संगीतरत्नाकर ह्या महत्त्वाच्या संगीतविषयक आधारभूत संस्कृत ग्रंथाचा प्रसिद्ध अनुवाद. याला श्री राधागोविंद संगीत सार असेही म्हणतात. जयपूरचे महाराजा सवाई प्रताप सिंह (राज्यकाल १७७८ – १८०४) हे कलांचे आश्रयदाते राजे म्हणून विख्यात होते. हवामहलची निर्मिती, ब्रजभाषेतील काव्यास दिलेले उत्तेजन, राजस्थानी लघुचित्रशैलीला त्यांनी दिलेला उदार आश्रय व चालना, तसेच स्वत: ‘ब्रजनिधी’ ह्या मुद्रेने केलेल्या काव्यरचना ह्यांवरून त्यांचे कलासक्त व्यक्तित्त्व लक्षात येते. ते संगीताचे मर्मज्ञ आश्रयदाते होते आणि त्यांच्या गुणिजनखान्यात अनेक कलाकार, विद्वान संगीतकार होते. कलावंतांच्या प्रस्तुतीचा आस्वाद तर ते घेतच, शिवाय शास्त्रचर्चेतही ते सहभागी होत. चांदखाँ तथा दलखाँ ह्या उस्तादांकडे ते संगीताचे मार्गदर्शनही घेत असत. जुने शास्त्रग्रंथ आणि सद्यस्थितीतील कलाविष्कार यांत तफावत आहे, असे आढळल्याने त्यांनी संगीतरत्नाकर ह्या संस्कृत ग्रंथाचा सर्वांस आकलन-सुलभ व्हावे असा ब्रज भाषेतील अनुवाद करण्याची आज्ञा दरबारातील विद्वान संगीतकारांस केली. त्यानुसार श्री राधागोविंद संगीत सार अथवा संगीत सार ह्या ग्रंथाची निर्मिती विद्वत्परिषदेने केली. कृष्णभक्त असल्याने सवाई प्रताप सिंहांनी ‘राधागोविंद’ ह्या आपल्या आराध्य दैवताचे नाव ह्या ग्रंथनामात गुंफले आहे.
शार्ङ्गदेवांच्या संगीतरत्नाकर (तेरावे शतक) ह्या संस्कृत ग्रंथाच्या नमुन्यावरच किंबहुना त्यातील श्लोक, अध्याय रचना यांचाच आधार घेऊन संगीत सार या ग्रंथाची निर्मिती झाली. हा ग्रंथ ब्रजभाषेत असून दोह्यांच्या स्वरूपात, पद्यरूपाने यात विचार मांडला आहे. संगीतरत्नाकरप्रमाणेच ह्याही ग्रंथात सात विभाग आहेत; मात्र त्यांची रचना निराळी असून अध्यायांचा क्रम पुढीलप्रमाणे आहे. – (१) स्वराध्याय, (२) वाद्याध्याय, (३) नृत्याध्याय, (४) प्रकीर्णाध्याय, (५) प्रबंधाध्याय, (६) तालाध्याय, व (७) रागाध्याय.
संगीत सार ह्या ग्रंथाचे एक हस्तलिखित किशनगढ संस्थानच्या राजसंग्रहात होते. ‘पूना गायन समाज’ ह्या संस्थेचे संस्थापक-सचिव बळवंतराव सहस्रबुद्धे (१८५१-१९१४) यांनी जयपूरचे तत्कालीन महाराज माधोसिंग यांच्या मध्यस्थीतून हे हस्तलिखित प्राप्त केले आणि १९१० ते १९१२ या केवळ दोन वर्षांच्या कालावधीत सात भागांत हा ग्रंथ छापून ‘पूना गायन समाज’तर्फे प्रकाशित केला.
हा ग्रंथ जरीसंगीतरत्नाकराचा मुक्त अनुवाद असला, तरी अठराव्या शतकातील बदललेल्या संगीतानुसार राग, ताल, वाद्ये, गीतप्रकार यांचा उल्लेख होत असल्याने हा ग्रंथ तत्कालीन राहतो. ह्या ग्रंथात सुमारे ३०० रागांचे विवेचन आहे. प्राचीन व मध्ययुगीन ग्रंथांत शुद्ध स्वरसप्तकाचा निर्देश आजच्या काफी, खमाज, भैरवी अशा थाटांशी मिळताजुळता आहे. शुद्ध स्वरसप्तकाच्या संकल्पनेत अनेक स्थित्यंतरे झाली, याचेच हे प्रतिबिंब आहे. मात्र अर्वाचीन संगीतात सर्वमान्य असलेल्या बिलावल थाटाचा उल्लेख ह्या ग्रंथात शुद्ध सप्तक म्हणून केला आहे. ह्याद्वारे हे लक्षात येते की, सवाई प्रताप सिंह यांच्या काळात झालेले सांगीतिक स्थित्यंतर हे आजच्या संगीताशी साधर्म्य राखणारे आहे. संगीतरत्नाकराच्या काळाशी तुलना करता अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदुस्थानी संगीत हे संकल्पना व प्रात्यक्षिक अशा दोन्ही पातळींवर कसे होते. याचे दर्शन संगीत सार या ग्रंथाद्वारे होते आणि म्हणून हा ग्रंथ भारतीय संगीतेतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
संदर्भ :
- जयदेव सिंह, ठाकूर, इंडियन म्युझिक, संगीत रिसर्च अकादमी, कोलकाता, १९९५.
- सहस्रबुद्धे, बळवंत त्र्यंबक, संगीत सार, पूना गायन समाज, पुणे, १९१०.