पोर्ट रॉयल हे वेस्ट इंडीजमधील जमैका या छोट्या देशातील एक बंदर होते. सध्या हे समुद्रात बुडालेले पुरातत्त्वीय स्थळ जमैकाची राजधानी किंगस्टनपासून २१ किमी. अंतरावर आहे. या स्थळाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत झालेला आहे.

पोर्ट रॉयलमधील इमारतीचे अवशेष.

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपासून जमैका बेटावर स्पेनचा ताबा होता. सतराव्या शतकाच्या मध्याला हे बेट ब्रिटिश वसाहत बनले. या कालखंडात ‘प्रायव्हटियरʼ (Privateer) ही जहाजे व त्यांच्यावरचे चाचे कॅरेबियन भागात धुमाकूळ घालत असत. सर्व राष्ट्रे अशी खासगी मालकीची सशस्त्र जहाजे बाळगून असत आणि त्यांच्याकरवी शत्रूराष्ट्रांची जहाजे लुटत असत. चाच्यांमध्ये ‘किल डेव्हिलʼ नावाच्या जळजळीत रमसाठी पोर्ट रॉयल प्रसिद्ध होते.

सतराव्या शतकात पोर्ट रॉयल बंदर बेलगाम चाचेगिरीसाठी कुख्यात झाले होते. इतकेच नाही तर हेन्री मॉर्गन हा कुप्रसिद्ध इंग्लिश चाचा १६७५ ते १६८८ या काळात जमैकाचा लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नेमण्यात आला होता. पोर्ट रॉयलला ‘चाच्यांचा स्वर्गʼ आणि ‘पृथ्वीवरचे सर्वात बदमाष शहरʼ (Wickedest City on Earth) असे म्हणत असत.

पोर्ट रॉयलमधील पुरावशेषांचे उत्खनन.

सन १६५५ मध्ये ब्रिटिशांनी पोर्ट रॉयल बंदर बांधले. हे त्यांचे नव्या जगातील प्रमुख राजकीय आणि व्यापारी केंद्र बनले. येथून मायभूमी इंग्लंडशी कायदेशीर आणि दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींशी बेकायदा व्यापार चालत असे. पोर्ट रॉयल बांधल्यानंतर येथे अवघ्या सदतीस वर्षांनी ७ जून १६९२ रोजी सकाळी ७.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. त्यामुळे इमारती जागच्याजागी खचून गेल्या. पाठोपाठ आलेल्या अतिप्रचंड सुनामी लाटेमुळे जवळजवळ सगळे पोर्ट रॉयल शहर समुद्रात बुडले. त्या दिवशी काही तासांमध्ये देान हजार लोक मेले आणि शेकडो बेपत्ता झाले. या शहरात गुन्हेगारी, खूनखराबा, स्वैराचार व सर्व प्रकारच्या अनाचारांचा कहर झाल्याने किंवा या शहरात गुलामांच्या आत्यंतिक शोषणाचे पाप घडल्याने दैवी शक्तीनेच त्याचा नाश केला, असा या घटनेचा विविध प्रकारे अर्थ लावण्यात आला.

सन १९५१ मध्ये एका प्रचंड वादळामुळे पोर्ट रॉयलच्या ज्या काही इमारतींचे वरचे भाग पाण्याच्याबाहेर दिसत होते ते देखील पाण्यात बुडले. सध्या पोर्ट रॉयलचे अवशेष पाण्याखाली साधारणपणे १४ मी. खोलीवर बुडलेल्या अवस्थेत आहेत. या वादळानंतर अनेक हौशी आणि व्यावसायिक पाणबुडे पाण्यात जुन्या वस्तूंचा शोध घेत असत. अशाच एका एडविन लिंक नावाच्या माणसाने १९६९ मध्ये पाण्यातून एक खिशातील घड्याळ बाहेर काढले. सन १६८६ मध्ये तयार केलेले हे घड्याळ सकाळचे ११ वाजून ४२ मिनिटांनी बंद पडले होते.

जमैका नॅशनल हेरिटेज ट्रस्ट आणि अमेरिकेतील टेक्सस ए. अँड एम. विद्यापीठाने संयुक्तपणे १९८१ ते १९९१ या दरम्यान सागरी पुरातत्त्वीय उत्खनन केले. पोर्ट रॉयलच्या अनेक इमारती जागच्याजागी खचून खाली गेल्यामुळे त्यांच्या आत बऱ्याच गोष्टी अडकलेल्या अवस्थेत मिळाल्या. पोर्ट रॉयल उत्खननाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याखाली कमी ऑक्सिजनच्या परिस्थितीत असल्याने बहुसंख्य सेंद्रीय वस्तू नाश न होता टिकून राहिल्या आहेत. या उत्खननातून मिळालेल्या अशा असंख्य पुरावशेषांमुळे पोर्ट रॉयलच्या वैभवाच्या काळातील दैनंदिन समाजजीवनावर प्रकाश पडला. यामधील बहुतेक पुरावस्तू किंगस्टन येथील संग्रहालयांमध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. सन १९९९ मध्ये या स्थळाला जमैकाच्या संरक्षित राष्ट्रीय वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला आणि तेथे हौशी लोकांना काहीही शोधण्यास मनाई करण्यात आली.

संदर्भ :

  • Hamilton, D. L.  ‘A Decade of Excavations at Port Royal, Jamaicaʼ, Underwater Archaeology Proceedings from the Society for Historical Archaeology Conference, Richmond, Virginia, 1991, (Broadwater, J. D. Ed.), pp. 90-94, Richmond, Virginia: The Society for Historical Archaeology, 1991.
  • Hamilton, D. L.; Woodward, R. ‘A Sunken 17th-Century City: Port Royal, Jamaicaʼ, Archaeology, 37: 38-45, 1984.
  • Mulcahy, Matthew, ‘The Port Royal Earthquake and the World of Wonders in Seventeenth-Century Jamaicaʼ, Early American Studies, 6(2): 391-421, 2008.
  • https://whc.unesco.org/en/tentativelists/5430/

                                                                                                                                                                                          समीक्षक : शंतनू वैद्य