भूपट्ट सांरचनिकी सिद्धांतानुसार समुद्रतळावर दोन भूखंडांच्या मध्ये महासागरीय कटक वा पर्वतरांगा (रिज) असतात आणि त्यांना लंबरूप (आडवे छेदणारे) विभंग असतात. १९६० – १९७० या काळात अनेक शास्त्रज्ञांनी या गोष्टींचे चिकित्सक विश्लेषण केले आणि या विचारमंथनातून भूपट्ट सांरचनिकी सिद्धांत पुढे आला. या सिद्धांतानुसार सर्व भूपट्टांच्या सीमांवर मध्यस्थ महासागरीय पर्वतरांगा, चापाकृती द्वीपसमूह वा महासागरीय खंदक आहेत. महासागरी कटक हे खडबडीत असतात, तसेच ते क्रियाशील ज्वालामुखी व भूकंपक्षेत्रे असल्याचे आढळतात. भूपट्ट सांरचनिकी सिद्धांतानुसार मानण्यात आलेल्या वेगवेगळ्या भूपट्टांपैकी भारतीय, आफ्रिकन आणि अंटार्क्टिक हे तीन भूपट्ट हिंदी महासागरातील रोड्रीगेस ट्रिपल पॉइंट (मॉरिशसच्या पूर्वेस) येथे एकत्र आलेले आहेत. या केंद्रापासून भूपट्टांच्या सांध्याला अनुसरून मध्यस्थ महासागरी पर्वतरांग पसरलेली आहे. त्या पर्वतरांगेचा विस्तार आणि आकार पाहिला असता, हिंदी महासागराच्या तळावरील त्यांचा आकार उलट्या इंग्रजी वाय (ƛ) अक्षरासारखा दिसतो. या पर्वतरांगेमुळे एका मोठ्या द्रोणी प्रदेशाची विभागणी पूर्वेकडील, पश्चिमेकडील व दक्षिणेकडील अशा तीन द्रोणी प्रदेशांमध्ये झालेली आहे. या वाय अक्षराचे टोक उत्तरेस असून त्याच्या दोन्ही शाखा दक्षिणेस पसरलेल्या आहेत. अरबी समुद्राच्या अगदी वायव्य भागातील एडनच्या आखातापासून कार्ल्सबर्ग रिज या नावाने सुरू होणारी ही कटक चागोस-लक्षद्वीप पठारी प्रदेश ओलांडून दक्षिणेस येते. तेथे तिला मध्यस्थ भारतीय कटक (मिड-इंडियन किंवा सेंट्रल इंडियन रिज) या नावाने ओळखले जाते. मादागास्कर बेटाच्या आग्नेयीस, साधारण २५° द. अक्षवृताच्या दरम्यान या रांगेच्या दोन शाखा होतात. त्यांपैकी एक रांग नैर्ऋत्येस, तर दुसरी आग्नेयीस जाते. नैर्ऋत्येस जाणारी नैर्ऋत्य भारतीय कटक (साउथवेस्ट इंडियन रिज) पुढे आफ्रिकेच्या दक्षिणेस अटलांटिक-भारतीय कटकला (अटलांटिक-इंडियन रिजला) मिळते. आग्नेयीस जाणारी आग्नेय भारतीय कटक (साउथईस्ट इंडियन रिज) पूर्वेकडे वळून टास्मानियाच्या दक्षिणेस भारतीय-अंटार्क्टिक कटक (इंडियन-अंटार्क्टिक रिज) या पर्वतरांगेला व पुढे पॅसिफिक-अंटार्क्टिक कटक या पर्वतरांगेला मिळते. मध्यस्थ भारतीय कटक ही हिंदी महासागराच्या साधारणपणे मध्यात आहे.
