स्लटस्की, यूजीन (Slutsky, Eugen) : (७ एप्रिल १८८० ते १० मार्च १९४८). प्रसिद्ध रशियन अर्थशास्त्रज्ञ. स्लटस्की यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र व सांख्यिकी अर्थशास्त्र यांत आपले योगदान दिले असून त्यांचे स्लटस्की प्रमेय व स्लटस्की समीकरण प्रसिद्ध आहे. स्लटस्की यांचा जन्म यारोस्लाव्ह्ल (ओब्लास्ट) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. स्लटस्की यांनी सुरुवातीचे शिक्षण यारोस्लाव्ह्ल येथे घेऊन इ. स. १८९९ मध्ये सांख्यिकीच्या पदवीसाठी कीव्ह विद्यापीठात प्रवेश घेतला; परंतु त्यांच्या क्रांतीकारी कार्यामुळे त्यांना तेथून काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी इ. स. १९०३ ते १९०५ या काळात म्यूनिक येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत अभियंता या पदवीचा अभ्यास केला. त्यानंतर ते रशियाला परत आले आणि इ. स. १९११ मध्ये कीव्ह विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली. त्यांनी काही काळ तांत्रिक महाविद्यालयात शिकविले; परंतु त्यांना राजकीय अर्थशास्त्र या विषयात आवड निर्माण झाली आणि इ. स. १९१८ मध्ये त्यांनी राजकीय अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी कीव्ह इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स येथे अध्यापनाला सुरुवात करून इ. स. १९२० मध्ये ते प्राध्यापक झाले.
स्लटस्की यांचे संभाव्यता सिद्धांतामध्ये मोलाचे योगदान आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रातील मूलभूत अशा मागणी सिद्धांताच्या संदर्भात अर्थशास्त्रज्ञ ॲल्फ्रेड मार्शल यांचे संख्यावाचक उपयोगिता विश्लेषण आणि अर्थशास्त्रज्ञ जॉन रिचर्ड हिक्स यांचे क्रमवाचक उपयोगिता विश्लेषण पायाभूत मानले जाते. हिक्स यांच्या क्रमवाचक उपयोगिता प्रतिमानाचा अभ्यास समवृत्ती वक्राद्वारे केला जातो आणि या वक्राचे उपयोजन अनेक प्रकारे करता येते, असे स्लटस्की यांचे मत होते. तसेच समवृत्ती वक्राच्या साहाय्याने किंमत व मागणी यांच्या संबंधांवर परिणाम घडविणाऱ्या उत्पन्न परिणाम व पर्यायता यांचा अभ्यास करता येतो. मागणीवर परिणाम घडविणारा किंमत परिणाम म्हणजे उत्पन्न व पर्यायता परिणाम यांची बेरीज होय, असेही मत स्लटस्की यांनी मांडले आहे.
PE = SE + IE
(PE – Price Effect, SE – Substitution Effect, IE – Income Effect)
हिक्स यांनी किंमत परिणाम ही संकल्पना सर्वप्रथम मांडली; परंतु स्लटस्की यांनी किंमत परिणामाची पर्यायता परिणाम व उत्पन्न परिणाम असे विभाजन करण्याचे काम केले. असे असले, तरी हिक्स आणि स्लटस्की यांच्या किंमत परिणाम या विश्लेषणात अनेक फरक आढळतात. स्लटस्की यांच्या मते, पर्यायता परिणाम घडून येताना वस्तूंच्या सापेक्ष किमतीत बदल होतात आणि उपभोक्त्याचे मौद्रिक उत्पन्न अशा पद्धतीने समायोजित केले जाते की, जेणे करून उपभोक्त्याची खरेदीक्षमता तीच राहते. म्हणजेच, वस्तूंच्या सापेक्ष किमतीतील बदलांचा उपभोक्त्याच्या मौद्रिक उत्पन्नावर परिणाम होत असला, तरी त्याचे वास्तव उत्पन्न म्हणजेच त्याची खरेदीक्षमता बदलत नाही.
