समन्वेषण : पूर्वीच्या काळी मानवाने पहिल्यांदा हिंदी महासागराचेच व्यापक समन्वेषण व मार्गनिर्देशन केले होते. प्राचीन काळापासून व्यापारी व प्रवासी मार्गांच्या दृष्टीने हिंदी महासागर महत्त्वाचा ठरला आहे. ईजिप्शियन, अरब, चिनी व भारतीय हे आद्य मार्गनिर्देशक आहेत. ईजिप्शियनांनी अरबी समुद्रात जाण्याचे साहस केले. त्यांनी इ. स. पू. सुमारे २३०० मध्ये या महासागराचे समन्वेषण करण्याचे साहस केल्याचे पुरावे मिळतात. या काळात त्यांनी सोमालियाच्या किनाऱ्यावरील पूंट भूमीकडे सागरी सफरी पाठविल्या होत्या; परंतु सागरी सफरींची सुरुवात त्यापूर्वीही इ. स. पू. सुमारे २९०० मध्ये झाली असावी, असे काही तज्ज्ञ मानतात. इ. स. पू. सुमारे २२०० पर्यंत सफरींमध्ये बरीच वाढ झाली होती. इ. स. पू. २२०० – इ. स. पू. २१०० या कालावधीतील पूंट प्रदेशाकडील सफरींचा ईजिप्शियन बखरींत उल्लेख नाही; परंतु पुन्हा अकराव्या राजवंशाच्या काळात (इ. स. पू. २०८१ – इ. स. पू. १९३८) सफरींना सुरुवात करून पुढे विसाव्या राजवंशाच्या काळात (इ. स. पू. ११९० – इ. स. पू. १०७५) त्यात सातत्य राखून त्यांच्या नोंदीसुद्धा त्यांनी ठेवल्या आहेत. ईजिप्शियनांनी बाराव्या राजवंशाच्या काळात (इ. स. पू. १९३८ – इ. स. पू. १७५६) सुएझ संयोगभूमीतून एक सिंचन कालवा काढला. तेव्हापासून इ. स. ७७५ पर्यंत सातत्याने पाण्याची उच्च पातळी असताना या कालव्याचा जलवाहतुकीसाठी वापर केला जात होता. या कालव्याच्या निर्मितीपासून हिंदी महासागराच्या वायव्य भागातील व्यापार वाढला होता. ग्रीक इतिहासकार हीरॉडोटस यांनी इ. स. पू. ६०० च्या दरम्यानच्या मोहीमांविषयी लिहून ठेवले आहे. पूर्वीच्या काळातील दर्यावर्दी आपल्या समुद्र पर्यटनासाठी मोसमी वारे आणि त्यांना अनुसरून वाहणाऱ्या सागरी प्रवाहविषयक ज्ञानाचा चांगला वापर करून घेत असत. अरबी खलाशांनी आपल्या त्रिकोणाकृती शिडाच्या डाऊ जहाजांच्या साहाय्याने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याने दक्षिणेस सोफाला (सांप्रत नोव्हा सोफाला-मोझँबीक) पर्यंत, तर उत्तरेस तांबडा समुद्र व इराणच्या आखातापर्यंत व्यापार केला.
मध्ययुगीन अरब आणि पर्शियन खलाशांनी आपल्या इ. स. नवव्या ते पंधराव्या शतकातील लेखनात जहाज हाकारण्याबाबतच्या सविस्तर सूचना व माहिती दिलेली आहे. त्यामध्ये नौकानयन, वारे, सागरी प्रवाह, किनारी भाग, बेटे आणि सोफाला ते चीन यांदरम्यानची बंदरे इत्यादींविषयक माहितीचा समावेश आहे. चिनी समन्वेषक झेंग हे यांनी इ. स. १४०५ ते १४३३ या कालावधीत हिंदी महासागरात सात वेळा प्रवास केला होता. इटालियन प्रवासी मार्को पोलो यांनी चीनमधून इराणकडे जाताना मलॅका सामुद्रधुनी, निकोबार बेटे, श्रीलंका, भारत यांच्या किनाऱ्याजवळून प्रवास केला होता. रशियन जलप्रवासी अफानस न्यिक्यीत्यिन हे इ. स. १४६९ मध्ये हिंदी महासागर मार्गाने भारतात आले होते. पोर्तुगीज समन्वेषक वास्को द गामा हे इ. स. १४९८ मध्ये आफ्रिकेच्या दक्षिण टोकावरील केप ऑफ गुड होपला वळसा घालून हिंदी महासागरातून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोझिकोडे (कालिकत) बंदरात आले होते. पोर्तुगीजांपाठोपाठ डच, इंग्रज व फ्रेंच प्रवाशांनी हिंदी महासागरातून जलप्रवास केला. स्पॅनिश समन्वेषक जॉन सेबॅस्टियन डेल कानो यांनी फर्डिनंड मॅगेलन यांच्या सफरीत खलाशी असताना मध्य हिंदी महासागर पूर्वेकडून पश्चिमेकडे पार केला होता (इ. स. १५२१). डच खलाशी आबेल टास्मान यांनी इ. स. १६४२ – १६४४ या काळात सातत्याने पूर्व हिंदी महासागरातून प्रवास करून ऑस्ट्रेलियाच्या उत्तर किनाऱ्याचे समन्वेषण करून टास्मानिया बेटाचा शोध लावला. जेम्स कुक यांनी इ. स. १७७२ व १७७६ मध्ये हिंदी महासागराच्या अगदी दक्षिण भागाचे समन्वेषण केले. इ. स. १८०६ मध्ये अडाम योहान इव्हान क्रूझेश्टेर्न, ऑटो फोन कॉटसबू व इतरांच्या नेतृत्वाखाली रशियन जहाजांनी हिंदी महासागर अनेकदा पार केला होता.
