जे. क्रेग व्हेन्टर इन्स्टिट्यूट : ( स्थापना – २००६ ) जे. क्रेग व्हेन्टर इन्स्टिट्यूट जनुकविज्ञानातील एक अग्रगण्य संशोधनसंस्था आहे. जॉन क्रेग व्हेन्टर ($-John Craig Venter, १९४६-) या अमेरिकन जैवतंत्रज्ञ व उद्योजक यांनी २००६ मध्ये या संस्थेची स्थापना केली. अमेरिकेतील मेरीलँडच्या रॉकव्हिल आणि कॅलिफोर्नियाच्या ला होया या दोन शहरात या संस्थेच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत. २५०पेक्षा अधिक वैज्ञानिक जे.क्रेग व्हेन्टर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. द सेंटर फॉर अड्व्हान्समेंट ऑफ जिनोमिकस, द इन्स्टिट्यूट फॉर जिनोमिक रिसर्च (TIGR), द इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल एनर्जी अल्टरनेटिव्हस, आणि द जे. क्रेग व्हेन्टर फाऊंडेशन जॉईंट टेक्नॉलॉजी सेंटर या चार संस्थांच्या विलीनीकरणातून या संस्थेची निर्मिती झाली.
जनुकविज्ञानाच्या विविध शाखांमधील संशोधन या संस्थेमध्ये सातत्याने चालू आहे. मानवी जनुकवैद्यक अर्थात जनुकांचा विकारांच्या उपचारावर जनुकांचा उपयोग, सांसर्गिक रोगांचा अभ्यास, वनस्पती व सूक्ष्मजीवांच्या जिनोमचे विश्लेषण, पर्यावरणीय जनुकविज्ञान, संश्लेषी जीवविज्ञान आणि सजीवांचा शाश्वत ऊर्जेचे स्रोत म्हणून अभ्यास हे या संस्थेचे प्रमुख उद्देश आहेत. मानव आणि जीवाणू किंवा विषाणू यांच्या जिनोमचे त्वरित क्रमनिर्धारण (High-throughput genomic sequencing) हा सुरुवातीपासून या संस्थेमधील संशोधनाचा मध्यवर्ती भाग राहिलेला आहे.
आधुनिक जनुकविज्ञानातील शोधांचा उपयोग वैद्यकीय प्रगतीसाठी व्हावा आणि सामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचावा, या ध्येयाने या संस्थेमध्ये नवनवीन प्रकल्प राबवले जातात. रोगकारक घटक आणि जनुकांमधील क्रिया-प्रतिक्रियांच्या आधारे व्यक्तिगत औषधोपचार करता यावेत या हेतूने विकारांच्या जनुकांवर येथे प्रयोग केले जातात.
औषधांना दाद न देणाऱ्या (Multi-drug resistant organisms-MRDO) जीवाणूंची संख्या वाढत आहे. उदा., ‘क्लेबशिएला न्यूमोनिए’ (Klebsiella pneumoniae), ‘एंटेरोबॅक्टर’ (Enterobacter), ‘ई. कोलाय’ (E. coli) आणि ‘स्टॅफिलोकोकस ऑरियस’ (Staphylococcus aureus) या जीवाणूंचा अभ्यास जे. क्रेग व्हेन्टर इन्स्टिट्यूटमधील संशोधक सातत्याने करीत आहेत. जीवांणूतील प्रतिरोध निर्मितीच्या जनुकाबद्दल महत्त्वाची माहिती संस्थेमध्ये मिळाली आहे. ‘टॉक्सोप्लास्मा’ आणि ‘प्लास्मोडियम’ हे आदिजीव व विविध कवकजन्य आजारांचासुद्धा अभ्यास येथे केला जातो. संसर्ग पद्धती आणि मानवी प्रतिक्षमता यंत्रणा या आजारांना कसे तोंड देते याचा शोध संशोधक घेत आहेत. रोगनिदानाच्या अत्याधुनिक आणि जलद पद्धती विकसित करणे ही या प्रकल्पांमागील प्रेरणा आहे. मानवी शरीरामधील सूक्ष्मजीवांची परिपूर्ण सूची (Human Microbiome) या संस्थेतील संशोधकांनी प्रसिद्ध केली. हा महत्वाकांक्षी प्रकल्प वैद्यकीय संशोधनासाठी दिशादर्शक ठरला आहे.
संश्लेषी जीवविज्ञान (Synthetic biology) काही बहुमूल्य शोधांचे श्रेय जे. क्रेग व्हेन्टर इन्स्टिट्यूटला दिले जाते. जे. क्रेग व्हेन्टर इन्स्टिट्यूट आणि सिन्थेटिक जिनॉमिकस (Synthetic Genomics, Inc.-SGI) यांच्या संयुक्त प्रयत्नाने २०१० मध्ये पहिल्या मानवनिर्मित जीवाणू पेशीची निर्मिती केली गेली. या पेशीला ‘मायकोप्लाझ्मा मायकॉयड्स JCVI-syn1.0’ (Mycoplasma mycoides JCVI-syn1.0) असे नाव दिले गेले. २०१६ मध्ये संशोधकांच्या याच गटाने या पेशीची अधिक प्रगत आवृत्ती बनवण्यात यश मिळवले. केवळ ५३१,००० बेस जोड्या व ४७३ जनुक असलेल्या या पेशीची निर्मिती हा संश्लेषी जीवविज्ञानामधील मैलाचा दगड आहे. २०१३मध्ये मानवी इन्फ्लुएंझावरील संपूर्णतः मानवनिर्मित लस शोधण्यात संस्थेला यश मिळाले.
वाढत्या लोकसंख्येमुळे होणारी पर्यावरणाची हानी हे आज आपल्यापुढील मोठे आव्हान आहे. रासायनिक खते आणि प्लास्टिक सूक्ष्मकण यांमुळे जैविक परिसंस्थांवर होणारे दुष्परिणाम यांवर जे क्रेग व्हेन्टर इन्स्टिट्यूट मध्ये विविधांगी संशोधन केले जाते. २००८ मध्ये संस्थेमधील संशोधकांनी, सॉर्सरर -II ग्लोबल ओशन एक्सपीडिशन (Sorcerer II Global Ocean Expedition) अर्थात GOS हा प्रकल्प हाती घेतला. जगभरातील महासागर आणि सागरांमधील जीवाणूंचे नमूने गोळा करून त्यांचे विश्लेषण केले. यातून आतापर्यंत अज्ञात असलेल्या जीवाणूतील ६कोटी नवीन जनुकांचा शोध लागला. या सागरी मोहिमांमधून मिळणारी माहिती सागरी प्रदूषण रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे वैज्ञानिकांचे मत आहे. जीवाणूंच्या सहाय्याने शाश्वत ऊर्जास्त्रोत विकसित करणे आणि अधिकाधिक कार्यक्षम जैविक इंधनांच्या निर्मितीचे प्रयोग या संस्थेत केले जात आहेत.
गेल्या दोन दशकापासून जे. क्रेग व्हेन्टर इन्स्टिट्यूट जनुकविज्ञानाच्या कक्षा रुंदावणारे संशोधन कार्य करीत आहे.
संदर्भ :
समीक्षक : मोहन मद्वाण्णा