मावळते उद्योग ही संज्ञा दोन पद्धतींनी परिभाषित केलेली आढळते. एक, जी जुनी उद्योग अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहेत; परंतु या उद्योगांमधील गुंतवणुकीच्या गतीचा आलेख मंदावत आहे, त्या उद्योगांना मावळते उद्योग असे मेहणतात. अशा उद्योगांमधील रोजगाराच्या निर्मितीची क्षमता आणि नफा दिवसेंदिवस खालावत असते आणि त्याच्या तुलनेने या उद्योगांचा पर्यावरणीय खर्च किंवा पर्यावरणीय ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत असतो.
दोन, मावळते उद्योग हे असे उद्योग आहेत, जे जुनी उपकरणे आणि जुन्या उत्पादन पद्धतींचा वापर करतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि नवीन अत्यंत कुशल अशा उत्पादन पद्धतींमुळे जुनी उपकरणे आणि पद्धतींचा वापर अप्रचलित होऊन असे अनेक उद्योग कमी यशस्वी होत आहेत. अशा उद्योग-व्यवसायांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, हे खूप खर्चिक काम असून सरकारचा कर्जाचा बोजा वाढविणारे असू शकते.
नवीन आणि जुन्या तंत्रज्ञानातील फरकामुळे काही उद्योग डबघाईला येतात. उदा., कोडॅक कंपनीद्वारा रोलचा वापर होणाऱ्या कॅमेराचे उत्पादन घेतले जात; मात्र डिजिटल कॅमेराच्या आगमनानंतर जागतिक बाजारपेठेत कोडॅक कॅमेराची विक्री मंद होण्यास सुरुवात झाली आणि काही वर्षातच रोल वापरणारे कॅमेरे बाजारपेठेतून अदृश्य झाले.
मावळते उद्योगांना बरेचदा घटत जाणारे उद्योग म्हणूनही संबोधतात. या घटत जाणाऱ्या उद्योगांचे अर्थव्यवस्थेवर कोणत्याही प्रकारचे नकारात्मक परिणाम होऊ नयेत (उदा., रोजगार कमी होणे, व्यापारात घट होणे इत्यादी.) म्हणून औद्योगिक धोरणातून काही समर्थनाची आवश्यकता असू शकते. ब्रिटनमध्ये १९५० च्या दशकात जहाज निर्मिती, १९७० च्या दशकात कार निर्मिती, १९९० च्या दशकात स्टीलची निर्मिती यांसारख्या प्रत्येक पिढीने स्वत:च्या घटत जाणाऱ्या उद्योगांना तिलांजली दिली. चीन, व्हिएटनाम, बांगलादेश इत्यादी आशियाई देशांच्या कठोर प्रतिस्पर्धांमुळे २०१० पासून थायलंडमध्ये काही मावळत्या उद्योगांमध्ये वस्त्र आणि संबंधित उद्योगांचा समावेश आहे. उदा., विणकाम, डाईंग, इत्यादी.
भारतातील जूट उद्योगाला पुनरुज्जीवन देण्यासाठी कोणत्या प्रकारची तांत्रिक मदत देता येईल, यासंदर्भात २०१४ मध्ये अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये भांडवली वस्तुसाठी अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल अनुकूल आहे; मात्र जूटसारख्या घटत जाणाऱ्या उद्योगाला जीवनदान देणे कठीण झाल्याचे दिसून येते, असे निदर्शनात आले आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत घटत जाणाऱ्या उद्योगांना संरक्षण देण्यासाठी अधिक कुशल आणि सुसूत्रता असणारी औद्योगिक धोरणे फायदेशीर ठरू शकतात. यामध्ये आयातीवर मर्यादा आणण्याचा किंवा निर्यातीला चालना देण्याचा विचार केला जातो. व्यापारातील अडथळ्यांचे मुख्य कारण जरी मुक्त व्यापार किंवा खुला व्यापार याचा अभाव असला, तरी संरक्षणवाद अजूनही मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. प्रामुख्याने विकसनशील आणि अविकसित देशांना हा संरक्षणवाद त्यांच्याकडील उद्योगांसाठी उपयोगी पडतो. त्यामुळे संरक्षण मिळणारे हे विकसनशील आणि अविकसित देशांतील उद्योग बरेचदा प्रगत देशांतील घटत जाणारे उद्योग असतात. म्हणजेच, प्रगत देशांतील मावळते उद्योग/घटत जाणारे उद्योग हे विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये असणाऱ्या तंत्रज्ञानातील दरीमुळे त्याठिकाणी स्थिरस्थावर होण्यासाठी स्पर्धा करताना दिसून येत आहेत. अनुकरण विलंब कल्पनेमध्ये (इमिटेशन लॅग हायपोथेसीस) तंत्रज्ञानातील अंतरचा संदर्भ आढळतो.
ठराविक उत्पादन पद्धतींमुळे हवामानातील होणाऱ्या प्रतिकूल बदलांसाठी संपूर्ण जगभरातील पर्यावरणाला अपायकारक अशा उद्योगांवर ‘हरित तंत्रज्ञानाचा’ वापर करण्यासाठी दबाव वाढत आहे. या कारणानेसुद्धा येत्या काही दशकांत घटत जाणाऱ्या उद्योगांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या परिस्थितीत कार उत्पादन उद्योगांकडून कारची ‘तपकिरी उद्योगातून हरित उद्योगात’ (ब्राऊन इंडस्ट्री टू ग्रीन इंडस्ट्री) रूपांतरीत करण्याची स्पर्धा मोठ्या प्रमाणात यासाठीच सुरू आहे.
समीक्षक : सुहास सहस्त्रबुद्धे