रशियन समन्वेषक फेबिअन गॉटलीब फॉन बेलिंग्सहाउझेन हे अंटार्क्टिका सफरीवर असताना (इ. स. १८१९ – १८२१) हिंदी महासागरातून ६०° द. अक्षवृत्ताच्या दक्षिणेस गेले होते. त्यानंतर एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात अंटार्क्टिकाकडे अनेक महत्त्वपूर्ण सफरी गेल्या होत्या. त्यांमध्ये चार्ल्स विल्क्स (अमेरिका), द्यूमाँ द्यूर्व्हिल, झां शार्को (फ्रेंच), जेम्स सी. रॉस (स्कॉटिश) इत्यादी समन्वेषकांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या सफरी विशेष महत्त्वाच्या आहेत.
संशोधन : महासागरविज्ञानविषयक संशोधन करण्यासाठी इ. स. १८७२ – १८७६ या कालावधीत चॅलेंजर या ब्रिटिश जहाजावरून काढलेली सफर ही हिंदी महासागरासह सर्व महासागरांचे नियोजनबद्ध व शास्त्रशुद्ध संशोधन आणि समन्वेषण करणारी पहिली सफर ठरली. त्यानंतर अशा अनेक सफरी काढण्यात आल्या. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात गलथीआ (डॅनिश), अॅल्बट्रॉस (स्वीडिश), चॅलेंजर-२ (ब्रिटिश) या जहाजांमधून हिंदी महासागराच्या उत्तर भागाचे समन्वेषण केले गेले. आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय वर्षात (१९५७-५८) आणि तद्नंतरही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, रशिया, फ्रान्स, जर्मनी, नेदर्लंड्स, ऑस्ट्रिया, जपान व इतर देशांनी काढलेल्या सफरींनी दक्षिण हिंदी महासागराचे शास्त्रशुद्ध संशोधन व समन्वेषण केले. शास्त्रशुद्ध संशोधन व समन्वेषणासाठी विविध देशांच्या सहकार्यातून आखण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी महासागर मोहिमेत (१९६० – १९६५) वेगवेगळ्या देशांच्या सुमारे तीन डझन संशोधक जहाजांचा सहभाग होता. त्यानंतर मान्सूनच्या स्वरूपाविषयी संशोधन करण्यासाठी मोहिमा आखण्यात आल्या. सागरमग्न खंडभूमी आणि खोल सागरतळावरील खनिज संसाधनांविषयी माहिती मिळविण्यासाठी अनेक जहाजांनी हिंदी महासागर पार केला आहे. महासागरी द्रोणींच्या उत्क्रांतीबाबतचे संशोधन करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या खोल सागरी छिद्रण प्रकल्पांतर्गत (१९६८ – १९८३) हिंदी महासागरात अनेक ठिकाणी प्रछिद्रे घेण्यात आली. अशा आधुनिक आणि तांत्रिक दृष्ट्या प्रगत शास्त्रशुद्ध समन्वेषणामुळे सागरी भूविज्ञान, भूभौतिकी आणि संसाधनांची संभाव्यता यांविषयीची विशेष माहिती उपलब्ध झाली आहे. अलिकडच्या काळात विहंग छायाचित्रण, उपग्रहांद्वारे केले जाणारे छायाचित्रण या तंत्रज्ञानाचा उपयोग हिंदी महासागरातील विविध घटकांच्या शास्त्रशुद्ध संशोधनासाठी अतिशय कुशलतेने केला जात आहे.
समीक्षक : नामदेव स. गाडे