लघुग्रह मोहिमा : इ.स. १९९० पासून अवकाशयानांनी विविध अंतरांवरून, कधी लघुग्रहांभोवती फेरी मारत, तर कधी प्रत्यक्ष उतरून लघुग्रहांना भेटी दिल्या आहेत, त्यांची निरीक्षणे घेतली आहेत. या खेरीज काही अवकाशयानांनी त्यांच्या इतर मोहिमांच्या मार्गावर असताना लघुग्रहांची प्रकाशचित्रे घेतलेली आहेत. परंतु, ती एक लाख किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून घेतलेली असल्याने त्यातून काही निष्पन्न निघेल अशी स्पष्टता नव्हती. त्यामुळे त्यांना विज्ञानाच्या दृष्टीने जमेस धरले जात नाही. त्यात ‘न्यू होरायझन्स’ मोहिमेने  ‘१३२४२४ एपीएल’ या मुख्य पट्ट्यातील लघुग्रहाचे इ.स. २००६ मध्ये घेतलेले प्रकाशचित्र, ‘कॅसिनी’ यानाने इ.स. २००० मध्ये घेतलेले ‘२६८५ मसूर्सस्काय’ चे प्रकाशचित्र, तर ‘३०६ नाईके’ लघुग्रहाचे ‘पायोनिअर-१०’ यानाने इ.स. १९७२ साली घेतलेले प्रकाशचित्र, ही तीन प्रकाशचित्रे जरी उपलब्ध असली, तरी त्यांना वैज्ञानिक दृष्टीने ग्राह्य धरले जात नाही. तसेच ‘हबल अवकाश दूरदर्शी’ने लघुग्रहांची वेळोवेळी केलेली निरीक्षणेही लघुग्रहांच्या अवकाश मोहिमांमध्ये धरली जात नाहीत.

जून २०२० पर्यंत पूर्ण झालेल्या, सध्या चालू असलेल्या आणि नजिकच्या भविष्यात नियोजित लघुग्रहांच्या अंतराळ यानांच्या शोधमोहिमा पुढीलप्रमाणे आहेत:

१. ‘गॅलिलिओ मोहीम’ या गुरू आणि त्याचे उपग्रह यांचे निरीक्षण करण्यासाठी आयोजलेल्या मोहिमेत, गुरूकडे जाताना इ.स. १९९१ मध्ये या यानाने ‘९५१ गास्प्रा’ ची निरीक्षणे घेतली. तर नंतर पुढे जात इ.स.१९९३ मध्ये ‘२४३ इडा’ ला जवळून भेट दिली. या भेटीच्या वेळी इडाभोवती फिरणारा ‘डॅक्टील’ हा एक उपग्रह इडाला आहे, हे या निरीक्षणांमधूनच सापडले.

२. ‘निअर शूमेकर’ यानाने इ.स. १९९८ ला ‘२५३ माथिल्डे’ ची निरीक्षणे घेतली. त्यानंतर या यानानेच ‘४३३ इरॉस’ भोवती फेरी मारत त्याचे निरीक्षण तर केलेच, शिवाय हे यान यशस्वीरित्या इरॉसवर उतरले. इरॉस हा एक पृथ्वीसमीप कक्षा असणारा लघुग्रह आहे.

३. ‘डीप स्पेस-१’ या धूमकेतू ‘मोरेली’ साठी पाठवलेल्या यानाने इ.स. १९९९ मध्ये ‘९९६९ ब्रेली’ या लघुग्रहाची मार्गस्थ असताना जवळून निरीक्षणे घेतली होती.

४. ‘स्टार डस्ट’ या मोहिमेने इ.स. २००२ मध्ये ‘वाईल्ड-२’ या धूमकेतूच्या शेपटीतले द्रव्य गोळा करून, ते घेऊन परत येण्याची मोहीम राबवली होती. या मोहिमेत मार्गस्थ असताना ‘५५३५ ॲनफ्रँक’ या लघुग्रहाची निरीक्षणे या यानाने मिळवली होती.

५. ‘हयाबुसा’ या यानाने इ.स. २००५ मध्ये एका छोट्या ‘२५१४३ इटोकावा’ या लघुग्रहाची माती गोळा करून आणण्याची कामगिरी यशस्वी केली होती. ही जपानची मोहीम होती.

६. ‘न्यू होरायझन्स’ ही मोहीम ‘१३४३४० प्लूटो’, त्याचे पाच उपग्रह आणि ‘४८६९५८ अर्रोकोथ’ या दूरच्या क्यूपर पट्ट्यातील वस्तूंसाठी योजलेली होती. १९ जानेवारी २००६ ला प्रक्षेपित झालेले हे यान १४ जुलै २०१५ ला प्लूटोजवळ पोहोचले. तर १ जानेवारी २०१९ ला अर्रोकोथजवळ पोहोचले. त्याने या सर्वांची अनेक उत्कृष्ट निरीक्षणे आणि प्रकाशचित्रे मिळवली आहेत.

७. ‘रोझेटा’ ही मोहीम खरे तर ‘६७पी/चुर्युमोव-गेरासिमेन्को’ (67P/Churyumov-Gerasimenko) या धूमकेतूजवळ जाऊन त्यावर आदळणारा एक अवतरक टाकून त्याची निरीक्षणे घेण्यासाठी योजलेला होती. त्याच्या नियोजित मार्गावर असताना, इ.स. २००८ मध्ये या यानाने ‘२८६७ स्टेइन्स’ लघुग्रहाची फक्त ८०० किमी अंतरावरून निरीक्षणे घेण्याची कामगिरी केली. युरोपियन स्पेस एजन्सीची ही पहिलीच लघुग्रह मोहीम. रोझेटा यानाने त्यानंतर इ.स. २०१० मध्ये सुमारे ३,००० किमीवरून ‘२१ ल्युटेशिया’ या १०० किमी आकाराच्या लघुग्रहाशेजारून जाताना त्याचीही निरीक्षणे घेतली.

८. ‘चँग-२’ या यानाने इ.स. २०१२ मध्ये ‘४१७९ टाऊटॅटिस’ या लघुग्रहाला भेट दिली. चीनच्या यानाने एखाद्या लघुग्रहाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती.

९. ‘ओसिरिस-रेक्स’ (OSIRIS-Rex) ही पृथ्वीसमीप कक्षा असणाऱ्या ‘१०१९५५बेन्नू’ लघुग्रहावर पाठवलेली शोधमोहीम आहे. दिनांक ८ सप्टेंबर २०१६ ला या यानाचे प्रक्षेपण झाले. ऑक्टोबर २०१८ ला हे यान बन्नू जवळ पोहोचले. या लघुग्रहाला प्रत्यक्ष स्पर्श करून त्याच्या मातीचे नमुने गोळा करून, ते पृथ्वीवर परत आणण्याची या मोहिमेत योजना आहे. सध्या तो बेन्नूभोवती फिरत आहे. प्रत्यक्षात २० ऑक्टोबर २०२० ला नमुने गोळा करण्याचे काम होईल, असे एप्रिलमध्ये घेतलेल्या चाचण्यांवरून ठरवण्यात आले आहे. मार्च २०२१ मध्ये हे यान त्याचा परतीचा प्रवास सुरू करेल आणि २४ सप्टेंबर २०२३ ला ते पृथ्वीवर परत येईल अशी या मोहिमेची आखणी आहे.

१०. ‘हयाबुसा-२’ ही ‘जपान स्पेस एजन्सी’ने राबवलेली मोहीम आहे. ‘ऱ्युगू’(Ryugu) म्हणजेच (१९९९ जेयू ३) या लघुग्रहाची ही शोधमोहिम आहे. ऱ्युगू हा एक पृथ्वीसमीप कक्षा असणारा लघुग्रह आहे. या लघुग्रहावर उतरणारे दोन अवतरक, शिवाय एक जोरात जाऊन आपटणारा भागही आहे. हा भाग आदळल्यावर एक छोटा स्फोटही घडवून आणणार आहे, ज्याने एक विवर (खड्डा) पडणार आहे. ज्यामुळे तिथल्या जमिनीखालचा-आतला भाग उघडा पडेल. त्या उघड्या झालेल्या भागामधून नमुने गोळा करायचे आहेत. ३ डिसेंबर २०१४ ला या यानाचे प्रक्षेपण जपानमधूनच केले गेले. २७ जून २०१८ ला ते यान ऱ्युगूजवळ पाहोचले. २१ सप्टेंबर २०१८ ला एक अवतरक उतरला. ५ एप्रिल २०१९ ला आदळणारा भाग आपटून त्याने सुमारे १० मीटर व्यासाचे एक विवर तयार केले. ३ ऑक्टोबरला दुसरा अवतरक उतरला. नंतर नमुने गोळा करण्याचे मुख्य यानाचे कामही झाले. ते नमुने परत आणण्यासाठी यानाचा ऱ्युगूची कक्षा सोडून परतीचा प्रवास १३ नोव्हेंबर २०१९ ला सुरूही झाला आहे. हे यान डिसेंबर २०२० ला मिळालेले नमुने घेऊन पृथ्वीवर परत येईल.

११. हयाबुसाच्या या मुख्य मोहिमेसोबत ‘प्रोसियॉन’ या आणखी एका मोहिमेचा त्यात समावेश होता. प्रोसियॉन यान ठरल्याप्रमाणे २२ फेब्रुवारी २०१५ ला हयाबुसापासून विलगीकरण करण्यात यशस्वीही झाले होते. पण त्यावरचे मुख्य संवेग देणारे ‘आयन इंजिन’ १० मार्च २०१५ ला बंद पडले, ते परत सुरूच होऊ शकले नाही. त्यामुळे ठरलेल्या ‘२००० डीपी १०७’ या लघुग्रहाकडे जाण्याच्या मार्गावर तो स्थापितच होऊ शकला नाही. पण पृथ्वीकक्षेतच फिरत राहिल्याने, सप्टेंबर २०१५ मध्ये ‘67P/Churyumov-Gerasimenko’ या धूमकेतूची निरीक्षणे मात्र तो या कक्षेत असताना घेऊ शकला.

१२. ‘डॉन’ (DAWN) ही मोहीम ‘४ व्हेस्टा’ आणि ‘१ सेरेस’ या दोन लघुग्रहांच्या जवळून निरीक्षणांसाठी योजलेली नासाची मोहीम होती. या दोन्ही लघुग्रहांचे दृश्यमाध्यमातून त्रिमित नकाशे तयार करणे, खनिजे, घनता, आकार, वस्तुमान, चुंबकत्व, त्यावरून अंतर्गत जडणघडण अशा अनेक गोष्टींचा मागोवा या मोहिमेतून घेतला जाणार आहे. ‘डेल्टा-२’ या प्रक्षेपकाद्वारे २७ सप्टेंबर २००७ ला हे यान कामगिरीवर निघाले. ४ वर्षांच्या प्रवासानंतर १६ जुलै २०११ ला ते व्हेस्टाजवळ पोहोचले. व्हेस्टाची विविध अंतरावरून (कक्षांतर कमी करत) वर्षभर निरीक्षणे झाल्यावर ५ सप्टेंबर २०१२ ला व्हेस्टाची कक्षा सोडून डॉनने सेरेसकडे मार्गक्रमण केले. ते ६ मार्च २०१५ ला सेरेसजवळ पोहोचले. सेरेस भोवती ३७५ किमी अंतरावरच्या वर्तुळाकार कक्षेत डिसेंबर २०१५ मध्ये डॉन स्थापित झाले. नियोजित कार्यकालाप्रमाणे जून २०१६ ला डॉन मोहिमेची सांगता करण्यात आली. पण सुस्थितीत असणारे डॉन यान ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत कार्यरत होते. १ नोव्हेंबरला ही मोहीम थांबवण्यात आली.

