मुहंमद कुली कुत्बशाह : (१५६६–१६१२). एक श्रेष्ठ उर्दू कवी आणि गोवळकोंड्याच्या कुत्बशाहीतील चौथा सुलतान. शासनकाळ १५८० ते १६१२. दक्खिनी उर्दूमध्ये गझल लिहिणाऱ्या कवींमध्ये त्याचे स्थान फार महत्त्वपूर्ण आहे. पारंपरिक विषयांचा त्याग करून सणोत्सव, विविध खेळ, ऋतू, हत्ती, घोडे, प्रेयसी, महाल इ. नवनवीन विषयांवर काव्य करणाऱ्या कवींपैकी तो पहिला कवी होय. त्याच्या भावकविता फक्त आठ-दहा ओळींत पूर्ण होतात.

कल्पितचित्र

मुहंमद कुलीला वाङ्‌मयीन अभिरुची ही पित्याकढून वारसारूपाने लाभली. त्याचा अरबी-फार्सीचा व्यासंग सखोल होता तथापि तेलुगू आणि दक्खिनीविषयही त्याला अपार प्रेम होते. त्याने तेलुगूतही काही कविता लिहिल्या. दक्खिनी उर्दूत लिहिलेली त्याची पुष्कळशी गीते अत्यंत लोकप्रिय असून त्यांपैकी काही ‘लोकगीते’ ठरली आहेत.

मुहंमद कुली कुत्बशाह कवी तर होताच पण चोखंदळ रसिक, विद्याप्रेमी आणि गुणज्ञही होता. त्यानेच हैदराबाद शहर वसविले (१५८९). त्याने हैदराबादेत पुष्कळ सुंदर वास्तू उभारल्या. त्यांपैकी ‘चार मिनार’ प्रसिद्ध आहे. मुहंमद कुलीच्या राजवटीत राजा व प्रजा यांचे परस्परसंबंध चांगले होते. राजमहालापेक्षा सर्वसाधारण जनतेकडूनच त्याला कवितेची प्रेरणा मिळाली. म्हणूनच त्याच्या काव्यात व्यापक जनजीवनाचे चित्रण आढळते. भावनाप्रधान वृत्तीचा हा शाही कवी. तो सौंदर्याचा उपासक व संगीतप्रेमीही होता. त्याची भावकविता गझलरूपाने तसेच ‘नज्म’ म्हणजे भावकवितेच्या रूपानेही प्रसिद्ध आहे. त्याच्या अधिकांश गझला प्रेम व सौंदर्य या विषयावरील आहेत.

त्याच्या कवितेचा सु. १,८०० पानी एक बृहत् संग्रह कुलियात कुली कुत्बशाह या नावाने प्रकाशित झाला आहे. त्याला दक्खिनी उर्दूचा ‘हाफिज’ म्हणून गौरवाने संबोधण्यात येते. त्याच्या काव्यात भावनेची विविधता आणि व्यापकता दिसून येते. त्यात एकीकडे सूफी साधु-संतांचे रहस्यात्मक पारलौकिक प्रेमचित्रण आहे, तर दुसरीकडे इहलौकिक प्रेमाच्या सप्तरंगी सूक्ष्म छटा चित्रित केलेल्या आहेत.

 

संदर्भ :

  • blog.rekhta.org/ishq-naamah-banaam-quli-qutub-shah