भारताच्या गुजरात राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आणि पूर्वीच्या छोटा उदेपूर संस्थानची राजधानी. लोकसंख्या २५,७८७ (२०११). हे मध्य प्रदेश राज्याच्या सरहद्दीजवळ, ओरस (नर्मदेची उपनदी) नदीच्या काठावर वसले आहे. वडोदरा (बडोदे) शहरापासून पूर्वेस सुमारे १०० किमी. अंतरावर, वडोदरा – इंदूर रस्त्यावर हे नगर आहे. तेराव्या शतकात मुसलमानी आक्रमकांमुळे काही राजपूत घराणी गुजरातमध्ये आली; त्यांतील एक चांपानेरला आले. पंधराव्या शतकात महमूद बेगडा याने चांपानेरचे राज्य नष्ट केले. तेथील राजपूत चौहान राजांनी बारिया आणि छोटा उदेपूर ही राज्ये स्थापन केली. छोटा उदेपूरच्या चौहानांना महारावळ म्हणत. ते पुढे बडोद्याच्या गायकवाडांचे मांडलिक बनले. छोटा उदेपूर व राजपीपला या डोंगररांगांनी बनलेला प्रदेश आणि आदिवासी लोकांची वस्ती यांमुळे छोटा उदेपूरची फारशी वाढ झाली नाही. २६ जानेवारी २०१३ रोजी वडोदरा जिल्ह्याची विभागणी करून छोटा उदेपूर जिल्ह्याची नव्याने निर्मिती करण्यात येऊन या नवनिर्मित जिल्ह्याचे मुख्यालय छोटा उदेपूर येथे ठेवण्यात आले.
परिसरातील शेतमालाची बाजारपेठ म्हणून यास महत्त्व आहे. शहराच्या परिसरात रथवा, भिल्ल, दुबळा या आदिवासींची विशेषत: रथवा आदिवासी लोकांची वस्ती जास्त आहे. हे आदिवासी लोक पिठोरा भित्तिचित्रे तयार करण्यासाठी व चित्रकलेसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. ही चित्रे घरांच्या भिंतींवर लावली जातात. आदिवासी लोक अशी चित्रे व इतर वस्तू शहरातील आठवडी बाजारात (हॅट्समध्ये) आणि आसपासच्या खेड्यांत विकतात. येथे आदिवासी वस्तुसंग्रहालय असून त्यात आदिवासी लोकांनी कुशलतेने तयार केलेल्या वस्तुंचा संग्रह आहे. कुसुम विलास राजवाडा, प्रेम भवन, काली निकेतन राजवाडा (नहर महाल) ही येथील उल्लेखनीय स्मारके व पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. राजघराण्यातील कुटुंबियांच्या उन्हाळी निवासासाठी येथील काली निकेतन राजवाडा बांधला गेला होता.
समीक्षक : वसंत चौधरी