप्रमाणातील स्थूलता कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया उपचार (बॅरीयाट्रिक शस्त्रक्रिया). हे खर्चिक व जोखमीचे उपाय आहेत.
- आरोग्य शिक्षणाने जन जागृती करावी.
वरील तक्त्यानुसार मुलांचे लिंग, वय, वजन व उष्मांक यांची तुलना करून वजन नियंत्रणास परिचारिका मदत करू शकते. तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे मुलांच्या योग्य वजनाकरिता त्यांच्या आहार-विहाराची माहिती मिळवून त्यांच्या जीवनशैलीत योग्य बदल सुचवून परिचारिका मदत करते.
संदर्भ :
- गायत्री सं. म्हात्रे, शोधनिबंध, आरोग्यपञिका २०१६.
समीक्षक : सरोज वा. उपासनी