काँक्रीट हे जगातील सर्वाधिक आणि सर्वत्र सामान्यपणे वापरण्यात येणारे बांधकाम साहित्य आहे. सर्वसाधारणपणे काँक्रीट लहान किंवा मोठ्या आकाराचे दगड / खडी, वाळू, सिमेंट आणि पाणी यांच्या मिश्रणापासून तयार केले जाते. या सर्व घटकांना दोन वेगवेगळ्या भागात विभागायचे झाल्यास सिमेंट आणि पाणी यांच्या मिश्रणातून पेस्ट तयार होते, जी वाळू आणि खडी / दगड यांच्या मिश्रणावर आवरण तयार करते. सिमेंट आणि पाणी यांच्या मिश्रणामुळे होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेस सजलन (Hydration) असे म्हणतात. या प्रक्रियेमुळे सिमेंटची रबडी (Paste) कठिण होते आणि तिच्यामध्ये सामर्थ्य निर्माण होते. या कठिण आणि सामर्थ्यपूर्ण रबडीमध्ये वाळू, दगड आणि खडीसुद्धा एकत्रपणे बांधले जाऊन खडकाच्या सदृश्य काठिण्य असलेले काँक्रीट निर्माण होते.
या प्रक्रियेदरम्यान सुरुवातीला ओले असलेले काँक्रीटचे मिश्रण कोणत्याही अपेक्षित आकारामध्ये घडविण्यास सुलभ असते. आणि त्याला कुठल्याही प्रकारचे इष्ट रूप देणे देखील अतिशय सोपे असते. अशाप्रकारे सुरुवातीला हाताळण्यास अतिशय सोपे असलेले परंतु घट्ट झाल्यावर अपेक्षित सामर्थ्य आणि टिकाऊ बांधकाम निर्माण करण्याच्या वैशिष्ट्यामुळे काँक्रीट हे अतिशय लोकप्रिय बांधकाम साहित्य ठरते. याबरोबरच काँक्रीट तयार करण्यासाठी लागणारे सगळे साहित्य स्थानिकरित्या उपलब्ध असते आणि म्हणूनच कमी खर्चाचे ठरते. दुष्परिणामांपासून इमारतींचे संरक्षण करते. वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणात काँक्रीट टिकाऊ ठरते. ऊन, वारा, पाऊस, बर्फ इ. सर्व नैसर्गिक घटकांच्या वरील सर्व वैशिष्ट्यांमुळे इतर सर्व बांधकाम साहित्याच्या तुलनेत जगभरात काँक्रीटच्या बांधकामाला सर्वाधिक पसंती दिली जाते. म्हणूनच जगभरातील लहान मोठ्या घरांच्या इमारती, गगनचुंबी इमारती, विविध आधार – सुविधांच्या संरचना उदा., घरे, इस्पितळे, शाळा, महाविद्यालये, कार्यालये किंवा रस्ते, पूल, रेल्वेस्थानक इ. सर्वच प्रकारच्या बांधकामासाठी खूप मोठ्या प्रमाणावर काँक्रीट वापरले जाते.
काँक्रीटची पर्यायी स्वरूपे :
- रेडी मिक्स काँक्रीट (Ready Mix Concrete) : सर्वाधिक प्रचलित असलेले काँक्रीटचे हे रूप आहे. यामध्ये स्थानिक कारखान्यांमध्ये काँक्रीटसाठी लागणारे सर्व साहित्य विशिष्ट प्रमाणामध्ये वजन केल्यावर एकत्रित करून त्यानंतर फिरत्या ड्रमच्या ट्रकमध्ये भरून बांधकामस्थळी पुरविले जाते.
- पूर्वाकारित काँक्रीट (Precast Concrete) : हे सहसा कारखान्यांमध्ये तयार केले जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे कारखान्यांमध्ये निर्माण करण्यामुळे त्यावर अतिशय कडक गुणनियंत्रण केले जाते. ज्यामुळे उत्तम प्रतीचे आणि इष्ट गुणधर्मांची काँक्रीटची उत्पादने तयार केली जाऊ शकतात. उदा., काँक्रीटच्या विटा, पुलाच्या बांधकामासाठी लागणारे काही बांधकाम उत्पादने, रेल्वेचे स्लीपर्स, काही विशिष्ट संरचनात्मक घटक, भिंती, दरवाजे किंवा खिडक्यांच्या चौकटी इत्यादींबरोबरच कारखान्यांमध्ये निर्माण करण्यात येणारे काँक्रीटचे ठोकळे (Blocks) देखील अतिशय प्रचलित आहेत. काँक्रीटचे ठोकळे अनेक वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे किंवा इष्ट स्वरूपाच्या बांधकामासाठी निर्माण करता येऊ शकतात.
- काँक्रीटचे तिसरे स्वरूप म्हणजे केवळ सिमेंट, वाळू आणि काहीवेळा बारीक आकाराची खडी वापरून तयार केलेले बांधकामासाठी तयार असलेले मिश्रण. हे मिश्रण सहसा ठराविक आकाराच्या आणि वजनाच्या पिशव्यांमधून विकले जाते. बांधकामास वापरण्याआधी यामध्ये केवळ पुर्वनियोजित प्रमाणात पाणी मिसळले जाते. या प्रकारच्या पूर्वमिश्रित काँक्रीटचा अनेक प्रकारच्या दुरूस्तीकामांसाठी आणि नवीन बांधकामांसाठी वापर केला जातो. या पद्धतीच्या मिश्रणाला गारा किंवा मसाला (Grout / Mortar) असे देखील म्हटले जाते.
- अलिकडच्या काळात सिमेंट आणि काही विशिष्ट प्रकारची बारीक खडी किंवा वाळू यांच्या मिश्रणामध्ये तंतू मिसळण्यात येतात. यांपासून छतांची कौले किंवा संबंधित बांधकाम साहित्याची निर्मिती कली जाते.
पहा : काँक्रीट
संदर्भ :
- M. Neville, Properties of concrete.
- S. Shetty, S. Chand, Concrete Technology, New Delhi.
- https://www.concretenetwork.com/concrete.html