वस्तूंच्या किमतीतील सापेक्ष बदल म्हणजे उपभोक्त्याच्या खरेदीक्षमतेत होणारी वाढ अथवा घट होय. वस्तूंच्या किमतीत बदल झाल्यास उपभोक्ता आपले मौद्रिक उत्पन्न अशा पद्धतीने समायोजित करतो की, ज्यायोगे उपभोक्त्याला नवीन किमतीनुसारदेखील तोच वस्तूसंच खरेदी करता येईल. म्हणजेच, उपभोक्त्याची खरेदीक्षमता कायम टिकवली जाते. हा मौद्रिक उत्पन्नातील बदल म्हणजे एकच वस्तूसंच खरेदी करण्यासाठी जुन्या व नव्या किमतीनुसार येणारा खर्चातील फरक होय. स्लटस्की यांनी या उत्पन्नातील बदलाकडे खर्चातील फरकाच्या (कॉस्ट डिफरन्स) दृष्टीने पाहिले आहे. म्हणून पर्यायता परिणाम म्हणजे वस्तूंच्या सापेक्ष किमतीतील बदलाचा खर्चावर होणारा परिणाम होय. अशा प्रकारे स्लटस्की यांनी आपल्या प्रतिमानाबाबत मत मांडले आहे.
स्लटस्की यांनी किंमत परिणामाची उत्पन्न व पर्यायता परिणाम अशी विभागणी केली. यालाच स्लटस्की समीकरण असे म्हणतात.
स्लटस्की समीकरण
Dx/Dp = Dj/Dp – (x. Dx/Dy)
x = सामान्य वस्तू, p = किंमत, Dx/Dp = मागणीतील बदल, Dj/Dp पर्यायता परिणाम, (x. Dx/Dy) = उत्पन्न परिणाम.
कोणत्याही सामान्य वस्तूच्या संदर्भात त्या वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी वाढते आणि उत्पन्न परिणाम धनात्मक व पर्यायता परिणाम ऋणात्मक असल्याचे दिसून येते.
PE = (IE) + (-SE)
SE > IE
म्हणून, PE = – ve
स्लटस्की यांनी किंमत कमी झाल्यास मागणी वाढते, हा मागणीचा नियम आपल्या विश्लेषणातून स्पष्ट केला आहे.
हिक्स यांच्या समवृत्ती वक्र विश्लेषणानुसार पर्यायता परिणाम एकाच समवृत्ती वक्रावर दाखविता येतो, असे म्हटले आहे; परंतु स्लटस्की यांच्या विश्लेषणानुसार उपभोक्ता पर्यायता परिणामानुसार अधिक उंचीवरील (जास्त आकाराचा वस्तूसंच) समवृत्ती वक्रावर वस्तूंचा उपभोग घेताना दिसतो.
स्लटस्की यांच्या विश्लेषणाचे फायदे : (१) स्लटस्की यांच्या समवृत्ती वक्र विश्लेषणानुसार उत्पन्नाचे समायोजन करण्यासाठी जेवढ्या रकमेचे उत्पन्न (खर्चातील फरकानुसार) आवश्यक आहे, ती रक्कम काढता येते. (२) विश्लेषणाची ही पद्धत निरीक्षणयोग्य बाजार माहितीवर अवलंबून आहे. (३) या पद्धतीनुसार मागणीचा सिद्धांत सहज सिद्ध करता येतो. (४) या पद्धतीनुसार उत्पन्न परिणाम हा पर्यायता परिणामापासून वेगळा काढता येतो.
स्लटस्की यांनी समवृत्ती वक्राबाबत केलेल विश्लेषण हिक्स यांच्या विश्लेषणाहून अधिक उपयुक्त व सरस ठरते. त्यांनी कलेक्टेड स्टॅटिस्टिकल पेपर्स हा ग्रंथ लिहिला आहे. आधुनिक सूक्ष्म अर्थशास्त्रात विश्लेषणाचे उपयुक्त साधन म्हणून स्लटस्की यांच्या प्रतिमानाचे महत्त्व मोठे आहे.
स्लटस्की यांचे मॉस्को येथे निधन झाले.
संदर्भ :
- Ahuja, H. L., Microeconomics : Theory and Practice, New Delhi, 2016.
- Dwivedi, D. N., Micro Economics, 2011.
समीक्षक : दि. व्यं. जहागीरदार