हिंदी महासागरात ९०° पू. रेखावृत्ताला अनुसरून उत्तर-दक्षिण पसरलेली नाइन्टी ईस्ट रिज आहे. ९०° पू. रेखावृत्ताला अनुसरून असल्यामुळेच तिला हे नाव देण्यात आले आहे. जगातील महासागरी प्रदेशांतील ही सर्वांत लांब (४,५०६ किमी.) व सरळ पर्वतरांग आहे. १९६२ मध्ये पहिल्यांदा तिचा शोध लागला. दक्षिणेस ३१° द. अक्षवृत्ताच्या दरम्यान असलेल्या ब्रोकन रिजपासून उत्तरेस बंगालच्या उपसागरातील सुमारे ९° उ. अक्षवृत्तापर्यंत या रांगेचा विस्तार आहे. ९° उ. अक्षवृत्ताच्या उत्तरेस बंगालच्या उपसागरातील अवसादाखालीसुद्धा तिचा विस्तार आढळतो. वैशिष्ट्य म्हणजे ही पर्वतरांग भूकंपमुक्त आहे. हिंदी महासागरातील विभंग पट्टे महासागरी कटकांच्या अक्षाला अनुसरून असून ते प्रामुख्याने उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेले आहेत. ओवेन, प्रिन्स एडवर्ड, वीमा आणि अॅम्स्टरडॅम हे त्यांतील प्रमुख पट्टे हे त्या कटकांवरून गेलेले प्रमुख विभंग पट्टे असून डायमँटिया विभंग पट्टा ऑस्ट्रेलियाच्या नैर्ऋत्येस आहे. हिंदी महासागरातील पठारी प्रदेश सागरतळापासून सुमारे ३,०५० मी. पेक्षा अधिक उंचीचे, तर द्रोणी प्रदेश सागरपृष्ठापासून सुमारे ५,००० मी. पेक्षा अधिक खोलीचे आढळतात. मादागास्करच्या दक्षिणेस जलमग्न मोझँबीक व मादागास्कर हे पठारी प्रदेश आहेत. सेशेल्स, लक्षद्वीप, मालदीव, चागोस, कर्गलेन ही बेटे अशा सागरी पठारांवर आढळतात. चागोस, लक्षद्वीप, मादागास्कर व मोझँबीक हे भाग भूकंपमुक्त आहेत.
पृष्ठीय भूमिस्वरूपे : हिंदी महासागराच्या किनारी भागांत नदीमुखखाडी, त्रिभुज प्रदेश, खाजण, कच्छ वनश्रीयुक्त दलदल, सागरीकडे, प्रवाळभित्ती, जटिल रोधक बेटे, पुळणी, वालुकाराशी इत्यादी भूविशेष आढळतात. हुगळी नदीने बंगालच्या उपसागर किनाऱ्यावर कोलकाताजवळ निर्माण केलेली नदीमुखखाडी विशेष प्रसिद्ध आहे. भूसांरचनिक दृष्ट्या पाकिस्तानचा किनारा विशेष क्रियाशील आहे. सिंधु नदीने तेथे १९० किमी. रुंदीचा त्रिभुज प्रदेश तयार केला आहे. भारतीय उपखंडाच्या किनारी भागात अतिशय विस्तृत अशा पुळणी आहेत. या उपखंडाच्या एकूण किनाऱ्यापैकी जवळजवळ निम्मा किनारी प्रदेश पुळणींनी व्यापला आहे. बहुतांश नदीमुखखाड्यांच्या आणि त्रिभुज प्रदेशांत कच्छ वनश्री आढळते. त्यांपैकी गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशात आढळणारे सुंदरबन हे जगातील सर्वांत मोठे कच्छ वनश्रीचे अरण्य असून त्यातील बहुतांश भाग यूनेस्कोने जागतिक वारसास्थळांत समाविष्ट केला आहे (१९८७). उष्णकटिबंधातील बेटांभोवती तसेच बांगला देश, म्यानमार आणि भारत यांच्या दक्षिण किनाऱ्यांवर आणि आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर अनुतट, रोधक व कंकणद्वीप अशा तीनही प्रकारच्या प्रवाळभित्ती आढळतात.
बेटे : हिंदी महासागरात तुलनेने बेटांची संख्या कमी आहे. मादागास्कर (जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे बेट), मालदीव, सेशेल्स, सोकोत्रा व श्रीलंका ही बेटे म्हणजे खंडांचे विखंडित भाग आहेत. अॅमिरँटिस, अंदमान व निकोबार, चागोस, लक्षद्वीप, ख्रिसमस, कोकोस (कीलिंग), कॉमोरो, क्रॉझे, फॉरक्कर, कर्गलेन, मॉरिशस, प्रिन्स एडवर्ड, रेयून्यों, सेंट पॉल, अॅम्स्टरडॅम आणि सूंदा ही ज्वालामुखी क्रियेतून निर्माण झालेली बेटे आहेत. अंदमान व सूंदा ही कमानीच्या आकाराची बेटे असून त्यांच्या महासागराकडील (दक्षिण) बाजूस सागरी खंदक आहेत.
समीक्षक : नामदेव स. गाडे