तेलंगणा राज्यातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ सूर्यापेट जिल्ह्यातील नगरम तालुक्यात सूर्यापेटच्या ईशान्येस सुमारे ४० किमी. आणि हैदराबादच्या पूर्वेस सुमारे १२५ किमी. अंतरावर आहे. प्राचीन बौद्ध स्थळाचे अवशेष गावाच्या उत्तरेस सुमारे १.५ किमी. अंतरावर उंच टेकाडावर आहेत. या प्राचीन अवशेषांचे समन्वेषण आणि उत्खनन तत्कालीन हैदराबाद सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक ख्वाजा मुहम्मद अहमद यांनी केले (१९४१-४४). या उत्खननात प्रामुख्याने विहारांचे अवशेष प्राप्त झाले असून चौरसाकृती विहारांच्या तीन बाजूस भिक्खुगृहांची योजना दिसून येते. या उत्खननात यक्षाचे शिल्प, वेदिकांचे अवशेष, सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप या राजवंशांची नाणी सापडली होती.

फणीगिरी येथील बौद्ध चैत्यगृहांचे अवशेष.

इ. स. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात केलेल्या उत्खननाचे मर्यादित स्वरूप लक्षात घेता आंध्र प्रदेश शासनाच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये विभागाने बी. बालसुब्रमन्यम, जे. विजय कुमार, जी. व्ही. रामकृष्ण राव आणि  के. एस. बी. केशव यांच्या निदर्शनाखाली इ. स. २००१-२००७ या दरम्यान येथे उत्खनन केले गेले. या उत्खननाचा प्रमुख उद्देश हा प्राचीन बौद्ध स्थळाच्या स्थापत्यिक अवशेषांचे स्वरूप जाणून घेणे हा होता. या उत्खननात टेकाडाच्या दक्षिण भागात भव्य महास्तूपाचे अवशेष सापडले. स्तूपाची बांधणी चक्राकृती स्वरूपाची असून स्तूपाच्या अधिष्ठान, अंड आणि चार आयक जोते (स्तूपाच्या चार दिशेस असणारे स्तंभयुक्त जोते) यांचे अवशेष सुद्धा उत्खननात सापडले. या स्तूपासमोरील भागात एका तोरणद्वाराचे अवशेष मिळाले. मध्य भारतातील काही बौद्ध स्तूपांना उदा., सांची स्तूप क्रमांक १ आणि ३, भारहूत स्तूप यांना तोरणद्वार बसविलेले आढळून येते. ज्याला तोरणद्वार बसविले होते, असा दक्षिण भारतातील हा एकमेव स्तूप आहे. तोरणद्वाराच्या तुळईवर बुद्ध जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग: जन्म, महाभिनिष्क्रमण, मारविजय, धर्मचक्रप्रवर्तन, तपस्सू आणि भल्लीक यांचे दान वगैरेचे अंकन केलेले आहे. टेकाडाच्या उत्तर आणि वायव्य भागात चार अर्धवर्तुळाकृती चैत्यगृहांचे अवशेष प्राप्त झाले आहेत. चैत्यगृहांत स्तूपांचे अवशेष सुद्धा सापडले आहेत.

बुद्ध जीवनाशी निगडीत प्रसंग दर्शविणारा शिल्पपट, राज्य वस्तुसंग्रहालय, हैदराबाद.

या उत्खननात उत्तर आणि पूर्वेकडील भागांत सहा विहारांचे अवशेष प्राप्त झाले. या विहारांचा तलविन्यास आयताकृती असून भिक्खुगृहांना सामाईक व्हरांडा आहे. या विहारात प्रवेश करण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारात पूर्णघटाचे अलंकरण विटात साचेबद्ध रूपात केलेले आढळून येते. विहारात असलेल्या भिक्खुगृहाच्या प्रवेशद्वारावर चंद्रशिला बसवलेली आहे. या उत्खननात बुद्ध आणि बोधिसत्त्व यांच्या प्रतिमा, जातककथा शिल्पपट्ट, बुद्धपद व पूर्णकुंभ यांचे शिल्पपट्ट, दंपतीशिल्प, गिलावा (stucco) पद्धतीने तयार केलेली मानवी शीर्षे आदी शिल्पावशेष सापडले आहेत. आहत व रोमन नाणी आणि सातवाहन, पश्चिमी क्षत्रप, महातलवार व इक्ष्वाकू या राजवंशाची नाणी सापडली आहेत. ब्राह्मी लिपीतील आणि प्राकृत भाषेतील सातवाहन आणि इक्ष्वाकू कालखंडातील ४२ शिलालेख या उत्खननात सापडले. या शिलालेखांमध्ये इक्ष्वाकू राजा रुद्रपुरुषदत्त याच्या १८व्या राज्यवर्षातील शिलालेख उल्लेखनीय आहे, ज्यामुळे या राजवंशावर नवा प्रकाश पडला आहे.