१३. ‘डार्ट’ (DART) म्हणजे ‘डबल ॲस्टेरॉइड रिडायरेक्शन टेस्ट’ ही मोहीम इ.स.२०२१ मध्ये प्रक्षेपित करण्यात येणार आहे. लघुग्रहावर बऱ्यापैकी वेग असलेली एखादी वस्तू जर आदळली, तर लघुग्रहाच्या कक्षेत कसा आणि किती फरक पडेल याची चाचणी घेण्याची यात योजना आहे. ‘डीडायमोस-ए’ आणि ‘डीडायमोस-बी’ हे ‘द्वैती लघुग्रह’ आहेत. २२ जुलै २०२१ रोजी प्रक्षेपित केलेले यान, सप्टेंबर २०२२ मध्ये या लघुग्रहांजवळ पोहोचेल. ‘लिसिया’ हा क्यूबसॅट (घनाकृती उपग्रह) प्रत्यक्ष टकरीच्या आधी दोन तास विलग करण्यात येईल, जो या प्रसंगाचे चित्रण करण्याचे काम करेल. टकरीआधी चार तास ‘ड्रॅको आणि स्मार्टनेव’ या दोन प्रणालींना कार्यरत करण्यात येईल, जे धडक मारण्याची जागा ठरवतील आणि प्रत्यक्ष धडक होताना त्याचे चित्रण करतील. ही टक्कर २७ सप्टेंबर २०२२ रोजी होईल. टक्कर यातल्या ‘डीडायमोस-बी’ या लहान लघुग्रहाशी होईल. या चाचणीतून मिळणारी निरीक्षणे, जर एखादा लघुग्रह पृथ्वीवर येऊन कोसळणार असेल, तर पृथ्वीला त्याच्यापासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरतील… ‘डीडायमोस-बी’ च्या कक्षेतील होणारा बदल इ.स. २०२६ ला होणाऱ्या युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘हेरा’ या मोहिमेमधून परत तपासण्यातही येतील, जेव्हा ते यान या लघुग्रहांशेजारून जाणार आहे.

१४. ‘ल्यूसी’(Lucy) ही मोहीम विविध लघुग्रहांना एकाच प्रवासात भेटी देण्याची आहे. एकूण ७ लघुग्रहांना भेटी देण्याचे यात नियोजन आहे, यापैकी एक लघुग्रह मुख्य पट्ट्यातला आहे, तर बाकीचे सहा गुरूचे ट्रोजन आहेत. १८ ऑक्टोबर २०२१ ही प्रक्षेपणाची तारीख सध्यातरी ठरलेली आहे. प्रक्षेपणानंतर सुमारे चार वर्षांनी २० एप्रिल २०२५ ला ‘५२२४६ डोनाल्डयोहान्सन’ या लघुग्रहाच्या जवळ हे यान पोहोचेल. तीन वर्षांनी ३ एप्रिल २०२७ ला ट्रोजन लघुग्रहांकडे ल्यूसीची वाटचाल सुरू होईल. १२ ऑगस्ट २०२७ ला ‘३५४८ युरीबेट्‍स’, १५ सप्टेंबर २०१७ ला ‘१५९९४ पॉलिमेले’, १८ एप्रिल २०२८ ला ‘११३५१ ल्यूकस’, ११ नोव्हेंबर २०२८ ला ‘२१९०० ऑर्कस’ अशा भेटी झाल्यावर परत एकदा कक्षा बदलून चक्क पृथ्वीसमीप येत, मार्गबदल करत परत दूरवर असलेल्या ‘पॅट्रोक्लस-मेनोइटिअस’ या द्वैती लघुग्रहांकडे वाटचाल करेल. ल्यूसी त्यांच्याजवळ २ मार्च २०३३ला पोहोचेल. अशी एकूण ६ वर्षांची या मोहिमेची कामगिरी असेल असे नियोजन आहे.

१५. ‘ॲस्टर’(ASTER) ही ब्राझिलियन स्पेस एजन्सीची पहिली अवकाशमोहीम असणार आहे. ‘अमोर’ या पृथ्वीसमीप कक्षा असणाऱ्या गटातल्या ‘(१५३५९१) २००१एसएन२६३’ या एका ‘त्रैती’ (एकमेकांभोवती फिरणाऱ्या तीन वस्तू) लघुग्रहांची जवळून निरीक्षणे घेण्याची यात योजना आहे. इ.स. २०२१ मध्ये प्रक्षेपण होऊन वर्षभरात इ.स.२०२२ मध्ये यान या त्रैती लघुग्रहांजवळ पोहोचेल असे नियोजन आहे.

