भारताच्या हरयाणा राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आणि भूतपूर्व जींद संस्थानची राजधानी. हरयाणातील हे सर्वांत मोठ्या व प्राचीन शहरांपैकी एक आहे. लोकसंख्या १,६७,५९२ (२०११). हे दिल्लीच्या वायव्येस ११० किमी., सस. पासून २२७ मी. उंचीवर वसले आहे. प्रारंभी हे जयंतीनगरी, जयंतपुरी या नावांनी ओळखले जाई. कालांतराने याचे नाव जींद असे झाले. महाभारतातील उल्लेखानुसार पांडवांनी येथे जयंतीदेवी (विजय देवता) मंदिर बांधले. विजय प्राप्तीसाठी पांडव या देवीची प्रार्थना करून कौरवांशी लढण्यासाठी गेले असल्याचे मानले जाते. याच मंदिराभोवती जींद या नगराचा विस्तार झालेला आहे. पतियाळा संस्थानचे शीख महाराजा रणजितसिंग यांनी आपली सर्वांत तरूण महाराणी जिंदान कौर हिच्या नावावरून शहराला जींद हे नाव दिले असावे, अशीही एक शक्यता वर्तविली जाते. जींद संस्थानचे महाराजा गजपतसिंग यांनी इ. स. १७५५ मध्ये हा भाग जिंकून घेतला आणि जींद संस्थानची राजधानी जींद येथे स्थापन केली (इ. स. १७६६). त्यांनी इ. स. १७७५ मध्ये येथे किल्ला बांधला. पुरातत्त्वविद्या अभ्यासावरून पाच वेळा या शहराचा विनाश झाला होता; परंतु प्रत्येक वेळी पुन्हा पूर्ण जोमाने ते नव्याने उभे राहिले आहे. १ नोव्हेंबर १९६६ पासून हे जींद जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
जींदच्या दक्षिणेस क्वचितच आढळणाऱ्या लहानलहान टेकड्या वगळता या शहराचा परिसर सपाट असून अधूनमधून त्यांत स्थलांतरित वाळूच्या टेकड्या आढळतात. परिसराला सरहिंद कालवाप्रणालीद्वारे पाणीपुरवठा होत असून धान्य, हरभरा, कापूस ही तेथील प्रमुख पिके आहेत. स्थानिक धान्य व्यापाराचे जींद हे प्रमुख केंद्र आहे. शहरात प्लॅस्टिक, रसायने, पोलाद, कृषी अवजारे, दुग्धप्रक्रिया, विद्युतसाहित्य, रेडिओ, साबण, मेणबत्त्या निर्मिती इत्यादी उद्योग चालतात. राष्ट्रीय महामार्ग क्र. ७१ वर हे शहर आहे. दिल्ली, पानिपत, चंडीगढ या व इतर शहरांशी हे रस्ते आणि लोहमार्गांनी जोडलेले आहे. चौधरी रणबीरसिंग विद्यापीठ तसेच वेगवेगळ्या विद्याशाखांची महाविद्यालये येथे आहेत. शहरातील राणी तलाव व तेथील भुतेश्वर मंदिर, जयंतीदेवी मंदिर, श्री गुरू तेजबहादूर साहिब गुरूद्वारा, पांडू-पिंडारा आणि रामराई ही स्थळे पर्यटक आणि भाविकांची प्रमुख आकर्षणे आहेत.
समीक्षक : वसंत चौधरी