चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांमुळे पृथ्वीवरील महासागरासारख्या मोठ्या जलाशयातील पाण्याच्या पातळीत आवर्ती (ठराविक कालांतराने पुन:पुन्हा होणारे) चढउतार होतात, यांस भरती-ओहोटी असे म्हणतात. हिंदी महासागरात दैनिक, अर्ध दैनिक आणि संमिश्र अशा तीनही प्रकारच्या भरती-ओहोटी लाटा निर्माण होतात. दिवसातून दोनदा येणाऱ्या (अर्ध दैनिक) भरती-ओहोटींचा विस्तार सर्वाधिक आढळतो. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर उत्तरेस विषुववृत्तापर्यंत तसेच बंगालच्या उपसागरात अर्ध दैनिक भरती लाटा निर्माण होतात. अरबी समुद्रात तसेच पर्शियन आखाताच्या अंतर्गत भागात संमिश्र (दैनिक व अर्ध दैनिक) भरती-ओहोटी येते. ऑस्ट्रेलियाच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावरील अल्प भाग, अंदमान समुद्रातील थायलंडचा किनारा आणि मध्य पर्शियन आखाताचा दक्षिण किनारा येथे दैनिक भरती-ओहोटी (दररोज एक भरती व एक ओहोटी) लाटांचा प्रभाव आढळतो.

हिंदी महासागर व सीमावर्ती समुद्रांमधील भरती-ओहोटीच्या अभिसीमेत स्थलपरत्वे भिन्नता आढळत असली, तरी तीमध्ये अटलांटिक व पॅसिफिक महासागराइतकी तफावत आढळत नाही. खुल्या महासागरात असणाऱ्या मॉरिशस बेटावरील पोर्ट लूई येथे उधाणाच्या भरतीची अभिसीमा फक्त अर्धा मीटर असते. ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावरील जेरॅल्टन व नैर्ऋत्य किनाऱ्यावरील बनबरी येथील अभिसीमा केवळ अडीच सेंमी. पेक्षा किंचित अधिक असते. यांशिवाय भारतातील चेन्नई (१.३ मी.) व श्रीलंकेतील कोलंबो (०.७ मी.) ही कमी अभिसीमा असणारी ठिकाणे आहेत. सर्वाधिक अभिसीमा अरबी समुद्रात आढळते. विशेषत: भारतातील खंबायतच्या आखातातील भावनगर येथे ती ११.६ मी., तर कच्छच्या आखातातील नौलाखी येथे ७.८ मी. आढळते. याशिवाय उधाणाच्या भरतीची सर्वाधिक अभिसीमा हिंदी महासागराच्या पूर्व किनारी भागात आणि अंदमान समुद्रात आढळते. ऑस्ट्रेलियाच्या वायव्य किनाऱ्यावरील पोर्ट हेडलँड येथे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील सागर बेटावर ५.३ मी., म्यानमारमधील मर्ग्वी येथे ५.३ मी. व यांगोन (रंगून) येथे ती ५.१८ मी. आढळते. मध्यम अभिसीमा आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील दारेसलाम (टांझानिया) येथे ३.२ मी., दरबान (दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक) १.७ मी., कराची (पाकिस्तान) २.३ मी. आणि शट अल् अरब (इराक) येथे ती ३.४ मी. असते.

समीक्षक : माधव चौंडे