हिंदी महासागराच्या वेगवेगळ्या भागातील पाण्याचे तापमान आणि त्याची लवणता यांत तफावत आढळते. परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांनुसार पाण्याचे हे गुणधर्म ठरत असतात.

तापमान : सागरपृष्ठीय पाण्याचे तापमान व त्याचे वितरण अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यांत प्रामुख्याने महासागराचे स्थान आणि आकार, विषुववृत्तापासूनचे अंतर, सौर प्रारणाचा कालावधी व तीव्रता, ऋतू व बाष्पीभवनाचे प्रमाण, ऊष्मातोल इत्यादी घटकांचा समावेश होतो. हिंदी महासागर हा जगातील सर्वाधिक तापमान असणारा महासागर आहे. हा महासागर पश्चिमेस, उत्तरेस आणि पूर्वेस भूवेष्टित असून दक्षिणेस अंटार्क्टिका खंडापर्यंत त्याचा विस्तार आहे. त्यामुळे हिंदी महासागराच्या वेगवेगळ्या भागांतील पृष्ठीय जलाच्या तापमानांत असमानता आढळते. उत्तर गोलार्धीय उन्हाळा ऋतूत साधारण २०° द. अक्षवृत्ताच्या उत्तरेस, पश्चिम भागापेक्षा पूर्व भागातील जलाचे तापमान अधिक असते. या काळात बंगालच्या उपसागरातील कमाल तापमान सुमारे २८° से. असते. आफ्रिकेच्या दक्षिण टोकावरील गार्डाफूई भूशिराजवळ किमान तापमान २२° से. असते. त्याचा संबंध आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळील ऊर्ध्वगामी अभिसरण प्रवाहांशी असतो. २०° द. अक्षवृत्ताच्या दक्षिणेस वाढत्या अक्षांशानुसार सागरपृष्ठीय जलाचे तापमान समप्रमाणात कमीकमी होत जाते. २०° द. अक्षवृत्ताजवळ असलेले २२° ते २४° से. तापमान ६०° द. अक्षवृत्ताजवळ ०° से. पर्यंत घटलेले आढळते. उत्तर गोलार्धीय हिवाळा ऋतूतील सागरजलाचे तापमान विषुववृत्ताजवळ २८° से., अरबी समुद्राच्या उत्तर भागात २२° ते २३° से., बंगालच्या उपसागरात २५° से., २०° द. अक्षवृत्ताजवळ २२° ते २४° से., ४०° द. अक्षवृत्ताजवळ १४° ते १६° से., तर अंटार्क्टिकाच्या किनाऱ्याजवळ ते –१° ते ०° से.च्या दरम्यान असते.

हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान गेल्या काही दशकांपासून वाढले असून त्याचा परिणाम सागरी परिसंस्थांवर झालेला आहे. तापमान वाढीमुळे गेल्या सहा दशकांत सागरी प्लवंगांची वाढ २० टक्क्यांनी घटलेली आहे.

लवणता : हिंदी महासागरातील पृष्ठीय जलाची लवणता सर्वसाधारणपणे दर हजारी ३२ ते ३७ असून तिच्यात स्थानिक भिन्नता बरीच आढळते. अरबी समुद्रात उपोष्ण कटिबंधीय जास्त तापमानामुळे होणाऱ्या अधिक बाष्पीभवनामुळे सुमारे १२० मी. खोलीपर्यंतच्या भागात दर हजारी ३७ इतकी अधिक लवणता आढळते. त्यात ऋतूनुसार काहीसा फरक पडतो. याउलट, बंगालच्या उपसागराला मोठमोठ्या नद्यांपासून गोड्या पाण्याचा मुबलक पुरवठा होत असल्याने पृष्ठीय जलाची लवणता दर हजारी ३२ इतकी कमी आढळते. दक्षिण गोलार्धातील उपोष्ण कटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने २५° ते ३५° द. अक्षवृत्तांच्या दरम्यान ही लवणता दर हजारी ३५ पेक्षा अधिक असते. कमी लवणतेचा पट्टा १०° द. अक्षवृत्ताजवळील जलीय सरहद्दीला अनुसरून इंडोनेशिया ते मादागास्कर यांदरम्यान आढळतो. अंटार्क्टिका खंडाजवळील ६०° द. अक्षवृत्तादरम्यान सागरपृष्ठीय जलाची क्षारता दर हजारी ३३ ते ३४ इतकी कमी असते.

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम