ठाकूर, अच्युत दत्तात्रय : (७ मे १९५२ – १८ मे २०२१). महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकसंगीत विशेषज्ञ, संगीत दिग्दर्शक. ते लोकसंगीताचे साक्षेपी अभ्यासक, विशेषज्ञ तसेच संगीत दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते. सुमारे ४० वर्षांपासून अधिक काळ ते संगीत क्षेत्रात कार्यरत होते. त्यांचे मूळ गाव रायगड अलिबाग जवळचे जिल्ह्यातील कोपर हे आहे. त्यांचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. बालपणापासून त्यांना गाण्याची आवड होती. त्यांनी संगीताचे पहिले धडे पंडित शिवरामबुवा वरळीकर यांच्याकडून घेतले. पंडित शिवरामबुवा वरळीकर भजन – सम्राट म्हणून प्रसिद्ध होते. स्नेहल भाटकर, फुलाजीबुवा, शेजवळ बुवा अशी शास्त्रीय संगीताचा बाज असलेल्या आणि भक्तिसंगीत, भजनात रमणाऱ्या गायकांची स्वतंत्र पठडी आणि श्रोतेवर्ग मुंबईत होता.अच्युत ठाकूर यांनी पुढे संगीत क्षेत्रातील धडे गुरु पं. प्रभाकर म्हात्रे, आचार्य डी. पी. अडसूळ, खाँ साहेब गुलाम खाँ, पं. यशवंतबुवा जोशी, विश्वनाथ मोरे यांच्याकडून घेतले. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक, गायक सुधीर फडके यांनी १९७२ साली अच्युत ठाकूर यांना मुंबईत येवून संगीताची साधना करण्याविषयी मार्गदर्शन केले. वडिलांकडून १० रुपये घेऊन अच्युत ठाकूर गाणे शिकण्यासाठी मुंबईला आले. मुंबईत आल्यावर त्यांनी गांधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद केले. संगीतकार विश्वनाथ मोरे यांच्याकडे त्यांनी सात वर्षे सहाय्य्क म्हणून काम केले. १९८३ साली श्री रामायण हा त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट होय. त्यानंतर पैज लग्नाची, घे भरारी, सत्ताधीश, गृहलक्ष्मी, सख्खा भाऊ पक्का वैरी, आता लग्नाला चला, सर्जा राजा, मर्मबंध, चिमणी पाखरं, बरखा सातारकर अशा अनेक चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन अच्युत ठाकूर यांनी केले. चूप गुपचूप, नटरंग, तीन पैशांचा तमाशा, जांभूळ आख्यान अशा नाटकांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले.
अच्युत ठाकूर यांना लोकसंगीताची उत्तम जाण होती त्यामुळे लोकसंगीताचा विशेषतः तमाशाचा बाज असणाऱ्या बरखा सातारकर या चित्रपटात गण, गौळण, लावण्यांचे पारंपरिक संगीत त्यांनी साकार केले. इंडियन नॅशनल थिएटर लोक प्रयोज्य कला संशोधन केंद्राच्या मातीचं स्वप्न, शारदीयेचे लोककळे, अरेरे संसार, जांभूळ आख्यान अशा संशोधनपर प्रयोगांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. १९८९ साली जांभूळ आख्यानचा प्रयोग पाहायला आलेल्या पु. ल. देशपांडे यांनी अच्युत ठाकूर यांच्या त्या नाटकातील संगीत दिग्दर्शनाबाबत त्यांची प्रशंसा केली. १९८४ साली नागपूर येथील एका कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या समोर महाराष्ट्र गीत गाऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांची प्रशंसा मिळवली. मुंबई आकाशवाणी केंद्राचे ते उच्च श्रेणी सुगम संगीत गायक आणि संगीतकार होते. अच्युत ठाकूर यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सुरेश वाडकर, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर, वैशाली सामंत, देवकी पंडित, फ़ैय्याज, उर्मिला धनगर, मिलिंद शिंदे आदी गायक गायिकांनी गायली आहेत. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात ते सुगम संगीत विभागाचे मानद प्राध्यापक होते. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत ते परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत असत.
जांभूळ आख्यान या गोंधळ विधिनाट्यावर आधारित संशोधन नाट्याचे प्रयोग आधी इंडियन नॅशनल थिएटर लोक प्रयोज्य कला संशोधन केंद्राने केले आणि त्यानंतर लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर तर्फे हे नाटक रंगभूमीवर आले. संबळ, दिमडी या लोकवाद्यांचा खुबीने वापर त्यांनी या नाटकात केला. या नाटकात गोंधळाच्या पारंपरिक संगीताचा बाज अच्युत ठाकूर यांनी कायम ठेवून लोकसंगीताला एक वेगळेच परिमाण प्राप्त करून दिले.
महाराष्ट्र शासनाच्या चित्रपट महोत्सवात दोन वेळा पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
संदर्भ : क्षेत्र संशोधन