क्लिंटन, रिचर्ड डॉकिन्स : (२६ मार्च १९४१ ) रिचर्ड डॉकिन्स क्लिंटन यांचा जन्म आफ्रिकेत नैरोबी येथे झाला. आफ्रिकेत त्यांना त्यांच्या घराभोवतालीच वन्यजीवन जवळून पाहता आले आणि प्राण्यांचा अभ्यास करणे आवडू लागले. विशेषतः प्राणी निरीक्षणात निर्माण झालेली रिचर्ड यांची आवड आयुष्यभर टिकली. रिचर्ड आठ वर्षाचे असताना त्यांचे कुटुंब नैरोबीतून इंग्लंडला परतले.
रिचर्ड यांचे शालेय शिक्षण इंग्लंडमधील नॉर्थहॅम्पटनशायर येथील औंडल स्कूलमध्ये झाले. रिचर्डच्या आईवडलांना विज्ञानाची आवड होती. बाल रिचर्डचे प्रश्न ते ऐकून घेत आणि शक्यतो अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत.
रिचर्ड यांच्यावरील बालपणीचा धर्माचा प्रभाव डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताचा अभ्यास केल्यावर ओसरला.ऑक्सफर्ड विद्यापीठाशी संलग्न, बॅलिओल महाविद्यालयात रिचर्डनी प्रवेश घेऊन प्राणीशास्त्रात पदवी मिळवली. पुढे त्यांनी ऑक्सफर्डमध्येच पदव्युत्तर पदवी मिळवली. प्रसिद्ध प्राणीवर्तन शास्त्रज्ञ, निकोलास टिन्बरजेन, ज्यांना १९७३ मधील नोबेल पुरस्कार मिळाला ते त्यांचे पी.एच्.डी.चे मार्गदर्शक होते. रिचर्डचा पीएच्.डी. साठी प्रबंधाचा विषय प्राणीवर्तनाबद्दलचा होता. पाळलेल्या कोंबड्यांतील निवडक बल-अधिकता क्रम – ‘Selective pecking in the domestic Chick’ हे त्याचे शीर्षकहोते. ऑक्सफर्ड विद्यापीठात तो सादर केल्यावर त्यांना डॉक्टरेट मिळाली. पुढे अल्पकाळ त्यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून टिन्बरजेनना मदत केली. रिचर्डच्या प्राणी विषयक अभ्यासातून आनुवंशिकीय प्राणीवर्तन शास्त्र – जेनेटिक इथॉलॉजी अशी नवी ज्ञानशाखा उदयास आली. रिचर्डच्या कामावर ज्यांचा खूप प्रभाव पडला अशा तीन व्यक्ती – चार्ल्स डार्विन, निकोलास टिन्बरजेन आणि डब्ल्यु. डी. हॅमिल्टन – या आहेत.
पुढे बर्कलीतील कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांना अध्यापक पद मिळाले. बर्कलीच्या दोन-तीन वर्षांत अध्यापनाच्या जोडीला ते युद्धविरोधी निदर्शनांत आणि चळवळींतही सक्रिय होते. तीन वर्षांनी ते ऑक्सफर्डमध्ये परतले आणि प्रपाठकपदी रुजू झाले. त्यांचे जैविक उत्क्रांती सिद्धांतातील जनुकांचा संबंध स्पष्ट करणारे ‘द सेल्फिश जीन’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात नैसर्गिक निवड, व्यक्ती किंवा जातींच्या पातळीवर होत नसून जनुकांच्या पातळीवर होते असा विचार रिचर्डनी मांडला. जनुके जणू काही सजीवांची शरीरे वापरतात, वेगवेगळ्या जीवनपद्धती, धोरणे वापरून स्वतःला टिकवतात. कालांतराने सजीवांची शरीरे नष्ट होतात पण बहुधा त्यापूर्वी त्यातील जनुके (डीएनए) त्या सजीवांच्या अपत्यांत उतरलेली असतात.
मनुष्यासारख्या बुद्धिमान प्राण्यांची जनुके पुनरुत्पादनाने पुढील पिढीत जातातच. पण विविध माध्यमांतून जनुकबाह्य संक्रमण होते. ही जनुकबाह्य माहिती संक्रमण एककाची – मीम (meme) ची संकल्पना रिचर्डनी मांडली.
त्यांच्या ‘द एक्स्टेन्डेड फिनोटाईप’ या पुस्तकात जनुकसंचांच्या दृश्यप्रारूपाबद्दल (phenotype) माहिती दिली आहे. ‘द ब्लाइन्ड वॉचमेकर’ या त्यांच्या पुस्तकाला, रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरचा पुरस्कार मिळाला. त्यांचे भाषाप्रभुत्व, सखोल विषयज्ञान आणि ते सोप्या आकर्षक पद्धतीने सामान्य वाचकांपर्यंत पोचवण्याची हातोटी यांचे कौतुक रिचर्डना शेक्सपिअर पारितोषिक देऊन हॅम्बर्गमधील आल्फ्रेड टोप्फर फाउंडेशनने केले. ‘रिव्हर आऊट ऑफ ईडन’, तसेच ‘द इव्हॉल्युशन ऑफ लाईफ’ या त्यांच्या पुस्तकांत सीडीद्वारे वाचक काही आंतरक्रिया करून प्रायोगिक कृतीने उत्क्रांती अधिक चांगली समजून घेऊ शकतो. ‘क्लाइम्बिंग माउंट इम्प्रॉबेबल’ या त्यांच्या पुस्तकांत डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतातील डोळ्यासारख्या जटिल इंद्रयाचा क्रमशः विकास कसा झाला याचे विवेचन आहे. त्यांची ‘अनविव्हिंग द रेनबो’ आणि ‘अ डेव्हिल्स चॅपलेन’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली.
रिचर्डच्या ‘द ॲन्सेस्टर्स टेल’ या पुस्तकात उत्क्रांतीक्रमात माकड, कपि, आदिम मानव या जातींपासून आधुनिक मानव हळूहळू विकसित कसा झाला याचा मागोवा घेतला आहे. कोणा दैवी शक्तींनी हेतुपूर्वक, चमत्काराने एका क्षणात मानव निर्माण केला नाही हे स्पष्ट केले आहे.
रिचर्डनी ‘द गॉड डिल्युजन’ या पुस्तकातून विज्ञान, धर्माऐवजी डोळसपणा आपल्या भोवतालचे जग समजून घ्यायला कसे उपयोगी आहे हे सांगितले. या पुस्तकावर जगभर चर्चा झाल्या.
निरीश्वरवादाच्या प्रयत्नांना स्थायी रूप देण्यासाठी रिचर्डनी रिचर्ड डॉकिन्स फाउंडेशन फॉर रीझन (विवेक) अँड सायन्स ही संस्था शिक्षण आणि समाज प्रबोधनासाठी स्थापन केली. ते या संस्थेचे पहिले संचालकही झाले.
त्यांनी धर्मामुळे जगात निर्माण झालेल्या समस्या आणि अंधश्रद्धांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘द रूट ऑफ ऑल इव्हिल’ आणि ‘द एनिमीज ऑफ रीझन’ म्हणजे विवेकाचे शत्रू, असे दोन माहितीपट बनवले.त्यांनी ‘द ऑक्सफर्ड बुक ऑफ मॉडर्न सायन्स रायटिंग’ हे पुस्तक संपादित केले. त्याच वर्षी डार्विनच्या कामाचे महत्व दाखवणारा ‘द जीनियस ऑफ चार्ल्स डार्विन’ हा माहितीपट रिचर्डनी बनवला.
‘द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ: द एव्हिडन्स फॉर इव्हॉल्युशन’; ‘द मॅजिक ऑफ रिॲलिट’; ‘ॲन ॲपिटाईट फॉर वंडर : द मेकिंग ऑफ अ सायंटिस्ट’; ‘ब्रीफ कॅन्डल इन द डार्क’; ‘सायन्स इन द सोल: सिलेक्टेड रायटिंग्स ऑफ अ रॅशनॅलिस्ट’ आणि ‘आउटग्रोइंग गॉड : ए बिगिनर्स गाईड’ ही रिचर्ड यांची एकापाठोपाठ एक अशी अकरा पुस्तके प्रकाशित झाली.
रिचर्ड यांची खरी विद्वत्ता आणि भाषा कौशल्याची चुणूक त्यांनी स्वतःची मुलगी दहा वर्षाची झाली तेव्हा तिला लिहिलेल्या जाहीर पत्रात दिसते. खाली संदर्भात दिलेल्या पहिल्या क्रमांकाच्या संकेत स्थळावर त्यांनी सोप्या शब्दात मुलांना वैज्ञानिक पद्धतीचा परिचय करून दिला आहे.
रिचर्ड यांना सामान्य लोकांना जीवांची उत्क्रांती समजाऊन दिल्याबद्दल झेड. एस. एल. (Zoological Society of London) रौप्य पदक मिळाले. याशिवाय त्यांना मायकेल फॅरॅडे पारितोषिक आणि फिन्ले इनॉव्हेशन ॲवार्ड मिळाले. रिचर्डना चार्ल्स सायमनी प्राध्यापक पद मिळाले. चार्ल्स सायमनी हे मायक्रोसॉफ्टमधील उच्च पदाधिकारी, एका संगणक कंपनीचे मालक आणि दोनदा अंतराळ प्रवास केलेले साहसवीर होते. त्यांनी दिलेल्या निधीतून सायमनी प्राध्यापकपद निर्माण झाले होते. सायमनी रिचर्डच्या कामाबद्दल आदर बाळगून होते. त्यांनी रिचर्डना पहिले सायमनी प्राध्यापकपद दिले गेले पाहिजे अशी अट घालूनच निधी देऊ केला होता. हे प्राध्यापकपद जनसामान्यांपर्यंत यशस्वीपणे विज्ञान पोचविणाऱ्यांसाठी राखलेले आहे. रिचर्डनी सायमनी प्राध्यापकपद सलग तेरा वर्षे सांभाळले. या जबाबदारीचा भाग म्हणून त्यांनी अनेक दृकश्राव्य कार्यक्रम निर्माण केले. ‘ब्रेक द सायन्स बॅरीयर’ या माहितीपूर्ण लघुपट मालिकेसाठी रिचर्डनी अग्रगण्य शास्त्रज्ञांच्या मुलाखती घेतल्या.
रिचर्डना अमेरिकेन ह्युमॅनिस्ट असोसिएशनचे आणि ह्युमॅनिस्ट ऑफ द इयर ॲवार्ड देण्यात आले. सेंट अँड्र्यूज विद्यापीठाने आणि ऑस्ट्रेलियन विद्यापीठ, कॅनबेरा यांनी त्यांना मानद डॉक्टरेट दिली. त्यांना इंटरनॅशनल कॉस्मॉस पारितोषिक, रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरचे सदस्यत्व, रॉयल सोसायटीचे सदस्यत्व (एफआरएस), इटालीचे प्रेसिडेंट्स मेडल, रॉयल फिलॉसॉफिकल सोसायटी, ग्लासगो, स्कॉटलंड तर्फे केल्व्हिन मेडल, गॅलॅक्सी ब्रिटिश बुक ॲवार्डस तर्फे ऑथर ऑफ द इयर, निरेनबर्ग पारितोषिक इत्यादी सन्मान मिळाले.
संदर्भ :
- https://www.rationalresponders.com/richard_dawkins_letter_to_his_10_year_old_daughter_how_to_warn_your_child_about_this_irrational_world
- https://en.wikipedia.org/wiki/Richard_Dawkins
- https://www.ted.com/speakers/richard_dawkins
- https://www.ted.com/talks/richard_dawkins_militant_atheism
- https://royalsociety.org/people/richard-dawkins-11316/
समीक्षक : मोहन मद्वाण्णा