तेलंगणा शासनाच्या हेरिटेज तेलंगणा विभाग आणि डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २०१८-२०१९ या दरम्यान फणीगिरीचे पुनः उत्खनन केले गेले. प्रस्तुत उत्खननाचा मुख्य उद्देश हा यापूर्वी या पुरातत्त्वीय स्थळावर केल्या गेलेल्या उत्खननात वेगवेगळ्या भागांत खोदकाम झालेले असल्यामुळे या उत्खननात प्राप्त प्राचीन स्थापत्यिक अवशेषांचे असलेला संबंध, त्यांचे या प्राचीन बौद्ध स्थळाच्या जडणघडणीतील आणि विकासातील स्वरूप जाणून घेणे आणि त्यांची कालसंगत मांडणी करण्याच्या दृष्टीने संशोधन करणे होता. हे उत्खनन हेरिटेज तेलंगणा विभागाचे साहाय्यक संचालक पी. नागराजू आणि डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्थेचे डॉ. श्रीकांत गणवीर यांच्या संयुक्त निदर्शनाखाली केले गेले. या उत्खननात स्तंभयुक्त मंडप, वर्तुळाकृती चैत्यगृह, विहार, काम्य स्तूप यांचे अवशेष सापडले.

टेकाडाच्या ईशान्य आणि मध्यवर्ती भागात चार विहारांचे अवशेष सापडले. या विहारात विविध आकारांची भिक्खुगृहे असून त्यांच्या आतील भिंतींवर प्लॅस्टरचे अवशेष सुद्धा प्राप्त झाले आहेत. ईशान्य भागात २४ स्तंभयुक्त मंडपाचे अवशेष सापडले. या मंडपात पाषाणी स्तंभ विटांनी बांधलेल्या चौरस किंवा आयताकृती जोत्यात बसविले होते. टेकाडाच्या मध्यवर्ती भागात वर्तुळाकृती चैत्यगृहाचे अवशेष सापडले, ज्यातील स्तूप हा जवळ-जवळ पूर्णतः नष्ट झालेला आढळून आला. पूर्णतः भाजक्या विटांचा वापर केला गेलेला नसल्यामुळे या चैत्यगृहातील स्तूप टिकून राहू शकला नाही. अशा प्रकारच्या वर्तुळाकृती चैत्यगृहाचे अवशेष आंध्र प्रदेशातील शालिहुंडम, थोतलाकोंडा, बावीकोंडा इत्यादी प्राचीन बौद्ध स्थळांवर सापडले आहेत. तांबडी लेपयुक्त मृद्भांडी, तांबडी मृद्भांडी, काळी-आणि-तांबडी मृद्भांडी, काळी लेपयुक्त मृद्भांडी आदींचे अवशेष मिळाले आहेत. सातवाहन, महातलवार व इक्ष्वाकू या राजवंशाची नाणी या उत्खननात सापडली आहेत.

फणीगिरी येथील बौद्ध पुरावशेषांच्या उत्खननातून दक्षिण भारतातील प्रामुख्याने पूर्व दख्खन प्रदेशातील बौद्ध स्थापत्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. इ. स. पहिल्या-दुसर्‍या शतकापासून ते  इ.स. पाचव्या शतकापर्यंत साधारणतः तीनशे-चारशे वर्षे बौद्ध धम्माचे दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण केंद्र होते. सातवाहन राजवंशाच्या कारकिर्दीत प्रतिष्ठापित झालेले हे बौद्ध धम्मीय केंद्र इक्ष्वाकू राजवंशाच्या कारकिर्दीत बहरले.

[संकेत-शब्द: फणीगिरी, स्तूप, तोरण द्वार, विहार,मंडप, चैत्यगृह, ईक्ष्वाकू,सातवाहन,महातलवार]

संदर्भ :

  • Skilling, Peter, ‘New discoveries from South India: The life of the Buddha at Phanigiriʼ, Andhra Pradesh,  Arts Asiatiques, 63: 96-118, 2008.
  • Subrahmanyam, B.; Vijaya Kumar, J.; Rama Krishna Rao, G. V. & Kesava, K. S. B. Phanigiri: A Buddhist Site in Andhra Pradesh (An Interim Report 2002-2007), Hyderabad : Department of Archaeology and Museums, 2008.
  • छायासौजन्य : हेरिटेज तेलंगणा विभाग, तेलंगणा शासन.                                                                                                                                                                                       समीक्षक : प्रमोद जोगळेकर