हे खनिज लोखंडाचे सर्वांत महत्त्वाचे धातुक (कच्च्या रूपातील धातू) असून ब्लडस्टोन, तांबडे हेमॅटाइट, तांबडे लोहधातुक व समांतर षट्फलकीय लोहधातुक ही त्याची पर्यायी नावे आहेत. चूर्णरूप हेमॅटाइटच्या रक्तासारख्या रंगावरून त्याला रक्त अर्थाच्या ग्रीक शब्दावरून हेमॅटाइट हे नाव पडले आहे. त्याचे स्फटिकसमूह षट्कोणी-समांतर षट्फलकीय, षट्फलकीय विषम त्रिभुजफलकी, असून विभाजन तले जवळजवळ घनीय कोनांत असतात. हे गुच्छाकार ते मूत्रपिंडाकृती (म्हणून वृक्काकार धातुक) रूपांत आढळते व त्याची संरचना अरीय असते. हे तंतुरूप पुंज किंवा तांबड्या मातीच्या रूपांतही आढळते. तसेच पट्टित  धातुक व अभ्रकी, पर्णसम रूपांतही ते आढळतात. अनेक अग्निज खडकांत ते गौण खनिजाच्या रूपातही असते. मॅग्नेटाइटच्या अष्टफलकीय छद्मरूपातील हेमॅटाइटला मार्टाइट म्हणतात. कठिनता ५.५-६.५; विशिष्ट गुरुत्व ५.२६; चमक स्फटिकांची धातूसारखी व मातकट प्रकाराची मंद; रंग लालसर तपकिरी ते काळा, तांबडा मातकट प्रकार म्हणजे रेड ऑकर; कस फिकट ते गडद (इंडियन) तांबडा व तापविल्यावर काळा होतो. दुधी काचेप्रमाणे पारभासी. रासायनिक संघटन Fe2O3 (फेरिक ऑक्साइड, लोह ७०%). यात टिटॅनियम असू शकते. ते अगलनीय व क्षपणकारी, ज्योतीत तापविल्यास तीव्र चुंबकीय होते. हायड्रोक्लोरिक अम्लात सावकाशपणे विरघळते. कसामुळे त्याला वेगळे ओळखता येते.

सर्व भूशास्त्रीय कालखंडातील व तीनही प्रमुख खडकांत हेमॅटाइट व्यापकपणे विखुरलेले आढळते. त्यांचे क्वार्टझाइटातले पट्टित हेमॅटाइट धातुक (Banded hematite quartzite ore) हे सर्वांत प्राचीन खडकांच्या प्रकारांचे प्रतिनिधीत्व करतात. जमिनीच्या वरच्या भागात मिळणारे निसर्गातील लोखंडाचे सर्वांत विपुल व महत्त्वाचे प्राथमिक धातुक खनिज असल्याने सूक्ष्मकणांपासून ते प्रचंड राशींपर्यंतच्या रूपांत ते आढळते. एल्बा बेट, सेंट गॉटर्ड (स्वित्झर्लंड) व व्हीस्यूव्हिअस लाव्हा येथे त्याचे चांगले स्फटिक आढळले आहेत. अमेरिका, व्हेनेझुएला, ब्राझील, कॅनडा इ. अनेक देशांत त्याचे मोठे साठे आढळले आहेत.

भारतात पट्टित, पत्रित व अभ्रकी रूपांत, तसेच कोणाश्म, जांभा इ. खडकांत हेमॅटाइट जवळपास सर्वच ठिकाणी आढळते. छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश, केरळ, तमिळनाडू, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांत हेमॅटाइट सामान्यपणे आढळते. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली व रत्नागिरी जिल्ह्यांतही हेमॅटाइट आढळते. हेमॅटाइटचा मुख्य उपयोग लोखंड मिळविण्यासाठी होतो. शिवाय ते रंगद्रव्य, तांबडे व पिवळे ऑकर (कांव रंग व मुलतान माती/पिवडी) व पॉलिश करण्याचे चूर्ण म्हणूनही वापरतात.

संदर्भ :

  • https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=8912208

समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर