कल्लीयाणपूर, गोपीनाथ : (२५ एप्रिल १९२५ – १९ फेब्रुवारी २०१५)कल्लीयाणपूर यांचा जन्म मंगलोर येथे झाला. त्यांनी मद्रास विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. अमेरिकेतली चॅपेल हिल येथील उत्तर कॅरोलीना विद्यापीठात हर्बर्ट रोबिन्स यांच्या मार्गदर्शनाखाली कल्लीयाणपूर यांना याद्रुच्छिक प्रक्रम या विषयावरील प्रबंधासाठी पीएच्.डी. मिळाली.
नंतर बर्कले येथील कॅरोलीना विद्यापीठात व्याख्याता म्हणून त्यांनी काम केले. ते प्रिन्स्टन प्रगत शिक्षण संस्थेचे सभासद होते. कल्लीयाणपूर एक वर्ष भारतीय संख्याशास्त्र संस्था, कोलकाता येथे कार्यरत होते. कल्लीयाणपूर यांनी मिशिगन राज्य विद्यापीठात पाच वर्षे विविध पदांवर काम केले. मधेच दोन वर्षे ते इंडियाना विद्यापीठात कार्यरत होते. १९७६मध्ये कल्लीयाणपूर हे भारतीय संख्याशास्त्र संस्थेचे संचालक झाले. त्यांच्या कार्यकाळात संस्थेचे नवीन केंद्र कर्नाटकातील बंगळुरू येथे सुरू झाले.
कल्लीयाणपूर यांचे संशोधन प्रामुख्याने याद्रुच्छिक प्रक्रम (Stochastic Process) क्षेत्रात आहे. त्यांच्या नावाने संबोधले जाणारे Kallianpur–Robbins नियम हे दोन मितीमधील ब्राउनिअन हालचालीचे (Brownian motion) मागोवा घेतात. त्याशिवाय Kallianpur–Striebel सूत्र हे त्यांचे अरेषीय गाळणी सिद्धांतात (Nonlinear filtration control)कळीचे योगदान मानले जाते. Fujisaki–Kallianpur–Kunita (FKK) समीकरणे हीदेखील त्यांच्या संशोधनाची आणखी एक लक्षणीय उत्पत्ति आहे. संख्याशास्त्रातील अनुमान सिद्धांतातील फिशर सुसंगती (Fisher consistency) या संकल्पनेबाबत कल्लीयाणपूर यांनी वेगळा दृष्टीकोन विकसित केला. तो आता मान्य झाला आहे. त्यांनी याद्रुच्छिक प्रक्रमावर आधारित वातावरणातील प्रदूषण आणि मेंदूतील न्युरॉन्स यांच्या अभ्यासासाठी प्रारूपेही विकसित केली.
१९७९-२००१च्या कालावधीत त्यांची चॅपेल हिल येथील उत्तर कॅरोलीना विद्यापीठात प्रतिष्ठित माजी विद्यार्थी (Alumni) प्राध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली. तिथे त्यांनी Center for Stochastic Processes ची स्थापना केली आणि ते केंद्र या विषयाच्या विकासासाठी कल्लीयाणपूर यांच्या प्रयत्नांमुळे भरभराटीस आले.निवृत्तीनंतरही त्यांचे संशोधनाचे काम चालूच होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २२ विद्यार्थ्यांना पीएच्.डी. मिळाली.
कल्लीयाणपूर यांना मॉस्को राज्य विद्यापीठात अभ्यागत कोल्मोगोरोव्ह प्राध्यापक म्हणून आमंत्रित केले गेले. भारतीय विज्ञान अकादमीचे (INSA) तसेच गणितीय संख्याशास्त्र संस्था (IMS) संस्थेचे ते अधिछात्र होते. भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र संस्थेचे सभासद होते. ते अनेक आंतरराष्ट्रीय समित्यांचे आणि ख्यातनाम जर्नल्सच्या संपादक मंडळांचे सदस्य होते.
कल्लीयाणपूर यांचे अनेक लेख जागतिक कीर्तीच्या जर्नल्समध्ये प्रसिध्द झाले. त्याशिवाय त्यांनी लिहिलेली काही पुस्तके अशी आहेत : Stochastic Methods in Biology, White Noise Theory of Prediction, Filtering and Smoothing, Introduction to Option Pricing Theory आणि Stochastic Analysis and Diffusion Processes.
कल्लीयाणपूर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय संख्याशास्त्र संस्थेने याद्रुच्छिक प्रक्रम या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. त्यात सादर केलेल्या शोधलेखांचे त्यांच्यासन्मानार्थ Stochastic in Finite and Infinite Dimensions हे पुस्तक प्रकाशित केले गेले.
संदर्भ :
- stat.unc.edu/faculty/kallianpur.html
- https://bulletin.imstat.org/2015/08/obituary-gopinath-kallianpur-1925-2015/
- https://www.genealogy.math.ndsu.nodak.edu/id.php?id=12962
समीक्षक : विवेक पाटकर