उद्योगधंदे, नागरीकरण आणि वाहतूक इत्यादी कारणांनी वातावरणात अनेक वायुप्रदूषके फेकली जातात. ही प्रदूषके त्यांच्या वजनानुसार काही काळ हवेत तरंग राहतात. तरंगत असताना वनस्पतींच्या सान्निध्यात आल्यास पानांवरील रंध्रांतून वनस्पतींमध्ये शिरतात आणि आपापल्या रासायनिक गुणधर्मांप्रमाणे वनस्पतींवर परिणाम करतात. माफक प्रमाणातील, परंतु सततच्या प्रदूषणामुळे झाडांची वाढ खुंटते. तीव्र प्रदूषणामुळे झाडांची पाने डागाळतात व गळून पडतात, कधीकधी झाडे मरतातही.
सल्फर डाय-ऑक्साइड, नायट्रोजनाची ऑक्साइडे, फ्ल्युओराइडे, कार्बनची ऑक्साइडे, क्लोराइडे, अमोनिया, धूलिकण इ. प्राथमिक स्वरूपाची वायुप्रदूषके मानवी उद्योगांमुळे हवेत सोडली जातात. या प्राथमिक प्रदूषकांपासून वातावरणातील प्रक्रियांमुळे ओझोन, धुरके, पेरॉक्सी-ॲसिटील-नायट्रेट ही दुय्यम प्रदूषके तयार होतात. ही वेगवेगळी वायुप्रदूषके अलग-अलग अथवा संयुक्त रीत्या वनस्पतींवर परिणाम करत असतात. या प्रदूषकांचा वनस्पतींवरील परिणाम त्यांच्या पाण्यात विरघळण्याच्या वेगावर अवलंबून असतो. हा वेग खालीलप्रमाणे असतो.
HF > SO2 > Cl > NO2 > O3 > PAN > NO > CO2.
वायुप्रदूषके जास्त करून (९५ % पेक्षाही जास्त) पानांवरील रंध्रांद्वारे वनस्पतीमध्ये शिरतात आणि पेशींच्या दरम्यानच्या जागांमध्ये पसरतात व तेथील पाण्यामध्ये विरघळतात. काही प्रमाणात ती पेशींमध्ये शिरतात. रंध्रांच्या रक्षक पेशीवरही वायुप्रदूषकांचा परिणाम होतो. सभोवतालच्या परिस्थितीचा वनस्पती-प्रदूषक यांतील संबंधावर मोठा परिणाम होतो. हवेचे तापमान, हवेतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग, मातीतील पोषक द्रव्ये इत्यादींमुळे प्रदूषकांच्या तीव्रतेचा परिणाम ठरतो. वनस्पतीच्या वाढीचा जोम व वय यांचाही यात भाग असतो.
माफक प्रमाणातील वायुप्रदूषकांचा वनस्पतींवर जरी दृश्य परिणाम दिसत नसला, तरी अद्दृश्य परिणाम होतच असतो. वनस्पतींच्या वाढीचा वेग कमी होणे, पाने खुरटणे, फुले कमी व लहान होणे, झाडाचे जैव वस्तुमान जीवभार (बायोमास) आकसणे असे ते परिणाम असतात. अशा परिणामांचे मूल्यमापन करून नुकसानाची किंमत करता येते.
संदर्भ :
- Chaphekar, S.B.. Effects of atmospheric pollutants on plants in Bombay. J.Biol.Sciences, 15:1-6,
- Hill, A.C.; Chamberlain, E.M. The removal of water soluble gases from the atmosphere by vegetation. In: Exchange of Particulate and Gaseous Pollutants Symp., Richmond, Washington. Pp. 1-12 , 1974.
- Smith, W.H. 1081. Air Pollution and Forests : Interactions between Air Contaminants and Forest Ecosystems, Springer-Verlaag, New York.
समीक्षक : डॉ. बाळ फोंडके