१६. ‘सायके’(Psyche) मोहीम ही ‘१६ सायके’ (16 Psyche) या लघुग्रहाला भेट देण्यासाठी योजलेली आहे. इ.स. २०२३ मध्ये प्रक्षेपण होऊन इ.स. २०३० मध्ये प्रत्यक्ष त्या लघुग्रहाशी भेट होईल, अशी ती योजना आहे. नासामध्ये सध्या या मोहिमेची तयारी सुरू आहे…

या मोहिमांखेरीज काही लघुग्रह मोहिमा अयशस्वीही ठरल्या.

‘डीएसपीएसइ’ म्हणजे ‘डीप स्पेस प्रोग्रॅम सायन्स एक्सपेरिमेंट’ या प्रकल्पांतर्गत ‘क्लेमेंटाइन’ असे नामकरण केलेल्या, २५ जानेवारी १९९४ ला प्रक्षेपित झालेल्या मोहिमेचे दोन उद्देश होते. एक आपल्या चंद्राचे परिभ्रमण करत विविध अंगांनी निरीक्षण आणि नंतर ‘१६२० जिओग्राफोज’ या पृथ्वीसमीप कक्षांतर असलेल्या लघुग्रहाचे निरीक्षण. चंद्राची निरीक्षणे केल्यानंतर लघुग्रहाकडे झेपावताना, उंचीमापन यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाने, यानावरील एक अग्निबाण सुमारे ११ मिनिटे प्रज्वलित राहिला. परिणामी यानाला स्वत:भोवती फिरण्याची गती प्राप्त होऊन ते स्वत:भोवती (मिनिटाला ८० फेऱ्या) गरगर फिरू लागले. या परिस्थितीत लघुग्रहाचे निरीक्षण शक्य नसल्याने, आणि हे फिरणे थांबवणे शक्य नसल्याने, दिशाबदल करून या यानाला पृथ्वीभोवतीच फिरत ठेवले गेले, जे ‘व्हॉन ॲलन पट्ट्यांची’ निरीक्षणे घेण्यासाठी नंतर वापरले गेले. त्यामुळे हे यान लघुग्रहापर्यंत पोहोचलेच नाही.

१२ जानेवारी २००५ ला ‘डीप इंपॅक्ट’ या मोहिमेचे ‘टेम्पल-१’ या धूमकेतूवर अवतरक आपटण्याचे आणि नंतर ‘हार्टली-२’ या धूमकेतूची निरीक्षणे घेण्याची दोन कामे झाल्यावर, यानाची एकूण शारीरिक क्षमता सुस्थितीत होती आणि पुरेसे इंधनही शिल्लक होते. त्यामुळे, त्याला ‘(१६३२४९) २००२ जीटी’ या लघुग्रहाकडे पाठवायचे ठरले. त्याप्रमाणे दोन वेळा अग्निबाण डागून योग्य तो मार्गबदलही करण्यात आला. या लघुग्रहाजवळ इ.स.२०२० मध्ये डीप इंपॅक्ट यान पोहोचेल, हेही त्याच्या दिशा आणि वेगावरून निश्चित झाले. पण मार्गस्थ असताना इ.स. २०१३ मध्ये या यानाबरोबर असलेला संपर्क अचानक बंद पडला. त्यामुळे ही मोहीम अर्धवट सोडून द्यावी लागली. आपल्याशी या यानाचा आता संपर्क जरी नसला आणि यान जरी बंद स्थितीत असले, तरी हे यान या लघुग्रहाकडे आखलेल्या मार्गाने जातच राहणार आहे. ते इ.स. २०२० मध्ये सुमारे ४०० किमी अंतरावरून या लघुग्रहाशेजारून पुढे निघून जाईल…

संदर्भ :

समीक्षक : माधव राजवाडे