विकसनशील देशांच्या संदर्भात विशेषत्वाने वापरली जाणारी एक अर्थशास्त्रीय संकल्पना. भांडवल उत्पादन गुणोत्तर मुख्यत्वे दोन प्रकारचे आहेत. एक सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर (ACOR) आणि दुसरे सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर (ICOR). यांपैकी सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर हे एकूण भांडवली गुंतवणुकीला राष्ट्रीय उत्पन्न किंवा उत्पादन याच्या प्रत्येक एककाने भागिले असता प्राप्त करता येते. उदा., भांडवली गुंतवणूक K व वार्षिक एकूण उत्पन्न किंवा उत्पादन Y. सरासरी भांडवली उत्पादन गुणोत्तर = K ¸ Y असेल; परंतु सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर हे भांडवली गुंतवणुकीतील वृद्धी आणि त्यामुळे उत्पादनातील वार्षिक वृद्धी यांचा सहसंबंध दर्शविते. हे गुणोत्तर म्हणजे उत्पादनाचे एक एकक (वन युनीट) वाढविण्यासाठी आवश्यक असणारी भांडवली गुंतवणूक दर्शविते. हे गुणोत्तर औद्योगिक आस्थापनेची किंवा देशाच्या आर्थिक एककाची कार्यक्षमता मोजण्यासाठी वापरले जाते. जर सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर कमी असेल, तर आस्थापना अधिक कार्यक्षम आहे असे म्हटले जाते. सीमांत उत्पादन पुढील सूत्राच्या आधारे काढता येते.
सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर = वार्षिक गुंतवणूक ÷ घरेलू उत्पादनाची वार्षिक वृद्धी (जीडीपी)
सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर हे विकसनशील देशात जास्त प्रमाणात असते; कारण तेथील भांडवली वस्तू उद्योगांची सापेक्ष अकार्यक्षमता होय. भांडवली वस्तू उत्पादनासाठी व या वस्तू उद्योगांची सापेक्ष कार्यक्षमता वाढविण्यासाठी तांत्रिक व वैज्ञानिक ज्ञान, कौशल्य आणि दीर्घ परंपरा यांची आवश्यकता असते.
स्ट्रिटेन्सच्या अभ्यासात एकूण ९ विकसनशील देशांची स्पष्ट आणि सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तराची मूल्यात्मक मांडणी केली आहे. त्यामध्ये प्रत्येक देशातील अपेक्षित व प्रत्यक्ष सीमांत भांडवली गुणोत्तरामध्ये मोठा फरक होता.
भारताच्या संदर्भात १९५१ ते १९५६ या कालावधीत अपेक्षित सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर ३.०० होते, तर प्रत्यक्ष सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर फक्त १.८३ होते. १९५६ ते १९६१ या कालावधीत हेच अपेक्षित व प्रत्यक्ष सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर अनुक्रमे २.३१ आणि ३.१२ होते. भारताच्या संदर्भात स्ट्रिटेन म्हणतात की, हे गुणोत्तर काढताना सुप्तावस्था (Gestation period) दुर्लक्षित असल्याचे दिसून येते. स्वातंत्र्योत्तर भारतातील प्रत्यक्ष सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तराने तांत्रिक व वैज्ञानिक ज्ञान, कौशल्य आणि दीर्घ परंपरा यांचा भारतात अभाव असल्याने भांडवली गुंतवणूक आणि त्याचा अधिक कार्यक्षमतेने वापर होणे आवश्यक असल्याचे दिसून येते.
संदर्भ :
- Puri,V. K.; Misra, S. K., Economics of Development and planning, Mumbai, 2001.
समीक्षक : श्रीराम जोशी